नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

उमाजी नाईक

उमाजी नाईक

जन्म : ७ सप्टेंबर १७९१
मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२
हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे..मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?"
तर टॉस म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्याकाळात लिहिणे वाचणे शिकलला .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्र सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
** विनम्र अभिवादन  **
स्रोतपर माहिती 

आगामी झालेले