नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, १२ जुलै, २०२२

नरवीर शिवाजी काशीद Narvir Shivaji Kashid

          ⚜️🚩🏇🚩👳‍♀️

         नरवीर शिवाजी काशीद Narvir Shivaji Kashid 

वीरगती : १२-१३ जुलै १६६० ची रात्र

पन्हाळ्यावर म्हणे बरसवु कहर.. मोगलांचा सरदार सिद्दी जौहर..

घेरती सैतान पन्हाळ्याचा पायथा.. चक्रव्युव्हात स्वराज्याचा कर्ताकरीविता..

गडाचा झोंबती अंगाला वारा.. आठवे तो विशालगडाचा आसरा..

निघाला राज्या भेदन्या चक्रव्यु.. डोळ्यात रुते फसलेला अभिमन्यू..

एक विर ऐसा.. परी छत्रपति जैसा.. छत्रपतिसाठी सांडु म्हणे रगद..

नाव तयाचे शिव काशिद.. शिवबांना लपवावे.. त्या दाखवावे..

हुबेहुब ऐसा कोणी न ओळखावे.. राजापरी प्रेम जणु विर थोपटी मांडी..

क्षणभर राजा म्हणविन्या शिर देई तोफे तोंडी.. सुखरुप पोचावा स्वराज्याचा भ्रमर..

पिळ देऊन मिशीला होईल तया मि अमर.. बेत ठरला.. प्रति शिवा मोगलानी हेरला..

मावळा राजा म्हणुनी कैद होई.. लाभली जन्मो जन्मीची पुण्याई..

खदखदुन हसे ऐसा सिद्दी.. म्हणे मि आहेच जिद्दी..

काळ भासवि स्वताःला.. पेश करा आमच्या समोर कैद्याला..

शिवा काशिद चाले तोऱ्यात.. आग लाविली जणु तुफाणी वाऱ्यात..

उभा राहीला सिद्दी समोर.. पाहुन मर्दाला सिद्दी करे घुर घुरं..

दिवठ्याच्या पेटल्या मशाली,. अंधाराचीही उजळे सावली..

नजर रोखुन सिद्दी पाही.. शंकेचा धुर करी तया लाही लाही..

आग गेली तळपायाची मस्तकात.. ओरडुन म्हणे झाला घात..

ऐकुन काशिद हसला.. मोगलांचा तर आवाज बसला..

दिसतो खरा राजा शिवछत्रपति.. ओळखले त्यास तो तर प्रति छत्रपति..

पाहुन विरा तो बोले जौहर.. मरणे का डर नही क्या काफर..

तो असे मावळा निडर.. बोलतो कसा बेफिकिर..

आलोया ईथे मृत्युला न जुमानुन भाग्य उजळन्या.. राजा म्हणुन मरण्या..

आम्हा मावळ्या असे माज.. स्वराज्यासाठी मरण्या उभीआमची फौज..

तु फक्त मारीशी देहाला,. पण हा आत्मा तृप्त होई अमरतेला..

सुटला तोल सिद्दीचा.. वेध घेई मर्दाच्या मानेचा..

त्यागीतो देहा काशिद तो स्वराज्यविर.. लाख मरती पोशिंद्यासाठी धडा वेगळे होती शिर..

ऐसा शिवछत्रपति राजा.. लाभली तया जिव्हाळ्याची प्रजा..

ऐसे जन्मले कैक विर.. झेलती स्वराज्याचे वार ..

असे त्यांना या मातिचा लळा.. शुल छातित रोवुनी सोसती शिवबासाठी कळा..

झुरती नसे मावळे सत्तेच्या गर्दित.. शिवछत्रपति होई धन्य धन्य तो शिवा काशिद शिवा काशिदला मानाचा त्रिवार मुजरा ।। एक आवाज एकच पर्याय ।। 

।।जय जिजाऊ जय शिवराय।। 

शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. 

🚩 *शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा*

             फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ", तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं... मै ही शिवाजी महाराज हूं". पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती. तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही. कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते. यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला, मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले, ’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत. आता हाती लागणे शक्य नाही. छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत. जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.

            सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू..... त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल. यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही. त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही, तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ? 

               माझा शिवाजी राजा... त्यांची सर तुझ्यासारख्याला यायची नाही. तू पोटार्थी हबशी... तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे, पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला, वैसाही होगा...... मरने को हो तैयार.. तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला, त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो, कसंही येवो... मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते. त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.

               शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला. तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले. खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी; रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.


या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे. नेबापूरच्या (चव्हाण) "पाटलांनी" शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर (चव्हाण) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली. कारण पन्हाळा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता. त्या काळात शिवाजी महाराज नवीन पन्हाळ्याचे व्यवस्थापन करण्याची योजना करीत होते. मानवी संसाधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेबापूर (चव्हाण) पाटील यांची होती. असेही सांगितले जाते की सिद्दी जौहरला दिशाभूल करण्याचे धोरण आखण्यात नेबापूर (चव्हाण)पाटील हे मुख्य सूत्रधार होते. नेबापूर (चव्हाण) पाटील हा सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होता. हे देखील सांगण्यात आले आहे की बाजी प्रभू आणि नेबापूर पाटील यांनी एकत्रितपणे योजना आखली आणि अंमलात आणली. सर्व माहितींपैकी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजे सारखे दिसण्याबद्दल शिवा काशिदचे प्रथम नेबापूर पाटलांनी कौतुक केले. पण लवकरच शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली."मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे.

स्वराज्यासाठी अनेक हेरांनी काम केले होते, पण त्यांच्या कामाच्या गुप्ततेमुळे आणि कामाच्या व्याप्तीमुळे त्याची इतिहासात नोंद झाली नाही.   

 🚩 हर हर महादेव.... 🚩

         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन* 🙏

       स्त्रोतपर माहिती 

सोमवार, ४ जुलै, २०२२

पिंगाली वेंकय्या Pingali Venkayya


🚂
तिरंग्याचे आद्य रचनाकार
पिंगाली वेंकय्या Pingali Venkayya 
जन्म : 2 ऑगस्ट 1876 भटलापेनुमारू , मछलीपट्टनम जवळ , मद्रास प्रेसीडेंसी , ब्रिटीश भारत (सध्याचे आंध्र प्रदेश , भारत)
मृत्यू : 4 जुलै 1963 (वय 86) ( भारत )

राष्ट्रीयत्व : भारतीय प्रसिध्दी : भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना

भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.
कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी 2 ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.
पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळी पर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॕनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.
१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.

जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी- 
♦वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
🔸याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिके मध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
🔹पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
🔸त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
♦३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
🔸१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
🔹पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
♦१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.
🔹२०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
🔸मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷

स्त्रोतपर माहिती 

स्वामी विवेकानंद Swami Vivekanand ४ जुलै


स्वामी विवेकानंद  Swami Vivekanand (नरेंद्रनाथ दत्त)

(भारतीय हिंदू गुरु)

जन्म : १२ जानेवारी १८६३ (कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

मृत्यू : ४ जुलै १९०२ (बेलूर मठ, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : ब्रिटीश भारत

शिक्षण : कला शाखेत पदवीधर

प्रशिक्षणसंस्था : कलकत्ता विद्यापीठ

धर्म हिंदू

वडील : विश्वनाथ दत्त

आई : भुवनेश्वरीदेवी दत्त

                     स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 

 💁🏻‍♂️ बालपण 

उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३2 वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

📖 शिक्षण संपादन

नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

नरेंद्रनाथांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही." त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.

🤝 गुरु रामकृष्ण यांची भेट

कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.

⚜️ नरेंद्राची साधना

              अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.


🤝 *गुरुभेट व संन्यासदीक्षा*

याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.

🚩 धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात

रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.

🛡️ ‘विवेकानंद’ नामकरण

राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.

🛕 कन्याकुमारी

रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.

🏮 शिकागोतील सर्वधर्मपरिषद

             सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

🏯 समाधी

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.

💎 तत्त्वविचार आणि शिकवण

 स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.

त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.

प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.

अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.

कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.

उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

'दरिद्री नारायण' हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.

त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -"मित्रास"; ,इंग्लिश - "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:

देवनागरी लिप्यंतरण:

बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि

कोथाय खूंजिछो ईश्वर

जीवे प्रेम करे जेई जन

सेई जन सेविछे ईश्वर

अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. 

♻️ आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती

ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—

१.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

२.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.

४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.

त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)

🎯 कर्मयोग

अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या एकूणेक दु:ख-क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.

🎯 ब्रह्म संंकल्पना

अद्वैत तत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.

🎯 भक्तियोग

भक्तियोग म्हणजे खऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.

🎯 शिक्षण संदर्भातील विचार

शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.

📚 प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-

अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)

मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)

राष्टद्रष्टे विवेकानंंद : (वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)

शोध स्वामी विवेकानंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर)

संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))

स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)

स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)

स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)

📜 नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार

पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)

पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)

शंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)

पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)

विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.

विवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.

🔮 भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहरूंचे पीए एम.ओ. मथाई यांना म्हणाले होते की, "अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत, गांधी नव्हे."

सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, "जोपर्यंत बंगालचा संबंध आहे, आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे 'आध्यात्मिक पिता' म्हणू शकतो."

स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.

मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -

त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .

निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .

भारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.

पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

           स्त्रोतपर माहिती 



रविवार, ३ जुलै, २०२२

विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde



विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde
(स्वातंत्र्य सेनानी, समाज प्रबोधनाचे थोर शिल्पकार व मराठी कायदेतज्ज्ञ)
जन्म : ३ जुलै १९०९
मृत्यू : २२ मार्च २००४
बॕरिस्टर भाऊसाहेब तारकुंडे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते. बॅ. विठ्ठल महादेव उर्फ भाऊसाहेब तारकुंडे यांना असामान्य बुद्धिमत्तेचे देणं मिळालं होतं. १९२५ साली झालेल्या मुंबई इलाख्यातील मॅट्रिक परीक्षेत त्यावेळी ते पहिले आले होते. याशिवाय, त्या काळात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप त्यांनी पटकावली होती. बॅ. तारकुंडे यांना मिळालेल्या या जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपचे एक वैशिट्य असे की त्यांचे वर्गमित्र न्या. पी. डी. शिखरे व बॅ. तारकुंडे यां दोघांमध्ये ही स्कॉलरशिप विभागली होती.
