नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मराठी भाषा गौरव दिवस २७ फेब्रुवारी

मराठी भाषा दिवस [मराठी भाषा गौरव दिन] (२७ फेब्रुवारी)
मराठी भाषा विषयी PPT फाईल पहा 👇👇
मराठी भाषा दिवस PDF फाईल 

 लिंक वर क्लिक करा आणि चाचणी सोडवा.



मराठी अभिमानगीत हे मराठीतील एक गीत आहे. हे गीत मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. ३५६ गायक, एक गाणे, एक गीतकार, एक चाल, एक ताल असे या गाण्याचे स्वरूप आहे.


ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज 'मराठी भाषा दिन' साजरा होत आहे त्या निमिताने आपण ही चला करुया साजरा मराठी भाषा दिवस.
आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
उपक्रम - साहित्य वाचन, पथनाट्य, पुस्तक परिचय करून देणे, ग्रंथदिंडी, कथाकथन, माहितीपट, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा
🏆🏆मुलांनसाठी व पालकांनसाठी विविध कार्यक्रम तथा स्पर्धा --
1) वाचन कट्टा -- कविता वाचन, लेख वाचन, गोष्टी वाचन (चढ उतार सह, आरोह अवरोह सह )
2) मराठी कोणत्याही एका अक्षर पासून सुरु होणारे जास्तीत जास्त शब्द 1 किंवा 2 मिनिटात लिहिणे.
3) हस्ताक्षर स्पर्धा
4) मराठी घोषवाक्य स्पर्धा जास्तीत जास्त घोषवाक्ये  1 किंवा 2 मिनिटात लिहिणे.
5) निबंध लेखन स्पर्धा

🎤🎤मराठी घोषवाक्य
१)  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
२)  माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी .
३)  माझ्या मराठी ची बोलू कौतुके
गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके.
४)  मराठी हि असे आमुची राजभाषा,
सरकारी दरबारी घोळवी हीच मनीषा.
५)  अभंगांचा रचुनी पाया,
संतानी घडवली मराठी ची काया.
६)  साहित्याचा वारसा चालवूया गडे,
मराठी पाऊल पडते पुढे.
७)  उखाणा घेण्याची गम्मत खरी,
मराठी भाषेशी न करावी कोणी बरोबरी.
८) बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.
९) आपणच आपणासी तारी,
मराठीची किमिया न्यारी.
१०) जिच्यासाठी केला होता अट्टहास,
थांबवा आता आपण मराठीचा ऱ्हास.
११) काना-मात्रा वेलांटीनी नटली मराठी,
व्याकरणशुद्ध बोलून लेवूया ललाटी.
१२) आपणच आपल्या उद्धारासाठी
चला बोलूया मराठी मराठी.
१३) माझी मराठी माझी मराठी,
सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
१४) परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी,
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका!
१५) परदेशात वाजती मराठीचे चौघडे, मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे.
१६) मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु दया, मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू दया.
१७) मी मराठी भाषा मराठी, प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी.
१८) मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण.
१९) मराठी भाषा गोड,वाढवी शिक्षणाची ओढ.
२०) विकासाचे प्रगतीचे महाद्वार,मराठीचा झेंडा अटकेपार. 
२१) मराठी माझा अभिमान,मराठी माझा स्वाभिमान.
२२) मराठी भाषा नांदे जिथे, ज्ञानाचा काय उणे तिथे.
२३) ध्यास मराठीचा मनी रुजवा, मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.
२४) माझ्या मराठीचा जागर जागर, भरू ज्ञानाची घागर घागर.
२५) मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा धरू.
२६) मराठीला देऊनिया आकार, कुसुमाग्रजांचे स्वप्न करू साकार.
२७) मराठी भाषा पोहचवू घरोघरी, नांदल सर्वत्र ज्ञानाची पंढरी.
२८) व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास, चला धरूया मराठीची कास.
२९) आपण बाण शान, मराठी असे आपुला पंचप्राण.
३०) ध्यास मराठीचा मनी रुजवा, मराठी अस्मिता मनी रुजवा.
३१) वाहते रक्तातं माझ्या मराठी गर्वांना सांगतो, आहे मी मराठी, संस्कृती माझी माय ती मराठी. अभिमानाची ती माय मराठी !
३२) अभंगाचा रचूनी पाया, संतानी घडवली मराठीची काया.
३३) जय जय महाराष्ट्र माझा, मनोमनी बसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा, नभी गर्जतो जय महाराष्ट्र माझा!
३४) आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी मातीशी !

👉👉 प्रतिज्ञा मराठीची:
मराठी ही माझी मातृभाषा आहे. मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे. माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन. इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन. त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत. जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत. महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे. मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.
मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन. मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.
मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.
जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!
(प्रतिज्ञा सौजन्य म टा )

मराठी... लहानग्यांत खेळणारी... दिशांदिशांत दाटणारी... नभांतून वर्षणारी... नद्यांमधून वाहणारी आणि मदांध तख्त फोडणारी भाषा. या मायमराठीचे असंख्य विभ्रम बोलते झाले आहेत कविवर्य सुरेश भट यांच्या या रचनेतून...
👉👉 मराठी अभिमान गीत
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

                 ~सुरेश भट
                    (कवी)

👉👉 खरा स्वधर्म

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !
माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !
बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ
शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी
जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

- शांता शेळके
(कवयित्री)

🎤🎤👉महाराष्ट्र गीत
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण
वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
गीत - चकोर आजगावकर

👉🎠🎠"सलाम कवि कुसुमाग्रजाना!!"

म्यानातुनि उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !
गीत - कुसुमाग्रज

👉👉‘माझ्या मराठीची गोडी’
.................
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत!

ज्ञानोबांची-तुक्यांची
मुक्तेशाची-जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास-शिवाजीची

‘या रे या रे अवघेजण
हाक माय मराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची!

डफ-तुणतुणें घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर!

नव्या प्राणाची ‘तुतारी’
कुणी ऐकवी उठून
‘मधुघट’ अर्पी कुणी
कुणी ‘माला’ दे बांधुन!

लेक लाडका एखादा
गळां घाली ‘वैजयंती’
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती
हिचें स्वरूप देखणें
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्रीं प्रभा दाटे
सात्विकाची-कांचनाची!

कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखीं वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवें रूप दावी
अवनत होई माथा
मुखीं उमटते ओवी!
- वि. म. कुळकर्णी

"इंग्रजी मध्ये 'A' फॉर *Apple* ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर *Zebra* वर येऊन संपते.शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते".
*पण*
मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला 'अ' म्हणजे *"अज्ञानी"* पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच *"ज्ञानी"* बनवून टाकते.

📖📖पद्य पाठावरुन कविता
विषय  _ मुळाक्षरे  ( इयत्ता  १ली  )
अ अ अननस  खाण्याची घाई नको करुस |
आ आ आई  काय ग किती करतेस घाई |
इ  इ इमारत  जाऊ आपण पळत पळत |
ई  ई ईडलिंबू  चल ना खेळू ग आंबू |
उ  उ उखळ  माझ्यासोबत तु ही पळ |
ऊ  ऊ ऊस  चला पीऊ त्याचा रस |
ए  ए एडका  तो पहा जुना वाडा पडका |
ऐ  ऐ ऐरण   घंटा वाजे घण घण |
ओ ओ  ओठ   आजीची दुखतेय पाठ |
औ  औ  औषध   माऊला पाजु दूध |
अं  अं  अंगठी   आजोबा मारतील काठी |
अ:   अ:   अ:    आरशात तुच बघ स्वतः |
क  क   कप    बोलू नकोस तु  गप |
ख  ख   खटारा   मला हवा मिठाईचा पेटारा |
ग   ग   गणपती  आता करूयात आरती |
घ   घ    घर    माझा आता हात धर |
च  च   चमचा   शाळेचा भात सर्वांनी खायचा |
छ  छ   छत्री   विकत घेऊ आपण संत्री |
ज  ज  जहाज   घरी  राहु नकोस तु आज |
झ  झ  झगा   दादाने घेतला निळा फुगा |
ट   ट  टरबूज    नदीला आलाय पूर |
ठ  ठ   ठसा     उभे का आपण आता बसा |
ड  ड   डमरू    फुलपाखराला नको धरू |
ढ   ढ    ढग     तुझे नाव काय सांग |
ण   ण   बाण    करायची नाही अजिबात घाण
त   त    तराजू   मोजून घेऊया  काजू |
थ   थ    थवा    ड्रेस घेतला मला नवा |
द   द दरवाजा  माझ्या भावाचे नाव आहे राजा
ध  ध    धनुष्य   आजी म्हणते नक्षत्र आहे पुष्य
न    न   नळ      गावाशेजारी  आहे एक तळं |
प   प   पतंग    खेळून खूप  दुखतय माझ अंग
फ   फ  फणस    पोट भरलेय माझ आता बास
ब    ब   बदक     खेळात मिळेल मला पदक |
भ   भ   भटजी   मिळाली का ताजी भाजी |
म   म    मका     उन्हात खेळायला जाऊ नका |
य   य     यज्ञ     दादाचे नाव  आहे आज्ञ |
र   र      रथ      आजीने दिली आईला नथ |
ल   ल   लसूण   बाळाला घातले पांघरून |
व   व     वजन   बाळ  हसले खुदकन |
श   श    शहामृग   जेवायला केलेत आज मूग |
ष   ष     षटकोन  मामाचा आला फोन |
स  स   ससा    दुखतोय ताईचा घसा |
ह   ह   हत्ती     बंद कर  ग बत्ती |
ळ  ळ   बाळ    आई भू भू  पाळ |
क्ष  क्ष   क्षत्रिय   तुला कोणी मारलेय |
ज्ञ   ज्ञ  ज्ञानदेव   बाळाचे नाव ज्ञाना ठेव |
सौ . वर्षा भोज पुणे

"मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

कदाचित माहीत नसेल, पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे. तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.
_________
क, ख, ग, घ, ङ - यांना कंठव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना तालव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. 
एकदा करून बघा 

ट, ठ, ड, ढ , ण- यांना मूर्धन्य म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. 

त, थ, द, ध, न- यांना दंतव्य म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना ओष्ठ्य म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा .
___________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

जय मराठी !
क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....
•••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश करू नका 
ख- खरं बोला
ग- गर्व नको 
घ- घमेण्ड करू नका  
च- चिँता करत राहू नका
छ- छल-कपट नको 
ज- जवाबदारी निभावून न्या
झ- झुरत राहू नका  
ट- टिप्पणी करत राहू नका
ठ- ठकवू नका  
ड- डरपोक राहू नका
ढ- ढोंग करू नका
त- तंदुरुस्त रहा 
थ- थकू नका 
द- दिलदार बना 
ध- धोका देऊ नका  
न- नम्र बना 
प- पाप करू नका  
फ- फालतू कामे करू नका  
ब- बडबड कमी करा
भ- भावनाशील बना 
म- मधुर बना 
य- यशस्वी बना 
र- रडू नका 
ल- लालची बनू नका
व- वैर करू नका
श- शत्रुत्व करू नका
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा 
स- सत्य बोला 
ह- हसतमुख रहा 
क्ष- क्षमा करा 
त्र- त्रास देऊ नका 
ज्ञ- ज्ञानी बना!

कृपया सर्व लोकांना पाठवा.
आणी मराठी बोला अभिमानाने! 
🙏🙏
 

1 टिप्पणी:

मराठी भाषण व सूत्रसंचालन म्हणाले...

🆕 मराठी राज भाषा दिन सूत्रसंचालन भाषण

marathi raj bhasha din bhashan

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले