नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

नानासाहेब पेशवे Nana saheb Peshva


नानासाहेब पेशवे 🏇
जन्म : १९ मे १८२४ (बिथूर)
मृत्यू : सप्टेंबर १८५९
वडील : नारायण भट्ट
माता : गंगाबाई
तिरोहित (गायब) : १८५७ (कावनपूर)
राष्ट्रीयत्व : भारतीय
शीर्षक : पेशवे
पूर्वज : बाजीराव दुसरा
धर्म : हिंदु
दत्तक : बाजीरावाने १८२७ मध्ये नाना साहिब यांना दत्तक घेतले.

सन १७५७ पासून १८५७ च्या शंभर वर्षाच्या कालावधीत ईस्ट इंडिया कंपनीने जवळजवळ सारा भारत पादाक्रांत केला होता. त्या १०० वर्षांच्या पूर्वीच्या काळात हिंदुस्थान सा-या जगात सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता. पण १७५७ पासून ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारापेक्षा या देशाचे निरनिराळे प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा उद्योग आरंभला आणि या देशातील राजे रजवाडे आपल्या अंकित करण्याचे प्रयत्न आपल्या कपटीतीने सुरु केले. राजे रजवाड्यांबरोबरच नवीन कायदे करुन गुंडगिरीने सा-या जनतेला पिळून काढून हा देश ' कंगाल भूमी ' बनवून टाकला. "हम करे सो कायदा" या न्यायाने या देशात आपली दहशत बसवली. कोटयावधी लोक गरीबीच्या खाईत पडले. दुष्काळामागून दुष्काळ या देशात पडू लागले. त्यात अन्नाअभावी सुमारे ५० लाख लोक मरण पावले. पण कंपनी सरकारला त्याचे शुभाशुभच नव्हते. जनता त्रस्त झाली होती. सर्वांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष खदखदत होता. लोक उघड उघड म्हणू लागले की “ आता कंपनी सरकारची शंभर वर्षे भरली."
१८४८ साली डलहौसी हा गव्ह. जनरल भारतात आला. त्याने तर नीतिअनीतीचा, न्यायाचा विचार सोडून देऊन या देशातील अनेक राज्ये कसलेही कारण दाखवून दादागिरीने घशात घातली. मराठ्यांचे शेवटचे राज्य दुसरा बाजीराव या नादान पेशव्याकडून त्यांनी आधीच ताब्यात घेतले होते व त्याला सन १८१८ पासून महाराष्ट्रातून घालवून देऊन उत्तरेत गंगातीरी दरवर्षी आठ लाख रुपये पेन्शन देऊन ब्रम्हावर्त ( विठूर ) येथे स्थानिक केले होते. तेथे तो चैनविलासात जगत होता. त्याला पुत्रंतान नव्हते . म्हणून त्याने दत्तक घ्यावयाचे ठरविले. तो जेव्हा ब्रम्हावर्ताला आला, तेव्हा त्याच्याबरोबर अनेक ब्राम्हण कुटुंबे त्याच्या आश्रयाला आली. त्यांमध्ये माथेरान जवळच्या वेणुगावचे माधवराव भट यांचेही कुटुंब होते. त्यांचे बंधूही त्यांच्याबरोबर तेथे आले होते. माधवरावाच्या पत्नीचे नाव वेणूबाई तिच्या पोटी एक सुंदर पुत्ररत्न निपजले. त्याचे नाव त्यांना 'धोंडू' असे ठेवले. तो तीन साडेतीन वर्षांचा असतांनाच दुस-या बाजीरावच्या मनात भरला आणि त्याने ७ जून १८२७ रोजी धोंडूला दत्तक घेऊन त्याचे नाव 'नानासाहेब' असे ठेवले. त्यानंतर धोंडूचे दादासाहेब व बाळासाहेब हे दोन्ही बंधूही बाजीरावाने दत्तक घेतले. तिन्ही मुलाचे लालन - पालन दुस-या बाजीरावाच्या विठूर येथील महालात सुरू आले.
बाजीरावाचा एक भाचा चिमाजी अप्पा हा काशी येथे वास्तव्यास होता. त्याचे आकालीच निधन झाल्याने धर्मखात्यात असलेले मोरोपंत तांबे यांचा आधार तुटला व तेही आपल्या कुटूंबासह विठूर येथे दुस-या बाजीरावाच्या आश्रयास आले. त्यांची एक सुंदर कन्या होती. तिचे नाव ' मनकर्णिका उर्फ मनू.' ती सुंदर , गोरीपान , चपळ व बोलण्यात चालण्यात चुणचुणीत ठसकेबाज होती. नानासाहेबांपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तिचा वापर बाजीरावाच्या कड्यात कायमचा असे. बाजीराव तिला 'छबेली' म्हणायचा.
नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब यांचे शिक्षण सुरु झाले. तेव्हा मनूही त्यांच्याबरोबर शिकू लागली. ती आठ वर्षाची झाल्यावर तिचे लग्न बाजीरावाने झांशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी लावून दिले. तिचे सासरचे नाव 'लक्ष्मी'.
महमंदअली व अजीमुल्लाखाँ तुर्कस्थान , क्रिमिया, इराण, अफगाणिस्तान , रशिया इ. देशांना भेटी देऊन क्रिमियातील युद्धाचे निरीक्षण करुन भारतात परतले. रशियाने त्या युद्धात इंग्रजांची कशी दाणादाण करुन टाकली हे त्यांनी पाहिले होते. न १८५६ मध्ये ते विठूरला परत आले. अजीमुल्लाखाँच्या यांच्या प्रयत्नांना यश आले नाही , म्हणून नानासाहेब निराश झाले. पण त्याच्या सल्ल्याप्रमाणे उठाव करायचे त्यांनी ठरविले. नानासाहेब, तात्या टोपे, अजीमुल्लाखाँ, बाळासाहेब तीर्थयात्रेचे निमित्त करुन इलाहाबाद , अयोध्या , दिल्ली , लखनौच्या यात्रेला जाऊन आले. या यात्रेत अनेक राजेरजवाड्यांना त्यांनी उठावासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार नानासाहेबांनी अनेक राजांना , जहागीरदारांना उठावासाठी गुप्तपणे पत्रे पाठविली आणि ३१ मे रविवार रोजी देशातील सारे इंग्रज ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेस जातील तेव्हा त्या सर्व इंग्रजांना कापून काढायची योजना ठरविली. त्याचप्रमाणे नानासाहेब व अजीमुल्लाखाँ यांनी साधूच्या व फकिरांच्या वेषात अनेक गुप्तहेर देशभरातील इंग्रजांच्या छावण्यांमधील देशी पलटणींना उठावासाठी प्रवृत्त करण्यास पाठविले. ते देशी शिपाई इंग्रज सरकारवर असंतुष्ट होतेच. त्यामुळे इंग्रजांच्या अनेक पलटणी उठावास सिद्ध झाल्या. एखादे मोठे संकट वा लढाईचे सैन्य आपल्या भागात येणार आहे असे कळताच एका गावातून दुस-या गावात चपात्या पाठविण्याची गुप्त यंत्रणा देशात चालू होती. त्याप्रमाणे प्रत्येक गावात चपात्या जाऊ लागल्या व ३१ मे रोजी सर्वांनी दक्ष रहावे, अशा सूचना सर्व गावात गेल्या. साधू व फकीर कमळे येऊन असाच संदेश देशी पलटणीत पोचवीत होते. ही प्रचारयंत्रणा एवढी गुप्त होती की, एकाही इंग्रजाला त्याचा सुगावा लागू शकला नाही. फक्त संशयावरुन काही साधूंना व फकिरांना इंग्रज अधिका-यांनी फाशी दिली.
इंग्रजांच्या पलटणींना देण्यात आलेल्या नव्या एन्फिल्ड रायफलींच्या काडतूसांचा कारखाना कलकत्याजवळ डमडम येथे कंपनी सरकारने सुरु केला होता. त्या कारखान्यातील एका मोची जातीच्या कर्मचा-याकडून बराकपूर छावणीतील मगल पांडे या ब्राम्हण शिपायाला समजले की , "सर्व शिपायांना गायीची व डुकरांची लावलेली काडतुसे दिली जाणार आहेत." हे समजताच मगल पांडेची खात्री झाली की , ' इंग्रज सरकार सर्व हिंदू व मुसलमान शिपायांचा धर्म बुडवायला निघाले आहे. त्यामुळे संतप्त होऊन बराकपूर छावणीतल्या गोन्या अधिका-यांवर हल्ला करुन त्यांना २९ मार्च १८५७ रोजी जखमी केले. त्या गुन्हयाबद्दल त्याला ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आले. ही बातमी वा-यासारखी सबंध हिंदुस्थानातील पलटणीत पसरली. आधीच कंपनी सरकार वर असंतुष्ट असलेले सारे हिंदु - मुस्लिम शिपाई संतप्त झाले व इंग्रजाविरुद्ध उठावास उद्युक्त झाले.
९ मे १८५७ रोजी मेरठ छावणीतील ८५ देशी शिपायांनी ती काडतुसे घेण्यास नकार दिल्याने त्या छावणीतील अधिका - यांनी त्यांना १०-१० वर्षांच्या शिक्षा देऊन तुरुंगात डांबले.
दुस-या बाजीरावाने सत्तरी ओलांडली. तेव्हा त्याला आपले आठ लाखांचे पेन्शन आपल्या निधनानंतर आपला मोठा दत्तकपुत्र नानासाहेब यास चालू राहावे, याची काळजी पडली म्हणून त्याने गव्ह. जनरलकडे तसा अर्ज केला. गव्ह जनरलकडून त्याला उत्तर मिळाले , “ ऐन वेळी त्या संबंधात योग्य निर्णय घेतला जाईल." दुसरा बाजीराव २८ जानेवारी १८५१ रोजी मरण पावला. त्यानंतर नानासाहेबाने गव्ह. जनरल डलहौसी यांचेकडे आपल्या पित्याचे पेन्शन आपणास कायम चालू राहण्यासाठी पत्रव्यवहार केला पण डलहौसीने पेन्शन फक्त तहहयातच असते, ते घेणा-याच्या निधनानंतर बंद होते, असे नानासाहेबाला कळविले. नानासाहेब त्यामुळे व्यथित झाला व त्याने आपला विश्वास सल्लागार अजीमुल्लाखाँ याला आपला वकील म्हणून या प्रकरणी दाद लावून घेण्यासाठी महंमद अली याच्यासह लंडनला पाठविले.
दुस-या बाजीरावाकडून इंग्रजांनी मराठा राज्य हिसकून घेतले व त्याला महाराष्ट्रातून हद्दपार केले , तरी ब्रम्हावर्ताला त्याचे व कानपूरच्या बड्या इंग्रज अधिका-याचे संबंध चांगले होते. ते बडे इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबासह विठूरला बाजीरावाकडे विश्रांतीला व मौज मजा करण्यासाठी येत असत. बाजीराव त्यांची चांगली बडदास्त ठेवीत असे. त्यांच्यासाठी मेजवान्या, उंची दारु , नाचरंग वगैरेची उत्तम सोय करीत असे. तीच प्रथा नानासाहेबानेही पुढे चालू ठेवली होती. कानपूर छावणीचा प्रमुख व्हीलर , कलेक्टर हिलर्डसन हे तर त्याचे दोस्तच होते. पण पेन्शन मिळविण्यासाठी त्याचा काही उपयोग नानासाहेबाला झाला नाही.
अजीमुल्लाखाँ हा इंग्लिश व फ्रेंच भाषेत प्रवीण होता. त्याला उर्दू , हिंदी व संस्कृत भाषांचे ज्ञान ही प्राप्त झालेले होते. कानपूरच्या इंग्रजी शाळेत त्याने अध्यापनाचे कार्य केलेले होते. तो बहुश्रुत होता. गोरापान व राजबिंडा होता. त्याला व महमद अलीला भरपूर पैसा देऊन नाना साहेबांनी इंग्लंडला आपले वकील म्हणून पाठविले. लंडनला त्याने आपल्या व्यक्तिमत्वाची छाप कंपनीच्या डायरेक्टरांवर आणि पार्लमेंटच्या सदस्यांवर पाडली. त्याने नानासाहेब पेशव्यांना पेन्शन मिळावे म्हणून अथक प्रयत्न २-३ वर्षे केले. पण कंपनीच्या डायरेक्टरांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की, "गव्ह. जनरलचा निर्णय योग्यच आहे, आम्ही तो बदलू इच्छित नाही." ते ऐकल्यावर तो निराश होणे साहजिकच होते. पण त्याने आपले प्रयत्न सोडले नाही. लंडनला गेल्या चौदा वर्षांपासून रंगो बापूजी साता-याचे राजे प्रतापसिंह भोसले यांना त्यांचे राज्य परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता पण कंपनीच्या डायरेक्टरांनी त्यालाही असेच उत्तर दिले. त्याची गाठ लंडन येथे अजीमुल्लाखाँशी पडली. दोघांनी विचार - विनिमय करून भारतात गेल्यावर इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचे ठरविले. अजीमुल्लाखाँने नानासाहेबांच्या साह्याने उत्तर भारतात तसा प्रचार करायचा व रंगोबापूजीने दक्षिणेतील राजेरजवाड्यात तसा प्रचार करायचा , असे ठरल्यावर १८५४ साली रंगो बापूजी भारतात परतला. मेरठच्या सर्व शिपायांनी १० मे रोजी बंड पुकारले. तेथल्या अनेक इंग्रजांना ठार केले व तुरुंग फोडून त्या ८५ शिपायांना मुक्त केले. ते सारे शिपाई रातोरात दिल्लीला पोचले व त्यांनी बहादुरशाह जफर या शेवटच्या मोगल बादशहाला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून जाहीर केले. त्यांना दिल्लीमधील देशी पलटणीतले सारे शिपाई येऊन मिळाले व त्या सर्वांनी मिळून दिल्लीतील इंग्रजांना कापून काढून दिल्ली स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. उठाव निश्चित तारखे आधीच सुरु झाल्याने उठावासाठी तयार झालेले सगळेच राजे रजवाडे गोंधळात पडले. नानासाहेब पेशवे व अजीमुल्लाखाँ सुद्धा गोंधळले. पण त्यांनी कानपूर छावणीतील इंग्रज अधिका-यांशी पूर्वीसारखीच सलोख्याची वागणूक सुरु ठेवली.
मेरठ व दिल्ली येथल्या उठावाच्या बातम्या कानपूरचा सेनाप्रमुख व्हीलर आणि कलेक्टर हिलर्डसन यांना समजल्या. तेथल्या छावणीमधील शिपायांत असंतोष वाढू लागल्याची लक्षणे त्यांना दिसू लागली. कानपूर मध्ये फक्त २५० गोरे शिपाई होते आणि इतर पुरुष व बायकामुले ७५० होती. पलटणीत ३००० देशी शिपाई होते. त्यामुळे व्हीलर व हिलर्डसन यांना कानपूरच्या आपल्या मोठ्या खजिन्याची व शस्त्रागाराची चिंता पडली. त्यांनी आपला मित्र नानासाहेब याला त्याचे सैनिक व तोफा घेऊन कानपूरला बोलावले आणि कानपूर मधील नबाबगंज येथील आपल्या खजिन्याच्या व शस्त्रागाराच्या संरक्षणाचे काम नानासाहेबाकडे सोपविले. त्याच्या बरोबर अजीमुल्लाखाँ व तात्या टोपे हे सुध्दा कानपूर येथे आले होते.
कानपूर पलटणींचा सुभेदार टीकासिंह याने नानासाहेबांची भेट घेतली व उठावासंबधी चर्चा केली. एके दिवशी सायंकाळी नानासाहेब, अजीमुल्लाखाँ, टिकासिंह व शमसुद्दीन हे गंगेकाठी येऊन जलविहार करण्याच्या निमित्ताने नावेतून गंगेत गेले. तेथे त्यांनी उठावाची बोलणी केली. उठाव कसा करायचा हे ठरले आणि ते परतले.
ठरल्याप्रमाणे ५ जून १८५७ रोजी कानपूरच्या शिपायांनी टीकासिंह याच्या नेतृत्वाखाली उठाव केला. नाना साहेबांनीही आपल्या ३०० सैनिकांच्या मदतीने कानपूरचा खजिना व शस्त्रागार व दारुगोळ्याचे भांडार आपल्या ताब्यात घेतले आणि इंग्रजांविरुद्ध युध्द पुकारले. व्हीलरने अवघ्या २५० सैनिकांसह आपली बाजू १६-१७ दिवस लढविली. पण सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने त्यांचा अन्नपाण्याचा साठा संपला. या युद्धात अनेक इंग्रज स्त्री - पुरुष ठार झाले. कलेक्टर हिलर्डसन व त्याची बायको एका तोफगोळयाने ठार झाली. अखेर व्हीलरने शरणागतीचा पांढरा झेंडा फडकविला व यद्ध थांबले. डलहौसीच्या विचाराशी सहमत नसलेल्या सर्व इंग्रजांना नावांमधून इलाहाबाद येथे पाठवून देण्याचे आश्वासन नानासाहेबांनी व्हीलरला दिले. त्यांच्यासाठी सती चौरा घाटावर ५० नौका आणल्या.
२३ मे रोजी इलाहाबाद व बनारस येथील देशी पलटणींनी उठाव केला होता. तेथे हॕवलाॕक व नील या सेनाधिका-यांनी तो उठाव अत्यंत क्रुरतेने दडपून टाकला. एकट्या इलाहाबादमध्ये ६ हजार लोकांना त्यांनी मारून टाकले. इलाहाबादमधील प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीवर २-३ प्रेते लटकत होती. कानपूरच्या उठावाची बातमी ऐकताच ते सैन्यासह कानपूरकडे निघाले. त्या उठावातून सुटलेले सैनिक कानपुरकडे निघाले होते. तेथले हत्याकांड पाहून ते इंग्रजांवर भयंकर चिडलेले होते. तात्या टोपेने ४० नावांत सती चौरा घाटावर कानपूरच्या इंग्रज स्त्री पुरुषांना बसवून नावाड्याना नावा चालविण्याचा इशारा केला. त्याच वेळी इलाहाबादकडून ते इंग्रजांवर संतापलेले सनिक तेथे पोचले. त्यांनी नावांवर बंदुका रोखलेल्या पाहून त्या सर्व नावाड्यांनी नावांवरुन गंगेत उड्या मारल्या व ते काठावर येऊ लागले. त्या नांवातील इंग्रजांनी त्या नावाड्यांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. ते पाहताच त्या इलाहाबादच्या सैनिकांनी त्या नावावर आपल्या बंदुकांतून गोळ्यांचा भडिमार केला. कित्येक इंग्रज स्त्री - पुरुष व मुले मरण पावली. ही बातमी कळताच नानासाहेबांना 'स्त्रियांना व मुलांना मारु नका' असा निरोप घाटावर पाठविला तेव्हा ते हत्याकांड थांबले. त्या नावापैकी एका नावेतून ४ इंग्रज पुरुष पुढे निघून गेले. त्यांनाही गंगेकाठच्या गावातील लोकांनी आपल्या गावठी गोळ्या झाडून जखमी केले. अखेर दुर्विजयसिंह नावाच्या राजनिष्ठ जहागीरदाराने त्यांना आश्रय दिला व त्यांच्यावर उपचार केले. ते बरे झाल्यावर त्यांना अलाहाबादेस पाठवून दिले.
बाकीच्या नावांत १२५ इंग्रज बायका - मुले उरली होती, त्यांना उतरुन घेऊन नानासाहेबाने 'बिबिघर ' नावाच्या कानपूरच्या कोठीत ठेवले. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. त्या स्त्रियांपैकी काहींना दररोज दळण्याचे काम थोडा वेळ दिले जाई. नानासाहेब व त्यांचे सहकारी विजयोत्सवात दंग झाले. कानपूरहून निघून विठूरला आले. तेथे नानासाहेबांचा राज्यभिषेक झाला. सर्वच आनंदीआनंदाचे वातावरण होते.
कानपूरच्या बिबिघर कोठीवर बेगम साहिबा ही एक ताकदवान व खंबीर पठाण स्त्री रखवालीसाठी नेमलेली होती. काही इंग्रजस्त्रियांनी एका भंगिणीला वश करुन घेऊन एक चिट्ठी इलाहाबादच्या इंग्रज
अधिका-यांकडे पाठविण्यासाठी तयार केली. ते बेगम साहिबा या रखवालदारीणीस समजले. तिने लगेच त्या भंगिणीस सुभेदार टीकासिंह यांच्यापुढे उभे केले व ती चिट्ठी भंगिणीकडून काढून घेतली. तीत लिहिले होते , ‘ शत्रूकडील लोक विजयोत्सव व नाचरंग यात दंग आहेत. तरी त्यांच्यावर चाल करुन येण्यास हीच वेळ योग्य आहे. तो मजकूर वाचून टीकासिंह भयंकर संतापला व त्याने 'बिबिघरातील सगळ्या बायकामुलांची कत्तल करुन टाका' असा हुकूम आपल्या शिपायांना दिला. ते शिपाई बिबिघराजवळ आले. पण त्यांना त्या इंग्रज मुलांना मारावे वाटेना. कारण ते भारतीय संस्कृतीत वाढलेले होते. ते शिपाई इंग्रज स्त्रियांना मारायला कचरत आहेत असे पाहून बेगमसाहिबाने गावातून पाच कसाई बोलावले व त्यांना त्या इंग्रज बायकामुलांची कत्तल करायला सांगितले. त्या कसायांनी सर्व बायकामुले मारुन टाकून त्यांची प्रेते जवळच्या विहिरीत टाकून दिली व ती विहीर मातीने बुजवून टाकली.
४० नावांवरील इंग्रजाची बिबिघरातील बायकालांची कत्तल नानासाहेबाने केली असा खोटा प्रचार इंग्रज इतिहासकारांनी केला. पण १८५९ साली इंग्रज सरकारने इग्रजांच्या या दोन्ही कत्तलींच्या चौकशीसाठी कर्नल विल्यमचे कमिशन नेमले. त्या कमिशनने शेकडो लोकांच्या जबान्या घेतल्या. त्यात एकानेही ' या हत्याकांडांना नानासाहेबांची संमती होती ' असे एकाही व्यक्तीने सांगितले नाही. तसे पुरावेही त्या कमिशनला मिळाले नाहीत. सर जॉन फाॕरेस्ट, मिचेल, कॕपबेल इ. ग्रंथकारांनी इंग्रज स्त्री - पुरुषांच्या व मुलांच्या कत्तलीशी नानासाहेबाचा मुळीच संबंध नव्हता. हे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.
कानपूर नानासाहेबाने जिंकले व तेथे हिलर्डसन आणि व्हीलर ठार झाले ही बातमी कळताच हॅवलॉक भयंकर संतापला. तो क्रुरकर्मा नील याच्यासह मोठे सैन्य घेऊन कानपूरवर चालून आला. नानासाहेबांना हेरांकरवी ते समजताच ते आपल्या सैन्यासह युद्धसज्ज झाले होतेच. कानपूरला तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात नानासाहेब , तात्या टोपे , बाळासाहेब, रावसाहेब, टिकासिंह, अजीमुल्लाखाँ, ज्वालाप्रसाद, शमसुद्दीन हे वीर तर लढलेच, त्याबरोबर नर्तकी अजीज़न ही सुद्धा पुरुषवेषात आपल्या पुरुषवेषी स्त्री सैन्यासह लढली. या युद्धात नानासाहेबाचा दारुण पराभव झाला व तो आपल्या माणसांसह विठूरला निघून गेला. अजीजन पकडली गेली व तिला इंग्रजांनी गोळ्या घालून ठार केले.
नानासाहेभ विठूरला आले. त्यांनी आपला कुटुंबकबिला व बरेचसे धन बरोबर घेतले व ते १८ जुलै रोजी रात्रीच्या वेळी नावेतून गंगापार झाले. त्याआधी त्यांनी आपली उरलेली तीस लाखांची संपत्ती आपल्या महालातल्या खोल विहिरीत टाकून दिली होती. कानपूरची व्यवस्था लावल्यावर हॕवलाॕक व नील यानी तेथील अपराध - निरपराध हजारो लोकांची कत्तल केली आणि ते विठूरला आले. त्यांनी तोफ डागून नानासाहेबाचा महाल, अन्य इमारती व सर्व मंदिरे जमीन दोस्त केली. महालातल्या विहिरीत नानासाहेबाचा मोठा खजिना आहे, हे समजल्यावर त्या विहिरीतले पाणी काही दिवसात उपसून काढून तो तीस लाखांचा खजिना हरतगत केला. त्यांनी विठूरलाही मोठा नरसंहार केला. मैना ही नानासाहेबांची मुलगी महालाच्या भग्नावशेषावर बसून रडत होती. तिलाही हॕवलाॕकने त्या भग्नावशेषासह जाळून टाकले. कानपूर व विठूर येथे त्यांनी प्रचंड लूटमार केली.
कानपूर इंग्रजांनी जिंकले व नानासाहेब गंगापार निघून गेले, हे कळताच तात्या टोपे २० हजार फौजेसह कानपूरवर चालून आला व त्याने कानपूर जिंकले पण ६ डिसेंबर रोजी हॅवलाकने पुन्हा कानपूरवर ताया मिळविला. नानासाहेब गंगापार होऊन रोहीलखंडात शिरले व अवधची बेगम हजरत महल हिच्या मदतीला गेले . बेगम हजरत महल, नानासाहेब , मौलवी अहमदशाह इ. नी लखनौच्या बचावासाठी इंग्रजांशी अनेक झुंजी दिल्या. पण १४ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी त्यांचा पूर्ण पाडाव केला. बेगम सर्वांसह लखनौमधून उतरेकडे निघाली. नानासाहेबाला पकडून देणा-यास कंपनी सरकारने एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. पण त्याच्या लोभात कोणीही पडले नाही. कोलिन कँप बेलला त्यांच्या पाठलागावर मोठे सैन्य घेऊन पाठविण्यात आले. बेगम हजरत महल, खान बहादुर खान, नानासाहेब, राजा बेनी माधोसह एकत्रितपणे नेपाळच्या सरहद्दीजवळील राप्ती नदीच्या तीरावर तळ ठोकून होते. तेथे त्यांची गाठ कोलिन कँपबेलच्या सैन्याशी पडली. तेथे त्यांच्यात निर्वाणीचे युद्ध झाले. आपली हार होत आहे , असे पाहून नानासाहेब , बेगम हजरत महल , बाळासाहेब नेपाळच्या हद्दीत शिरले. त्यांच्या बरोबर भले मोठे सैन्यही होते. तो प्रदेश मोठमोठ्या टेकड्यांनी व्यापलेला , नद्यानाल्यांचा व घनदाट जंगलाचा असल्याने कोलिन कँपबेल आपल्या सैन्यासह परत लखनौकडे निघाला.
सुमारे एक वर्षभर या क्रांतिकारकांचे त्या जंगलात पार हाल झाले. १ नोव्हेंबर रोजी व्हिक्टोरिया राणीने ईस्ट इंडिया कंपनीकडून हिंदुस्थानचा कारभार आपल्या पार्लमेंटच्या हाती घेतला व हिंदुस्थानातील क्रांतिकारकां साठी माफीचा जाहीरनामा त्याच दिवशी काढला. ती बातमी ऐकताच नेपाळमधील क्रांतिकारकांचे बहुतेक सैन्य नेपाळमधून आपापल्या गावी निघून गेले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी शरण यावे, म्हणून नेपाळचा राजा जंगबहादूर यांच्या मार्फत खूप प्रयत्न केले. पण त्यांनी इंग्रजांचा कावा ओळखला हो. त्यांनी बाणेदारपणे नकार दिला. मध्यंतरी तापाने आजारी पडून बाळासाहेब वारला. नानासाहेबालाही त्याच तापाने घेरले. त्यातच त्याचा अंत देवखरी या गावाजवळच्या ओढ्याच्या काठी ऑक्टोबर १८५९ मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे क्रियाकर्मांतर करण्यासाठी त्यांच्या दत्तक आईजवळ पैसा नव्हता. तिने आपले जडजवाहिर विकण्यासंबंधी सिद्धमानसिंहा मार्फत जंगबहाद्दुरास विनती केली. तो पैसा हाती येताच ५ नोव्हेंबर १८५९ रोजी नानासाहेबांचे अखेरचे क्रियाकर्मांतर नेपाळातच करण्यात आले. त्यानंतर राजा जंगबहादुराने त्याच्या उर्वरित कुटुंबाला व बेगम हजरत महल हिला तिच्या पुत्रासह काठमांडू येथे आश्रय दिला.
नानासाहेब तात्या टोपे, कुवरसिंह, मौलवी अहमदशाह व बेगम हजरत महल ही १८५७ च्या युद्धातील दिव्य रत्ने होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अखेरच्या काळात अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. पण ते इंग्रजांना मुळीच शरण गेले नाहीत. त्यांनी पुढच्या ९०वर्षात भारतातील क्रांतिकारकांना स्फुर्ती दिली व १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य बलिवेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती 
संकलन

आगामी झालेले