होळी हा सण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणारा एक रंगाचा सण आहे. होळीच्या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी या उत्सवाला ” होलिका दहन “ किंवा ” होळी पौर्णिमा “ म्हणतात. तर काही ठिकाणी ” हुताशनी महोत्सव “, ” दोलायात्रा “, ” कामदहन “ अशा नावाने होळी सण साजरा होतो.
तर कोकणा मध्ये होळीच्या सणाला ” शिमगो “ म्हणतात. तसेच, देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने होळीच्या सणाला ” सुग्रीष्मक “ असे नाव दिले आहे. होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो.
फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा - हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळी शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पोटवून आनंद व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात.
तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात वीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे. विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.
होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा हा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत (रोहिणी नक्षत्र ) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे शिमगा हा शेतकरी मोठ्या उत्सवात साजरा करतात.
ग्रामीण भागात होळीसाठी लाकड गोवऱ्या-लाकडं गोळा केली जातात. गावच्या वेशीत एरंडाची फांदी उभी केली जाते. तिच्या भोवती लाकडं-गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो.
होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.
🎤🎤 होळी गाऱ्हाणे.....
देवा महाराजा, स्वामी समर्था ! माझे गावचे मर्यादा.. तुला हे नारळाचे भरलेले श्रीफळ ठेवलेले आहे, हा मान तुझा काढलेला आहे , तो पावन करून घे ........"व्हय देवा महाराजा "
आज तुझ्या साक्षिन हा होळीचा सन आम्ही साजरा करतोय. तेव्हा ह्या कार्यात तू सामिल होउन, तू तुझा मान पावन करून घे रे महाराजा .........."व्हय देवा महाराजा "
व्हय देवा ! हया ठिकाणवर देवा ! तुला हे नारळाचे फळ ठेवुण तुला मान देतोय. जर आमच्या कडुन तुझी सेवा करण्यात काय चूक झाली आसेल तर तुझी अज्ञान लेकरे समजुन, आमची चूक तुझ्या पोटात घाल...नी हा तुझा मान पावन करून घे बाबा, माझे महाराजा ...... "व्हय देवा महाराजा "
बाबा सिमेवरच्या देवचार तुला हा इडा (विडा) ठेऊन बोलवण करतोय तेव्हा तु तुझी जोडणी कर महाराजा ........"व्हय देवा महाराजा ".
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा..... "व्हय देवा महाराजा "
आज जो शिमग्याचा सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळुन साजरे करताय, त्यांचा तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असेल त दूर कर रे महाराजा....
"व्हय देवा महाराजा "
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केले असेल तर ते बाहेरच्या बाहेर निघुन जाऊं दे रे महाराजा......
"व्हय देवा महाराजा "
कोणाच्या घरात पाळणा हालत नसेल त्याच्या प्रत्येकाच्या घरात पाळणा हालु दे, काम धंद्यात सर्वाना भरपुर यश दे, पोरा टोराक शिक्षणात उज्वल यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या कृपेन जमवुन दे रे महाराजा......
"व्हय देवा महाराजा "
हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा........
"व्हय देवा महाराजा "
हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतात आणि जे करतात त्याचा नाय नाट कर रे महाराजा.....
"व्हय देवा महाराजा "
हे बघ देवा, मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गाऱ्हाणे घातलेय. शेरा चे सव्वाशेर व पाचाचे पंचवीस करून सगळ्यांना सुखात ठेव, नी वर्षानी वर्ष अशीच सेवा करून घे . नी सगळ्यांची रखवाली कर, चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगा खेळाय या आणि पाणी नाय वापरलात तर बरं होईल.
बोला होळी रे होळी,
पुरणाची पोळी
*** आपणा सर्वाना शिमग्याच्या मन:पुर्वक शुभेच्छा **
होळी ला घ्यायची काही काळजी
१) होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
२) तसेच आजकाल भांग मध्ये देखील बरेच अन्य नाशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अश्या पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.
३) चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये.
४) घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अश्या सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते.
५) सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा