नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, ६ जून, २०२१

६ जून- राज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 

 
६ जून १६७४

        छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

         राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

👁️ *शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..

हेन्री ऑक्सएन्डन (HENRY OXENDEN)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा *दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला.* या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.

🚩 ३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.

🚩 ३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.

🚩 १ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.

🚩 २ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.

🚩 ३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.

🚩 ४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.

🚩🤴🏻 ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.

हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.

*शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?*

                             हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.

त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”           

   🚩 *हर हर महादेव....!* 🚩                                                                                                                                                                                                   

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

स्त्रोतपर माहिती

आगामी झालेले