नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

क्रांतिकारक वीर भागोजी नाईक Bhagoji Naik


क्रांतिकारक वीर भागोजी नाईक Bhagoji Naik 

वीरमरण : ११ नोव्हेंबर १८५९
भारताचा स्वातंत्र्यलढा अनेक शूरवीरांनी लढला. देशासाठी कित्येकांनी प्राण सांडले. मात्र इतिहासाने यातील प्रत्येकाची नावे आपल्या पर्यंत पोहचवलीच असे नाही. अशाच अज्ञात क्रांतीवीरामध्ये नाव येतं भागोजी नाईक यांचं.

भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे इथे एका भिल्ल कुटुंबात झाला. त्यांचे वडील कोतवाल होते मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. शिक्षण घेण्याची ऐपत नव्हतीच, भागोजी लहानपणापासून आपल्या सोबत्यांच्या बरोबर गुरे राखायला जायचे.

रानावनात भटकताना काठी फिरवणे, तीरकमठा चालवणे अशा कलांमध्ये ते पारंगत झाले. एकदा त्यांच्या कळपातील एका वासरावर वाघाने हल्ला चढवला. त्याचे रक्षण करण्यासाठी भागोजी वाघावर चालून गेले. फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर त्यांनी वाघ मारला. त्यांच्या या शौर्याचं कौतुक पंचक्रोशीत पसरलं.

वाघ मारणाऱ्या या तरुणाला इंग्रज कंपनी सरकारने पोलिसात नोकरी दिली.

रानावनात स्वातंत्र्य प्यायलेले भागोजी ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या नोकरीत फार काळ टिकणे शक्य नव्हते. नगर इथे अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांचा वरिष्ठांशी वाद झाला. ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या लढ्याच्या कहाण्या भागोजींनी ऐकल्या होत्या, आणि आपल्याच लोकांच्या विरोधात कारवाई करणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला मानवत नव्हते.

‘भागोजी क्रांतीकारकांना साहाय्य करतो’, असा संशय इंग्रज अधिकार्‍याना येऊ लागला. त्यांनी त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावून बडतर्फ केले.

*भागोजी तुरुंगातून बाहेर पडले ते स्वातंत्र्याची शपथ घेऊनच.* अकोले, संगमनेर, सिन्नर, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्लांनी केलेल्या उठावाचे प्रेरणास्थान होण्यात भागोजी नाईकांचे नाव आघाडीवर होते. युध्द करणे त्यातही इंग्रजांसारख्या बलशाली शत्रूबरोबर युध्द करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी मनुष्यबळ, आर्थिकबळ, शस्त्रास्त्रे नियोजन, सावधपणा यांची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भागोजीने तशी तयारी केली.

अठराशे सत्तावन्नचा हा धगधगता काळ. संपूर्ण देशात इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष पसरला होता. ठिकठिकाणी उठाव होत होते.

भागोजी नाईक यांनी इतर ठिकाणी उठावाच्यादृष्टीने ज्या हालचाली सुरू होत्या, त्यांच्याशी संपर्क वाढवला. निजाम राज्यातून काही मदत मिळवली. याच काळात खान्देशात ब्रिटीश विरोधात काजीसिंगने (कजरसिंग) उठाव केला होता. सुरूवातीच्या काळात ब्रिटीशांनी या हालचालीकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही.

भिल्ल कोळ्यांचा उठाव म्हणून ब्रिटीशांनी याकडे सुरवातीला दुर्लक्ष केले, याचा फटका त्यांना बसला.

भागोजी नाईक यांनी राहुरी पर्यंत आपला विस्तार वाढवला. अनेक क्रांतिकारी युवक त्यांना सामील झाले. त्यांच्या कारवाया वाढलेल्या पाहून इंग्रजांनी त्यांच्यावर कारवाई करायचे ठरवले.

या आदिवासी वीराचा बंदोबस्त करण्यासाठी ४ ऑक्टोबर १८५७ रोजी ब्रिटीश सुपरिटेंडेंट जेम्स विल्यम हेन्री निघाला. त्याच्याबरोबर टेलर आणि थँकर यांच्या हुकूमतीखालील फलटणी होत्या.

नांदूर शिंगोटय़ाजवळ भागोजी नाईक आणि ब्रिटीश सैन्यात लढाई सुरू झाली. पहिली चकमक नांदूर शिंगोटय़ामधील टेकडय़ात झाली. त्यावेळी हेन्रीने भागोजीला शरण येण्यासाठी निरोप पाठविला. परंतु स्वातंत्र्य मिळवण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीने प्रेरित झालेल्या भागोजीने तो निरोप धुडकावून लावला. भागोजीचा नकार ऐकताच हेन्रीने जोराची चढाई केली. झालेल्या चकमकीत प्रथम हेन्रीचा घोडा भागोजीच्या बंदुकीला बळी पडला. त्यामुळे भागोजीच्या सैन्यात जोम निर्माण झाला. भागोजीने मारलेल्या दुसऱ्या गोळीला हेन्री बळी पडला. थँकरने आपल्या दोन्ही फलटणीसह माघार घेतली.

*हेन्री जिथे मारला गेला तिथे त्याच्या पत्नीने समाधी उभारली आहे.*

हेन्रीच्या सेनेचा पराभव केल्यावर भागोजींच्या सहकाऱ्यांमध्ये आणि सैन्यात उत्साह वाढला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर ठिकाणच्या भिल्लांनीही उठाव केला. राहुरी भागातील पाथर्जी नाईक यांनी देखील उठाव केला.

यामुळे पिसाळलेले इंग्रज भागोजींच्या मागावर होते. त्यांनी भागोजीचा भाऊ महिपती आणि नंतर मुलगा यशवंत असे कुटुंबातील प्रमुख ठार केले पण तरीही भागोजी नाईकांनी क्रांतीची मशाल खाली ठेवली नाही. इंग्रजांच्या बरोबर त्यांच्या तीन लढाया झाल्या.

अखेरची लढाई सिन्नर तालुक्यातील मिठसागरे, पंचाळे व सांगवी या भागात झाली. समोरासमोरच्या लढाईत इंग्रजांना भागोजीवर विजय मिळविणे शक्य नव्हते आणि याचा त्यांना आधीच अंदाज आला होता. म्हणूनच त्यांनी फितूरीचा मार्ग अवलंबला. पंचाळेतील पाटलाने मिठसागरे येथील इंग्रज अधिकारी फ्रँक सुटर याला भागोजी नाईक पंचाळेत असल्याची खबर दिली. इंग्रजांनी रात्रीतून पंचाळेला वेढा दिला.

*११ नोव्हेंबर १८५९ ची ती काळरात्र*

खंडेराव काळे यांच्च्या घरात लपलेल्या भागोजीना कल्पनाच नव्हती की आपल्याला इंग्रज सेनेने संपूर्णपणे वेढले आहे. ते घरातून बाहेर पडले आणि इंग्रज सैनिकांनी थेट गोळीबार सुरु केला. इंग्रजांना प्रतिउत्तर देत स्वतःचा जीव वाचवत भागोजी नाईक व त्यांचे साथीदार सांगवीच्या दिशेने निघाले.

सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर घनघोर युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांच्या गोळीने भागोजींचा ठाव घेतला. त्यांना वीरमरण आले. भागोजींच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले व त्यांची समाधी उभारली.

भागोजी नाईकां ची समाधी उभारली म्हणून इंग्रजांनी सांगवीकरांचा प्रचंड छळ केला. त्यांनी आपल्या क्रांतीविरासाठी हि लढाई लढली म्हणूनच सांगवीला लढाईची सांगवी म्हटले जाऊ लागले. पुराच्या तडाख्यात या समाधीचेही प्रचंड नुकसान झाले होते पण सांगवीमधील तरुणांनी त्यांचा डागडुजी करून आणली.

इतिहास भागोजी नाईकांच्या शौर्याला विसरला मात्र सांगवीच्या ग्रामस्थांनी हा ठेवा जपला. आजही गोदावरीच्या संगमावर हि समाधी उभी आहे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷

स्त्रोत~ bolbhidu.com

आगामी झालेले