नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस


जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन. याच दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.

२३ एप्रिलच का?
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. शेक्सपिअर यांचा जन्म व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख. जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला. शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा. 38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक, 16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ठ्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.
कॉपीराइट म्हणजे काय?

कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

                     📕📓 *पुस्तकं*📔📒

पुस्तके  स्वप्नात येतात आणि विचारतात,
'तू आम्हास ओळखले कां?'
बोलता बोलता पुस्तके वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'
पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
आणि विचारात ,
'आमची फळे खाल्लीस कां
छायेत कधी विसावलास कां?'
पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात
नि विचारतात ,
'श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?'
पुस्तके असेच काही विचारीत राहतात
एकामागून एक.
प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.
तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
नि म्हणतात ,
'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'
पुस्तके मूक होतात,
झुरत जातात,
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
शेवटी आत्महत्या करतात ती-
घरातल्या घरात,
बंद कपाटाच्या कारागृहात...
*शंकर वैद्य*

वाचनाचं महत्त्व?
वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी.जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे. युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणे.  वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.,
सहज होणारे वाचन आणि जाणीवपूर्व केले जाणारे वाचन, असे वाचनाचे दोन प्रमुख प्रकार मानले तर, सहज होणारे वाचन हे एकेकाळी केवळ वृत्तपत्र वाचनापुरते मर्यादित होते ते आता मोबाइल, इंटरनेटमुळे सोशल मीडियाकडे वळलेले आहे. जाणीवपूर्वक केले जाणारे वाचन, म्हणजे पुस्तकांचे, ग्रथांचे वाचन करणारांची संख्या तुलनेने कायमच कमी होती आणि आहे; तरीही मराठीतला ग्रंथ व्यवहार आज करोडो रुपयांचा आहे, शेकडो प्रकाशक आहेत आणि हजारो लेखक आहेत. सहज केल्या जाणाऱ्या वाचनाच्या स्वरूपात इंटरनेटमुळे जो क्रांतिकारी बदल गेल्या दशकभरात झालेला आहे, तसाच तो पुढील दशकात पुस्तक व्यवहारातही होऊ घातलेला आहे. म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आजचा आणि आगामी काळातला पुस्तक व्यवहार, ई-बुक्स, भविष्यात पुस्तकांच्या बदलणार असलेल्या संकल्पना आहेत.
पु. ल. देशपांडे म्हणतात पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइस्क्रीम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली, तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या या पदार्थाचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यर्थ्यांच्या मनात पुस्तकासंबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठय़पुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही; नाही वाचलं तर नापास होऊ या भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक ‘पाठय़पुस्तक आहे’ अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात की, आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का? साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा.
(‘रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका’मधून साभार)

📒📔 पुस्तक दिन
मीच ग्रंथ,मीच पोथी,
मीच पुस्तक शेवटी

झालो सखा मी 
मानवाचा
भूक त्याची गोमटी
तोच माझा जन्मदाता
तो पिता अन सोबती

पर्ण होते,ताल वृक्षा
रस फुलांचा काढुनी
रेखिले मजवरी जे,ते
 ठेविले जतन करुनी 

एक नव्हे बहुत ऐसे
एकमेका बांधुनी
निर्मितीचा आनंद घेई
पुस्तकाला साकारूनी

प्रिय झालो बहू जनांना
मग रक्षिले मज आदरे
अग्नी अन जला पासून
दूर तयांनी ठेविले

रूप माझे बदलले
झालो अधिक की गुणी
उपकार त्याचे फेडण्यास
करण्यास त्याला शतगुणी

साथ नाही सोडली 
 माझी तयाने आजही
दिव्य रूप देऊनी
ठेविले मज भ्रमणध्वनी

भेटतो तो क्षणोक्षणी
हाक मारी गुगल म्हणुनी
 हा भुकेला तृप्त होई
पुस्तके बहू वाचूनी

नाही आता प्रगट रूपे
सूक्ष्म रुपी राहिलो
परी सखा मी आजही ना
तुझ्या सोबती राहिलो

विसरलास नाहीच म्हणुनी
तुही झालास समृद्ध रे
सांग तुझ्या आज्यास आता
रूप माझे वेगळे

जन्मो जन्मीची मैत्री
कशी मोजावी नकळे
सांगतो मी तुम्हाला
प्रिय माझे रूप आगळे
(सौ.आरती आठवले)

📒📔 पुस्तकांशी मैत्री

रस्त्याच्या दुतर्फा जशी झाडे
सावली देतात वाटसरूंना
प्रवासात सोबत करतात सुखाची
जीवन होते समृद्ध पुस्तक वाचताना

जीवनाच्या अथांग सागरात पोहताना
पानोपानी पुस्तकांच्या सापडतो राजमार्ग 
संकटांशी दोन हात करताना
सुकर होतो जीवनाचा महामार्ग

वाचाल तर वाचाल
पुस्तक वाचनाकडे वळा
जीवनाच्या भूईवर
फुलवा ज्ञानाचा मळा

       प्रा.जाई म्हात्रे

आगामी झालेले