नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शंकरराव भाऊराव चव्हाण

 शंकरराव भाऊराव चव्हाण
   (महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री )
जन्म : 14 जुलै 1920
मृत्यू  : 26 फेब्रुवारी 2004 (वय 83)
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आयएनसी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री*
कार्यकाळ २१ फेब्रुवारी १९७५ – १६ मे १९७७
मागील : वसंतराव नाईक
पुढील : वसंतदादा पाटील
कार्यकाळ १२ मार्च १९८६ – २६ जून १९८८
मागील : शिवाजीराव निलंगेकर
पुढील : शरद पवार

डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.

कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण १९५२ ते २००२ असे एकूण ५० वर्षे सत्तेत होते़

राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण १९५२ ते २००२ असे एकूण ५० वर्षे सत्तेत होते़ कोणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची उज्ज्वल राजकीय कारकीर्द होती़ सत्ता ही बहुजन हितार्थ राबवावी हा थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेला कानमंत्र शंकररावजींनी अखेरपर्यंत सांभाळला़ सत्तेसाठी कधीही मुद्दाम प्रयत्न केले नाहीत की लाजीरवाण्या खटपटी केल्या नाहीत़ त्यांचे नेतृत्वच इतके विलक्षण होते की, पदे त्यांच्याकडे अक्षरश: आपणहून चालत आली़ निष्कलंक चारित्र्य हे त्यांचे बलस्थान राहिले़. कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शंकररावजींची राजकीय कारकीर्द सदैव चढती राहिली़ राज्याचे चौथे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २१ फेब्रुवारी १९७५ रोजी शपथ घेतली़ त्यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले़ १९७५ ते ७७ तसेच १९८६ ते ८८ असे दोन वेळा ते मुख्यमंत्री झाले़ त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा प्रभाव होता व स्वामींच्या सोबत ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातही अग्रणी राहिले़
आपल्या राजकीय कारकिर्दीत २० पेक्षा जास्त खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला़ जायकवाडी, विष्णूपुरी, इसापूर, उजनी या धरणांबरोबरच भीमा व पैनगंगा नदीवरील धरणांची योजना राबविली़ कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, तितरी, सूर्या, अप्पर वर्धा, पेच, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्णा, मुळा अशा कितीतरी प्रकल्पांच्या कालव्यांतून वाहणारे पाणी शंकररावांच्या कर्तृत्वाची गाणी गात आहे़ हे प्रकल्प सिद्धीला नेण्यासाठी त्यांनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळेच शंकररावजींना आधुनिक भगीरथ असे संबोधले जाते़ राज्याच्या जलसंस्कृतीचे जनक असाही त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो़ पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये म्हणून विरोधकांनी रान पेटविले होते़ शंकररावजींच्या खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती़ विरोधकांना विचार पटवून देऊन, शक्य नसेल तर प्रसंगी विरोध पत्करून शंकररावजींनी नाथसागर साकार केला़ शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या सिंचन क्षमतेचा बारकाईने अभ्यास केला होता़ तो व्यासंग पाहून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंजिनिअर व केंद्रीय मंत्री के.एल़ राव हे देखील चकित झाले होते़ शंकररावांनी ज्या खात्याचा कारभार सांभाळला, तिथे शिस्त लावण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्या शिस्त व परखडपणाबद्दल खुद्द दिवंगत पंतप्रधान पी़ व्ही़ नरसिंहराव म्हणाले होते, ‘आजही काही गोष्टी परखडपणे सांगायच्या असतील, तर मी शंकररावांना पुढे करीऩ शब्द किती निखळ असतात, हे अशावेळी जाणवते’. लोकरंजनापेक्षा लोककल्याण हेच शंकररावजींचे जीवितध्येय होते़ त्यासाठी त्यांनी कधी खोटा लोकानुनय केला नाही़ निवडणुकींवर नजर ठेऊन नव्हे, पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून निष्काम भावनेने राजकीय, रचनात्मक कार्य केले़ त्यामुळेच विरोधकही त्यांच्याकडे कधी बोट दाखवू शकले नाहीत़ ते म्हणत, व्यक्तीच्या बोलण्यातून आणि आचरणातून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजावर उमटत असतो़ समाज जीवनाशी ज्यांचा संबंध असतो, अशा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी जनहिताची कामे करताना दिलेला प्रत्येक शब्द म्हणजे अलिखित वचन असेच मानले पाहिजे़ त्याच्या पूर्ततेसाठी परिश्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे़ त्यांच्या या विचारसरणीसमोर पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेतेही सदोदित नतमस्तक राहिले़ शंकरराव चव्हाण केंद्रात मंत्री असताना भाजपाचे नेते सिकंदर बख्त राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते़ कवीवृत्तीच्या बख्त यांनी म्हटले, ‘सरत चाललेल्या पिढीतील शंकरराव चव्हाण हे आशेचे किरण आहेत़ राज्यसभेत आमची नजरभेट होत नाही, तर आमची दिलं एकमेकांना भेटतात़’ दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांच्या भाषणांमधून शंकररावजींचा झालेला गौरव महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आहे़ शंकररावजींनी आपल्या हयातीत डोंगराएवढी कामे केली़, परंतु त्या कामाचा गाजावाजा केला नाही़ काम करताना निष्ठा व श्रद्धांशी तडजोड केली नाही़ त्यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला सदैव सर्जनशीलतेची, उद्यमशीलतेची आणि सुसंस्काराची सदोदित प्रेरणा देत राहील.

 स्मरणार्थ:
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथील डॉ
शंकरराव चव्हाण सभागृह, एसजीजीएस स्टेडियम जवळ एनडब्ल्यूसीएमसीचे डॉ शंकरराव चव्हाण स्मारक, व्हीआयपी रोड,
शंकरराव चव्हाण चौक कामठा-नांदेड,
शंकरराव चव्हाण चौक चिमेगाव-नांदेड,शंकरराव चव्हाण गार्डन अँड लायब्ररी,सिडको,नांदेड
       🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏
♾♾♾ स्त्रोतपर माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले