नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

कित्तूरची राणी चेन्नम्मा जन्मदिन

राणी चेन्नम्मा

 *जन्म :  23 ऑक्टोबर 1778**(बेळगाव , कर्नाटक)*
*वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829**(बैलहोंगल)*
कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच  ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करताना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.
             पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते.
            राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे.
           राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते.
          राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.
             दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले.
          एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना  बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.
             कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.
             राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव
'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता.
          आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य  करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते.
          थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा."
            राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे  राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले की, "कित्तूर एक स्वतंत्र  राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."
     राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर  १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे,
"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य  करायला लावले.'
           युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे,  हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण  उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .
देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व  इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.
             कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व  कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले, "कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला.
            स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो  दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता.  गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की,
"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.
             राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला.
          शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व  बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला.
          कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.
           रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,
 "आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही.
            त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ ऑक्टोबरला  कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
            त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏

स्त्रोत ~ महान भारतीय क्रांतिकारक
               - श्री. स. ध. झांबरे
संकलित ब्लॉग 

आगामी झालेले