नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, २३ मार्च, २०२०

राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग

 

 भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्वीकारले. त्या क्रांतिकारांकांची आठवण होताच तीन चेहरे आपसूकच डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे –भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव!
भगतसिंगांबद्दल तर सगळेच जाणतात. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे तरुणांसाठी नवचैतन्याचे प्रतिक आहे. सुखदेव यांचा जीवनप्रवास देखील लोकांना माहित आहे. पण राजगुरू नावाचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व मात्र अजूनही लोकांपर्यंत म्हणावे तितके पोचलेले नाही. एक क्रांतिकारक म्हणून ते कसे घडले? त्यांची पार्श्वभूमी काय? याबद्दल आजही सामान्यजण अनभिज्ञ आहेत.

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला.
सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली.
लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.
शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपार्वात अढळ करणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!!
⇰⇰ राजगुरू याची सहनशीलता दाखवणारे प्रसंग
प्रसंग १ : एकदा राजगुरू भट्टीतल्या निखाऱ्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखाऱ्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला, तरच मला कौतुक वाटेल', असे म्हटले. आपल्या सहनशीलतेविषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई उन करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?'' राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली', असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
प्रसंग २ : कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकाऱ्यांची नावे न सांगणे : `एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीका उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.
प्रसंग ३ : स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणारे राजगुरू : फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.''

 सुखदेव रामलाल थापर
( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :
(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.
या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.
क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ. स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

भगतसिंग


(२८ सप्टेंबर १९०७-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. . पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी व्ही पुढे नॅशनल कॉलेजमधून बी झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी..व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता; परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला करणे (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे..स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे . कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. याप्रमाणे कुंदनलाल चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला; पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले ( फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँब्मस्फोट करण्यात आले; तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद शिवराम राजगुरु यांनी केला; परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील 'साँडर्स मरण पावला', लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला', अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही 'इन्किलाब जिंदाबाद' अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात "जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी 'हा मोठा आवाज केला आहे' आणि 'मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल' अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे", असे नमूद केले होते. हा इतर अनेक आरोप लादून त्यांना त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०); पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली ( आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी .गांधी काँग्रेस यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांस यश आले नाही. भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) . नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले; पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक एकूण कार्यावरुन स्पष्ट होते. भारत - पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

आगामी झालेले