
"मी स्वतंत्र आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी ब्रिटिशांचा गुलाम नाही. मी प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभर कमी नाही. छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात," असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत, ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा देत अवघ्या वीस वर्षांच्या राजांनी प्राणार्पण केले ते राजे , ते वीर हुतात्मा म्हणजेच 'कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज'. Kolhapur Chhatrapati chauthe Shivaji Maharaj
क्रांतिकारी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृतीदिन कोल्हापूर गादीच्या नवीन राजासाठी सात मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी खानवटकर घराण्याचे सावर्डे शाखेतील नारायण ह्या मुलास २३ ऑक्टोबर १८७१ रोजी पुढील कोल्हापूरचे छत्रपती म्हणून गादीवर बसविण्यात आले.
ह्या चौथ्या छत्रपतींचा जन्म ५ एप्रिल १८६३ रोजी झाला होता.
छत्रपती पदावर येते समई ह्या मुलाचे नारायण हे नाव बदलून चौथे शिवाजी महाराज असे नामकरण करण्यात आले. ह्या वेळी चौथ्या शिवाजी महाराजांचे वय ८ वर्ष होते.
इंग्रज सरकारने ह्या चौथ्या शिवाजी महाराजांना के. सी आय. सारखा तत्कालीन बहुमानाचा किताब देऊन महाराजांच्या सुसंगत आणि स्वाभाविक वर्तनाची एक प्रकारे ग्वाहीच दिली होती.
महत्वाचे: महाराजांनी अमुक एक विधान केले किंवा अमुक प्रसंगासंबंधी अनुकूल मत व्यक्त केले कि जवळपासची काही मंडळी नेमके त्यांच्या विरुद्ध बोलून महाराजांच्या मनाला संताप उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असत.
(इथे एक गोष्ट लक्षात घ्या. भलेही हे छत्रपती जरी असले तरी ह्या मुलाचे वय ह्यावेळी केवळ नऊ वर्षांचे आहे.
इतक्या कोवळ्या वयातील मुलाच्या डोक्यावर जबाबदारीचे ओझे असताना त्याला साथ देऊन प्रोत्साहीत करणे आणि त्यास सकारात्मक प्रगती पथावर घेऊन जाणे ह्या ऐवजी त्या मुलाशी नकारात्मक भाव ठेऊन आणी त्याचा पदोपदी बौद्धिक अपमान करून ह्या मुलाचे बालपण हिरावून घेतले गेले
चौथ्या शिवाजी महाराजांच्या सेवेत एडमंड कॉक्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी दोन वर्ष होता. तो अधिकारी लिहितो कि, "एकदा मी महाराजांना विचारले कि, आपल्याला कोल्हापूरचा राजा म्हणून जाणे आवडेल कि असाच प्रवास करीत राहणे आवडेल?"
त्यावर महाराजांनी ह्या अधिकाऱ्यास सांगितले की, " आपल्या मूळ गावी आणि मूळच्याच परिस्थितीत जाण्याची आपली इच्छा आहे."
चौथ्या शिवाजी महाराजांच्या बाल मानसिकतेचा कुठलाही अभ्यास न करता महाराजांना मानसिक वेडे ठरविण्याचा जो चंग त्या वेळेसच्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आणी कारभाऱ्यांनी केला होता त्याला मराठ्यांचा इतिहास कधीही माफ करणारा नाही.
९ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाबरोबर सहानुभूतीने न वागता त्याला मानसिक वेडा ठरवून बरे करण्याच्या नावाखाली मुंबईच्या मर्फी नावाच्या डॉक्टरच्या सल्याने ह्या छोट्या महाराजांस चाबकाने फोडून काढले जात असे.
काय अवस्था होत असेल त्या लहान मुलाच्या जीवाची आई वडिलांच्या प्रेमापासून तुटलेला हा कोवळा जीव दिवसरात्र आपल्या आईच्या प्रेमळ हळुवार मायेसाठी अक्षरशः धाय मोकळून आई आई करत रडत असेल कोणीही जिवा-भावाचे प्रेमाने सांभाळून घेणारे जवळ नाही.
ह्यात भर की काय छत्रपतींच्या वयाच्या १७ व्या वर्षी छत्रपतींच्या सेवेसाठी 'प्रायव्हेट ग्रीन' नावाच्या एका इंग्रज आडदांड उद्धट सैनिकाची नेमणूक १५ ऑगस्ट १८८० साली केली गेली.
ह्या 'ग्रीन' बरोबर महाराजांचे अजिबात जमत नसे. महाराज ह्यास म्हणत असत की, "तुम्ही युरोपियन लोक कश्यासाठी बोलता?"
महाराजांवर चाललेले उपचार हे अमानुष असून ते जाणूनबुजून केले जात आहेत असा त्यावेळीस लोकांचा पक्का समज होऊ लागला होता. ह्याचबरोबर लोकांच्या मनात चिंता आणि संतापही वाढू लागला होता.
त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबरच कोल्हापूरचा कारभारी रावबहादूर वासुदेव बर्वे हा ही त्या वेळेसच्या वर्तमानपत्रांच्या टीकेचा मुख्य लक्ष बनला होता.
'ज्यांनी महाराजांची योग्य देखभाल करावी अशी अपेक्षा असते तेच महाराजांवर अत्यंत कठोर उपाय योजू लागले' असा समज झपाट्याने लोकांमध्ये फैलावला होता.
केसरी वृत्तपत्राच्या ११ ऑक्टोबर १८८१ च्या अंकात पुढीलप्रमाणे मजूकर प्रसिद्ध झाला होता." कोल्हापूर छत्रपती महाराजांची सध्याची अशी स्थिती आहे की ती ऐकून पाषाण हृदयी माणसाच्या देखील काळजाला घरे पडतील. महाराजांचे प्राण जाऊन शव हाती पडल्यावर लॉर्ड साहेब जागृत होणार काय?
कोणत्याही कारणाने छत्रपतींच्या जीवास अपाय झाला तर त्याचा कलंक बादशाही राणीच्या आणि तिच्या प्रतिनिधींच्या कपाळी आल्याखेरीज राहणार नाही.
केसरी वृत्तपत्राच्या ३ डिसेंबर १८८१ च्या अंकात रावबहादूर बर्वे ह्याच्या संबंधी म्हंटले होते कि, " कोल्हापूर संबंधाने जी कागदपत्रे आमच्या पाहण्यात आली आहेत त्यावरून रावबहादूर माधवराव बर्वे यांच्या राक्षसी अंतःकरणाविषयी आमची (म्हणजे टिळकांची) बालंबाल खात्री झाली आहे. आज रोजी त्यांची (म्हणजे बर्वेची) काळी कृत्ये उजेडात आणता येत नाहीत यास आमचा नाईलाज आहे.
ज्या पत्रांच्या आधारे टिळक-आगरकरांनी हे छापले होते त्या विरोधात पुढे कारभारी बर्वे ह्याने इंग्रज कोर्टात दावाही ठोकला होता. ह्या प्रकरणी टिळक आगरकरांना चार महिन्यांची शिक्षाही ठोठावण्यात आली होती.
टिळकांच्या केसरीकडे छत्रपतींच्या होणाऱ्या छळाची माहिती पुरविणारी पत्रे हा जरी वादाचा मुद्दा होता तरीही अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या निमित्ताने कोल्हापूरच्या छत्रपतींचा छळ होत होता ही गोष्ट सर्वांना कबूल करावीच लागली.
महाराजांचे मामा हिंमत बहाद्दूर प्रीतीराव रताजीराव चव्हाण यांच्या निवेदनावरूनही महाराजांचा छळ चालू होता ही गोष्ट त्यावेळी अनेकांच्या निदर्शनास आली होती.
पुढे महाराजांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून कोल्हापूरचा कारभारी आणी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी १८ जून १८८२ ह्या चौथ्या शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या किल्यात नेऊन ठेवले.
अहमदनगर येथे चौथ्या शिवाजी महाराजांना किल्ल्यातील एका बाजूला असलेल्या बंगल्यात ठेवले. त्या भागात कोणालाही फिरकण्यास बंदी होती. पक्या बंदोबस्तात ठेवलेल्या कैद्यांसारखी त्यांची अवस्था होती.
खाजगी नोकराखेरीज फक्त 'प्रायव्हेट ग्रीन' हाच दांडगा सैनिक महाराजांच्या सोबतीला ठेवलेला होता. महाराजांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते. महाराजांच्या पत्नीलाही भेटू दिले जात नव्हते. मानसिक छळ करून महाराजांना मनोरुग्ण ठरवण्याचा हा कट होता. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते.
महाराजांना सर्व परिचित व्यक्ती आणी वातावरण ह्यांपासून वेगळे काढून एखाद्या कैद्या प्रमाणे जीवन काढावे लागत होते.
इंग्रज शिपाई प्रायव्हेट ग्रीन हा महाराजांना बेदम झोडपून काढत असे अश्या बातम्या नगर शहरात रोजच फिरत असत. त्यामुळे नगरकरांच्या संतापाचा आता उद्रेक होऊ लागला होता.
ब्रिटिशांशी संघर्ष करताना छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून तेव्हाचे दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातून अन्यत्र हलवले. जून १८८२ मध्ये महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यात एकांतवासात ठेवण्यात आले. त्यांना कोणाला भेटू दिले जात नव्हते. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी ब्रिटीश सार्जंट ग्रीन याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांच्या पोटाला मार लागून मृत्यू झाला. नाताळच्या दिवशीच ब्रिटीशांकडून महाराजांची हत्या झाली. महाराज तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते. आपला राजा ब्रिटीशांकडून मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

२५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात छत्रपतींच रक्त सांडले आपल्या प्राणाची आहुती देऊन महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बलिदान दिलेकोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याचे धाडस दाखवले. नगरच्या मातीत त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आणि नगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रेसिडेन्शिअल विद्यालयासमोर त्यांची समाधी आणि पुतळा आहे.अशा या क्रांतीवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा