नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

कर्मवीर भाऊसाहेब हिरे Bhausaheb Hire


कर्मवीर भाऊसाहेब हिरे Bhausaheb Hire
(स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक)
स्मृतीदिन : ६ नोव्हेंबर १९६१

भाऊसाहेब हिरे हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली. भाऊसाहेब हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय मोलाचे योगदान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील क्रांतिकारी कूळ कायद्याचे ते जनक होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते जनक होते.
*'सत्य'शोधक समतेचे पुजारी:कर्मवीर भाऊसाहेब हिरे*
छत्रपती शिवरायांपासून सुरू झालेला बहुजन हिताचा बहुजन सुखाचा महायज्ञ पुढे महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहु महाराज, रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख सारख्या समाजधुरीनांनी, महान विभूतींनी, आपल्या अहर्निश कार्यकर्तुत्वाने अखंडपणे प्रज्वलित ठेवला. त्यावर लोभाची, लाभाची, स्वार्थाची, अर्थाची, जातीची, नातीची वा अनितीची राख साचू दिली नाही. म्हणून तर वर्ष्यानुवर्षं मुक्या समजल्या जाणाऱ्या समाजाला आवाज मिळाला. शोषित, पीडित समाजाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, अज्ञानाच्या जोखडातून मुक्त झाला.

*बहुजन उद्धाराची ही लोकचळवळ जातीसाठी नाही तर मानवजातीच्या उत्थानासाठी होती . मन माणूस आणि मानवजातीच्या हितासाठी आपल्या व्यक्तिगत सुखाला तिलांजली देत समाजासाठी आपल्या आयुष्याची या पवित्र महायज्ञात आहुती देणारे अनेक पुण्यात्मे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आहेत*.ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली अशा पुण्यपुरुषांमध्ये ज्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते ते म्हणजे नाशिक जिल्ह्यात असलेल्या मालेगाव तालुक्यातील *निमगाव या छोट्या खेड्यात जन्मलेले मोठया कर्तृत्वाचे* बहुजनउद्धारक जे पुढे महाराष्ट्राला ,देशाला कुळकायद्याचे जनक, शिक्षण, सहकार महर्षी म्हणून परिचित झालेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याशिवाय बहुजन चळवळ पूर्ण होऊ शकत नाही.कर्मवीरांनी या चळवळीला नवी दिशा दिली गती दिली आणि ही चळवळ एका उंचीवर नेऊन ठेवली.

कै.सखाराम पाटील या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन *नाशिक जिल्ह्यातुन बहुजन समाजात प्रथम श्रेणीत एल एल बी उत्तीर्ण होण्याचा मान या कुणब्याच्या पोरानं मिळवला होता.* शेतीवर गायगुजरान करणाऱ्या कुटूंबात उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याकारणाने कधी सावकाराकडून तर कधी आपल्या धर्मपत्नी रेणुकाबाई तसेच मातोश्री झेलाबाई यांनी अतिरिक्त काबाडकष्ट करून साचवलेल्या पैशातून आपली ज्ञानपीपासा ज्ञानलालसा भाऊरावला पूर्ण करावी लागली होती. *खरेतर आपल्या मातोश्रीच्या कमरेला असलेली पिशवी हीच भाऊसाहेबांच्या शिक्षणासाठी अर्थपुरवठा करणारी पहिली बँक ठरली असे म्हटले तर वावगे ठरू नये.*

भाऊसाहेब ज्या परिस्थितीतुन पुढे आले,लढले घडले त्या परिस्थितीची,समाजाची जाणीव कर्मवीर भाऊसाहेबांनी जीवनाच्या अंतापर्यंत ठेवली. म्हणून तर एल.एल. बी होताच बहुजन समाजातील कामकरी, कष्टकरी, शेतकरी लोकांसाठी कधी फुकट तर कधी पावशेर बाजरीच्या तर कधी शेरभर बाजरीच्या मोबदल्यात केस लढवण्यास सुरुवात केली. खरेतर वकिली व्यवसायातील पांढरपेशा समाजात ही खूपच हास्यास्पद बाब होती म्हणून तर *भाऊसाहेबांची पावशेर,शेरभर बाजरीच्या मोबदल्यात केस लढवणारा वकील म्हणून टिंगल केली जायची.* भाऊसाहेबांनी असल्या क्षुल्लक तजन्य गोष्टींकडे कधी लक्ष दिले नाही. समाजाशी असलेली बांधिलकी कधी ढळू दिली नाही

*बहुजन चळवळ ही लोकहितासाठी होती,ती न्याय,स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या तत्वावर उभी राहिलेली होती. माणूस हा तिच्या कार्याचा केंद्रबिंदू होता किंबहुना या उदात्त हेतुपुर्तीसाठीच तीचा जन्म झाला होता.* आजच्या संधीसाधू, सत्तापिपासू, सत्तांध राजकारणाच्या वावटळीत तीच्या मूळ तत्वांची धूळधाण होतांना दिसत आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, व्यक्तिगत हित, लाभ, लोभासाठी जातीचा, धर्माचा आधार घेत लोकभ्रम वाढवून समाजाला अक्षरशः वेठीस धरले जात आहे,बहुजन समाजाची दिशाभूल केली जात आहे. *समाजापेक्षा नेता महत्वाचा वाटू लागला आहे समाजहितापेक्षा व्यक्तिगत हित जपले जात आहे. समतेच्या मशाली पेटवल्या जात आहे मात्र प्रकाश सर्वत्र विषमतेचा पडताना जाणवत आहे. विषमतेच्या बीजाला समतेची फळ तरी कशी बरं लागतील? ज्या पुण्यभूमीत कर्मवीरांसारख्या महापुरुषाने समतेची बीज रोवली त्या भूमीत राजकीय स्वार्थासाठी विषमतेवर आधारित नेतृत्व वाढली. फोफावली ही बहुजन समाजासाठी चिंतेची अन चिंतनाची बाब झाली आहे

म्हणून तर आज कर्मवीरांसारख्या सत्तेपेक्षा सत्याच्या शोधार्थ आयुष्य पणाला लावणाऱ्या एका मानवतेच्या, समतेच्या पुजाऱ्याच्या जन्मदिनी त्यांच्या समताधिष्ठित कार्याची आठवण येणं त्याचे पुन्हा स्मरण गरजेचं झालं आहे.त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळलेल्या अनेक क्षेत्रांपैकी मी आज फक्त एकाच पैलूवर भाष्य करत आहे. *ते म्हणजे समता आणि मानवता.* या नाशिक जिल्ह्यात समतेचा पाया सर्वप्रथम कोणी घातला असेल तर तो कर्मवीर भाऊसाहेब हिरे या लोकोत्तर पुरुषानेच...

देश पारतंत्र्यात असतांना समाज अशिक्षित असतांना वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1925 साली आपल्या जन्मगावी सत्यशोधक चळवळींचा प्रचार प्रसार सुरू केला. प.पू.ठक्कर बाप्पा यांच्या आदेशानुसार 1941-42 साली मालेगाव येथील सौदाने या गावी आदिवासी शाळा तसेच छत्रालय सुरू केले. एवढेच नव्हे 1945 साली आदिवासी सेवा समितीची स्थापना करून या वंचित, शोषित पीडित समाजाच्या चंद्रमौळी झोपडीत ज्ञानाचा प्रकाश पाडून वर्षानुवर्षाचा अंधार दूर करण्याचे महान कार्य करणाऱ्या या समतेच्या सात्विक पुजाऱ्याच्या भूमीत स्वार्थी, सत्तांध लोकांनी विषमतेची बीज रोवून सत्तेची फळं चाखण्याचा दुर्दैवी आत्मघातकी प्रकार केला आणि *समता* फक्त राजकारणात सोयीने वापरला जाणारा एक गुळगुळीत शब्द मात्र राहून गेला. सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुलेंनी फार पूर्वीच म्हटले होते की,

*आनंद करावा।। भांडू नये*
*धर्म,राज्य भेद मानवा नसावे*

*सत्याने वर्तावे ईशासाठी।* लोकराजा सयाजीराव गायकवाड , कर्मवीर भाऊसाहेब हिरे या पुण्यपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बहुजन हिताय, बहुजन सुखाय तर जाऊ द्या मात्र गेल्या दोन तीन दशकात शेती, शिक्षण, सिंचन, सहकार, तसेच न्याय, बंधुता, समता या तत्वांचा जणू विसरच पडत चालला आहे की काय असे वाटू लागले आहे. याचे राहून राहून दुःखही होते. मनाला अनंत यातनाही होतात. सारेकाही दिसत असून समजत असून मुकदर्शक बनून फक्त बघ्याची भूमिकेमुळे आपल्याला निष्क्रियतेचा आपमतलबीपणाचा शाप लागतो की काय याची भीती येथील संवेदनशील जनमानसाला वाटू लागली आहे.

या जिल्ह्याचा, तसेच मालेगाव तालुक्यातील राजकारणाचा हा काय दैवदुर्विलास म्हणवा की ज्या भाऊसाहेब हिरेंनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी लोकांच्या मनात परस्पर विश्वास निर्माण व्हावा म्हणून जाणीवपूर्वक मुस्लिमबहुल ठिकाणी म्हणजेच मामलेदार गल्लीत आपला संसार थाटला. दोन धर्मीयांत कधी कटुता येऊ दिली नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करत राहिले, त्यांच्या या कार्यामुळे लोकांना भाऊसाहेब *मसीहा* वाटू लागले होते. परंतु *याच मानवतेच्या उपासकाच्या भूमीत त्यांचाच लोकहिताचा, मानवतेचा दिव्य वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक वारशाचा शेवट एका धार्मिक दंगलीतून व्हावा* यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असणार या तालुक्याचे ! पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली झाले असे जे म्हटले जाते ते हेच का? असा प्रश्न पडतो.

हे ही कमी की काय जातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीसाठी कार्य करणाऱ्या समतेच्या पुजाऱ्याच्या सामाजिक कार्याचा शेवटही जातीय अभिनिवेशातून व्हावा. *समतेच हेलीकॉप्टर आकाशात गिरक्या घेत घेत आपली दिशा चुकलं,भरकटल आणि विषमतेच्या राजकीय टोळीत अदृश्य झालं* परिणामी पुन्हा एकदा सामाजिक समरतेचे कैवारी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या बहुजन हिताच्या कार्याला खीळ बसली. याचे शल्य आजही या लोकहितावादी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. कर्मवीरांच्या तसेच, लोकनेत्यांच्या जयंती वा पुण्यतिथीच्या निमित्ताने तर ही जाणीव अधिकच तीव्र होत जाते, *पुण्याचे भागीदार होण्याचे भाग्य आमच्या पिढीच्या वाटेला आलेच नाही मात्र पापाचे साक्षीदार होण्याचे नाहक दुर्भाग्य आमच्या वाटेला आले असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते* कदाचित चंगळवादी तमोगुणाच्या अतिरेकी वृत्तीमुळे, मतलबीपणाच्या संकुचिंत मनोवृत्तीमुळे, सामाजिक, राजकीय जीवनातील प्रत्येक घडामोडींबाबत उदासीनता बाळगत निष्क्रियता दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्या तालुक्यातील भावी पिढीचे भवितव्य अंधकारमय होत आहे हे मात्र नक्की, म्हणून कर्मवीरांच्या कार्याचा विचारांचा जागर करणं अगत्याचे झाले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की *,"समाज शिक्षित झाल्याशिवाय खरी लोकशाही तसेच लोकशाहीची मूल्य सत्यात येणार नाही"* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या ज्ञानतपस्वीची ही भावना किती यथार्थ होती याची जाणीव आज प्रकर्षाने होत आहे. मात्र कर्मवीर भाऊसाहेब हिरे नावाच्या शिक्षणतपस्वी ने या लोकशिक्षणाचे महत्व फार पूर्वीच जाणले होते म्हणूनच *जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ प्रदेशात(धुळे,ठाणे,डांग कुलाबा) जवळ जवळ पंधराशे व्हॉलेंटरी शाळा,दोन हजार शिक्षक आणि पंचेचाळीस हजार विद्यार्थी अशी एक लोकशिक्षणाची जणू एक चळवळच उभारून टाकली होती* एवढेच नव्हे तर ग्रामीण शिक्षणाची सुरुवात करून असंख्य शाळा सुरू केल्या. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे तेव्हाही सत्य होते ते आजही सत्य आहे.
कधी जातीच्या, कधी धर्माच्या नावावर राजकारण करून माणसे, मने दुभंगवून, कधी गरीबीचे, कधी सामान्यपणाचे सोंग ढोंग करून करोडोची माया जमवणाऱ्या *राजकीय भोप्यांनी* राजकारणाचा स्तर इतका निम्न पातळीवर आणून सोडला आहे की, कर्मवीरांसारख्या महापुरुषाचे तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार लोकहिताचे कार्य करणाऱ्या लोकहितवादी, तत्वनिष्ठ राजकीय लोकांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीसमोर मांडताना, समजावून देताना किती दमछाक होते हे न बोललेलच बरं. माणसा -माणसात, घराघरात, भावा-भावात समाजा-समाजात, गावा-गावात भांडणे लावून राजकारण करण्याचा कपाळकरेंटपणा जनतेच्या नशिबी येणं हे किती वेदनादायी आहे ! आणि याच हलकट, हेकट, रोगट सत्ता, पदासाठी लापट राजकीय प्रवृत्तीमुळे सभ्य, सत्वशील, कृतीशील लोकांना *नको ते राजकारण म्हणण्याच्या स्थितीपर्यंत आणून सोडले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते*

यासंदर्भात मला कर्मवीर भाऊसाहेबांचा एक प्रसंग सांगावासा वाटतो,मालेगाव मतदारसंघात 1957 च्या निवडणुकीत भाऊसाहेबांच्या विरोधात *वऱ्हाणे येथील कौतीक आनंदा पवार हे उभे होते* भाऊसाहेब प्रचाराच्या निमित्ताने वऱ्हाणे गावी गेले असता लोकांसमोर प्रश्न पडला की,मतदान कोणाला करावे आपल्याच गावातील उमेदवाराला की लोकहितार्थ कार्य करणाऱ्या भाऊसाहेब हिरेंना? लोकांच्या मनातील द्विधा भाऊसाहेबांनी ओळखली. गावातील लोकांसमोर भाषण करतांना भाऊसाहेब म्हणाले, " लोकहो! निवडणुका येतात, निवडणुका जातात. मात्र गाव सदैव राहील, तुम्हाला एकमेकांशिवाय पर्याय नाही,म्हणून गावात सलोखा राहिला पाहिजे, एकमेकांत राजकारणामुळे कटुता यायला नको, गावातील लोकांमध्ये वितृष्टता येऊ द्यायची नसेल तर तुम्ही कौतिक आनंदा पवार यांनाच मतदान करावं अशी माझी इच्छा आहे.

*आपल्या प्रतिस्पर्ध्याला मतदान करा हे सांगण्याचे औदार्य दाखवणाऱ्या भाऊसाहेबांसारख्या विशाल हृदयाच्या राजकारण्याच्या भूमीत फोडा फोडी, तोडा तोडी, झोडा झोडी, पाडा पाडी करून राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या भंपक राजकारण्यांनी भाऊसाहेब वाचावे, समजून घ्यावे* जेणेकरून आपल्या उर्वरित आयुष्याला अन भावी पिढीच्या उज्वल भविष्याला चालना तरी मिळेल, काही दिशा बोध तरी होईल.

समर्पित वृत्तीने बहुजन हितासाठी आयुष्य झिझवणाऱ्या, या कर्मयोग्याच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा या जिल्ह्यात, तालुक्यात विकासाचे, समताधिष्ठित लोककल्याणाचे बहुजन हिताचे, बहुजन सुखाचे वारे वाहू लागोत. *सत्तेच्या शोधात सत्व विकणाऱ्या संकोचिंत मनोवृत्तीच्या राजकीय नेतृत्वापेक्षा 'सत्य'शोधनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नव्या नेतृत्वाची,सत्यशोधक समाजाची मंगलकामना करूयात. *थोडीशी पानगळ झाली म्हणून झाडाचे अस्तित्व संपत नाही, काहिक्षण ढग आडवे आल्याने सूर्य झाकोळून गेला म्हणून सूर्याचे तेजाळण, उगवण थांबत थांबत नाही, स्वार्थप्रेरीत राजकारणात अनेक भरती, लाटा येतात आणि जातात, लाटा कीतीही प्रचंड असू देत मात्र एकदिवस त्या ओसरतातच, त्यांना ओहोटी लागतेच* ...मात्र पुरुषार्थाने लोकहितासाठी केलेली लोककल्याणकारी महद कार्य विशाल समुद्रासारखी धीरगंभीरपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. कर्मवीर भाऊसाहेबांसारख्या थोर पुरुषांची कार्य अशा प्रकारची आहेत.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या विचाराने,नव्या जोमाने, नव्या उर्मीने समाजहितासाठी झटत राहणं त्यातून सदैव स्फुर्ती घेऊन कर्मनिष्ठा जपत राहणं हेच सुखी,संपन्न,उन्नत सुरक्षित समाजासाठी आज गरजेचं झालं आहे. म्हणून *कर्मवीर भाऊसाहेब हिरे या समतेच्या पुजाऱ्याची जयंती म्हणजे बहुजन हिताच्या उन्नती, विकासाचा,सामाजिक समरसतेचा,समतेचा एक आनंद सोहळा म्हणून साजरा करूयात.*

प्रा. अनिल देवरे

*"कर्मवीर भाऊसाहेब हिरे: महाराष्ट्राच्या पायाभरणीचे दिव्यकर्तृत्व"*

" इ.स. २०व्या शतकाच्या पुर्वाधित ज्या थोर पुरुषांनी बहुजन समाजाची मनोभावे सेवा करुन भारतास उन्नती पथावर आणण्याचे सफल प्रयत्न केलेत त्यामध्ये भाऊसाहेब हिरे यांची गणना इतिहास अवश्य करील. महाराष्ट्राच्या राजकारणात भाऊसाहेब हिऱ्याप्रमाणे चमकून गेले. - (चिंतामणराव देशमुख.)

महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वतःच्या स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या दुरदृष्टी, राजकारणातील सैद्धांतिक कळवळ, निस्सीम देशभक्ती, मराठी मातीचा लळा, अनुशासन, वैचारिक अधिष्ठान, कष्टकरी, शेतकरी, बारा बलुतेदार व सामान्य माणसांच्या हिताची काळजी करनारे लोकोत्तर नेतृत्व म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे होय!

"प्रतिष्ठा यत्र विद्याया: शीलस्यच श्रमस्यच |
उन्नते: शिखर राष्ट्रं तत्प्राप्नोति न संशय:||"

यानुसार आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात हिमालयाच्या उंचीचे अफाट कर्तृत्व गाजवलेल्या या महान कर्मवीरांनी विद्येला, चारित्र्याला आणि श्रमाला शोषीतांच्या जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देत त्यांच्या जीवनात नवसंजीवनी फुलविण्याबरोबर 'कर्मण्येवाधिकारस्तू' या सुत्राने सदैव कार्यरत राहत सामाजिक चळवळ, राजकारण, सहकार, शिक्षण, अर्थकारण, कृषी, जलसिंचन व उद्योग यांमाध्यमातून महाराष्ट्र राज्याला उन्नतीच्या शिखरावर नेऊन पोहचविण्यात बहुमुल्य गौरवशाली कामगिरी बजावली.

अंधाराला हरवणारी स्फूर्तीज्योत व तेजसुर्य कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा जन्म ०१ मार्च १९०५ रोजी निमगाव (ता.मालेगाव) येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला कर्मवीर चिकाटी, सचोटी व दुर्दम्य महत्वकांक्षा या जोरावर नाशिक येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत असताना नाशिक हे क्रांतिकारकांच्या कटकारस्थानाचे शक्तिशाली केंद्र होते या सर्व घटनांच्या परिणामांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची आस असलेल्या भाऊसाहेबांना स्वातंत्र्यसंग्रामात ओढले. स्वातंत्र्यासाठी कठोर तरुंगवास भोगला. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना व त्यातून संयुक्त महाराष्ट्राचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी स्वतःचे राजकीय अस्तित्व पणाला लावून दिल्ली दरबारी न झुकता मराठी मातीचा लळा असलेल्या या स्वाभिमानी व प्रामाणिक नेतृत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सुवर्ण अक्षरात स्वकर्तृत्वाचा चिरस्मरणीय ठसा उमटवला व यानंतर महाराष्ट्र राज्याची विकासात्मक पायाभरणी करत असताना या तेजोमय कर्मवीर लोकनेत्याने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला जमीनदारांच्या व जुलमी सावकारांच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ऐतिहासिक कायदा(Tenancy Act) मंजूर करून मराठी जनमानसात नवचैतन्य फुलविले. महाराष्ट्रातील अज्ञानाच्या गर्तेत अडकलेल्या बहुजन समाजाच्या भवितव्याला कलाटणी देण्यासाठी तत्कालीन शिक्षणाचा एकाधिकार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या उच्चभ्रु लोकांकडेच एकटवलेला होता त्याला तडा देत त्यांचे स्वामित्व संपुष्टात आणीत; संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानप्रकाश पसरविण्याचा अविरत झपाटा लावला. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या माध्यमांतून कर्मवीर भाऊसाहेबांनी बहुजन-हरिजन-गिरीजन ते सामान्यातील सर्वसामान्यांचे जीवन उजळून टाकीत राष्ट्रलोककल्याणाचे महान कार्य उभारले. यांतून अनेक शिक्षक, इंजीनिअर, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, समाजसेवक, राजकारणी, पत्रकार,उद्योजक, कलाकार असे अनेक रत्न घडले.यानंतर या महान कार्यसम्राट लोकराजाने शेतकरीपुत्र या नात्याने शेतकऱ्यांचे कैवारी होत त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सहकाराचा मूलमंत्र दिला. या माध्यमातून खासकरून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी निफाड सहकारी कारखाना, गिरणा सहकारी साखर कारखाना,नाशिक जिल्हा सहकारी बँक, नाशिक जिल्हा कृषी-औद्योगिक संघ, तालुका शेतकरी संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांसारख्या अनेक सहकारी संस्थांचे जाळे विणून कोयना, गिरणा व झाडी धरणांची निर्मिती केली.यासर्वांचा परिपाक म्हणजे नाशिक जिल्हा विकासाच्या बाबतीत या दुरदर्शी नेतृत्वाच्या प्रज्वल कामगिरीमुळे उज्वल होऊन सर्वच आघाड्यांवर पुढारला गेला. स्वयंप्रकाशित, क्रांतिकारी, सामान्यातील सामान्यांचे अफाट उर्जाकेंद्र, मातीशी इमान राखनारे नेतृत्व...भुमीपुत्रात चैतन्य निर्माण करणारे कर्तृत्व...निस्वार्थ लोकसेवेमुळे खान्देशच्या मातीत जन्मलेल्या या महामानवाच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र चंदनाप्रमाणे दरवळत आहे. दुःखाच्या मुलखातील प्रकाशयात्री ठरलेल्या या महान कर्मवीरांचा खालील पंक्तीत यथार्थ महिमा गाइला जावू शकतो:

"ज्ञानाचे गाणे, सुर्याची भाषा
तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा.
बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने;
घरे मोडकी उभी राहिली तुमच्याच आधाराने"
महाराष्ट्राच्या पायाभरणीचे दिव्यकर्तृत्व ठरलेल्या
 चंदनाच्या वासे । तरु चंदन जाले स्पर्शे॥

अशा नवसृष्टीच्या भाग्यविधात्यास विनम्र अभिवादन!!!!!! ---- प्रा.हिरालाल नरवाडे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌷🙏

स्त्रोतपर माहिती

आगामी झालेले