भाऊसाहेब तारकुंडे यांचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य असं की सर्व मुंबई इलाख्यात उत्तीर्ण होउन देखील त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे मोठा ध्येयवाद होता. शेती हाच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून असतात. खरा भारत हा खेड्यापाड्यातून राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची सुधारणा करणं हेच भारतासमोरील मुख्य आव्हान आहे, या दृष्टीने त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या ९६ वर्षांच्या इतिहासात मॅट्रिक परीक्षेला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कृषि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले तारकुंडे हे पहिलेच व एकमेव विद्यार्थी होते. कृषि महाविद्यालयामध्ये शेवटच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांनी त्या वेळी गुणांचा इतका उच्चांक प्रस्थापित केला की २००४ सालापर्यंत त्यांचा हा उच्चांक कोणीही मोडू शकलेला नव्हता. असे अलौकिक बुद्धिमत्तेचे भाऊसाहेब नंतर १९२९ साली इंग्लंडला गेले. त्यांनी आय. सी. एस. व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु त्यांना सरकारी नोकरीत कसलाही रस नव्हता. त्यामुळे ते १९३२ साली बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भाऊसाहेब तारकुंडे हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, यात कसलीच शंका नाही. परंतु त्यांच्या या बुद्धिमत्तेला उदात्त ध्येयवादाचं अधिष्ठान मिळालं होतं. त्यामुळे ते आपलं व्यक्तिगत जीवन अर्थपूर्ण करू शकले. त्याचबरोबर राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांनी यथाशक्ती वाटा उचलला. १९३२ साली ते भारतात परत आले, त्यावेळी ते इंग्लंडमधील समाजवादी विचारांची दिशा घेऊनच आले होते.
१९३१ ते १९३५ या काळात सर्व जगभर ध्येयवादी तरुणांना समाजवादाचं, मार्क्सवादाचं आकर्षण निर्माण झालं होतं. याची बीजे त्या काळातील परिस्थितीमध्येच होती असं मला वाटतं. १९३० साली सर्व जगभर आर्थिक मंदीची लाट मोठ्या प्रमाणावर आली होती. त्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था एकां मोठ्या अरिष्टामध्ये सापडली होती. या मोठ्या आर्थिक मंदीच्या लाटेची बीजं भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेत होती. त्याचप्रमाणे, या काळात जर्मनी, इटलीमध्ये हिटलर, मुसोलिनी यांच्या रूपाने एका भयानक हुकूमशाहीचा उदय होऊ लागला होता. या हुकूमशाहीची बीजंदेखील आमच्या संसदीय लोकशाहीमधील मूलभूत दोषांमध्ये आहेत. आमची लोकशाही ही भांडवलशाहीच्या प्रभावाखाली वावरत आहे. भांडवलदार, कारखानदार यांच्या हातांतील ते एक हत्यार बनले होते. उलट याच काळात सोव्हियेत रशियातील कम्युनिझमचा लाल तारा निश्चितपणे प्रगती करत होता. त्यामुळे जगाला समाजवाद, मार्क्सवाद याशिवाय पर्याय नाही, अशी अनेकांची धारणा होती. या काळात भाऊसाहेब तारकुंडे यांच्या विचारावर समाजवाद, मार्क्सवादाच्या विचारांचा प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं.
शिवाय त्यांच्या संस्कारक्षम वयात प्रा. आगरकर यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा व निरीश्वरवादाचा प्रभाव पडलेला होता. प्रा. आगरकर यांच्या जीवनातील जळजळीत ध्येयवादाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं. देशातील सारं वातावरणच ध्येयवादाने झपाटलेलं होतं. याचा प्रभाव भाऊसाहेब तारकुंडे यांच्या मनावर पडला असावा, असा माझा कयास आहे. याच काळात नानासाहेब गोरे, र. के. खाडिलकर, एस. एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर, मधु लिमये, मधु दंडवते, ह. रा. महाजनी यांच्यासारख्या तरुणांवरया ध्येयवादाचा प्रभाव पडला होता. नंतरच्या काळात एस. एम, जोशी, नानासाहेब गोरे व त्यांचे सहकारी समाजवादाकडे आकृष्ट झाले. तरी त्यांच्या मनातील गांधीवादाचा प्रभाव जाणवत होता. भाऊसाहेब तारकुंडे गान्धीयुगाच्या प्रभावाच्या काळात वाढलेले असूनही त्यांच्या मनावर गांधीवादी विचारांचा प्रभाव पडलेला नव्हता असं दिसून येतं. उलट ते गांधीवादापासून दूरच होते. नंतर ते गांधीवादाचे टीकाकार बनले. १९३२ नंतरच्या काळात त्यांच्या मनावर समाजवादाचा व मार्क्सवादाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. १९३४ साली स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षाचे ते सभासद होते. नंतर १९३६ साली भाऊसाहेब हे एम एन रॉय यांच्या संपर्कात आले. एम एन रॉय यांच्या विचारांमुळे व असामान्य बुद्धिमत्तेमुळे भाऊसाहेब प्रभावित झाले आणि नंतर ते आयुष्यभर एम एन रॉय यांचे निष्ठावंत सहकारीच बनले. मार्क्सवादाचं त्यांना या काळात विलक्षण आकर्षण वाटत होतं, याचे कारण मार्क्सवादाच्या मागे प्रभावी अशी एक नैतिक प्रेरणा होती. मार्क्सचा कॅपिटल हा ग्रंथ अर्थशास्त्रावरचा नसून तो ख-या अर्थाने नीतिशास्त्रावरचा ग्रंथ आहे, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. परंतु त्यांना मार्क्सच्या आर्थिक सिद्धांताचं आकर्षण होतं. दुस-या महायुद्धानंतर विशेषतः १९४७ ते ४८ साली ते एम. एन. रॉय यांच्याबरोबर मार्क्सवादाच्या तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. मार्क्सवाद हा ठोकळेबाज सिद्धांताचा एक सांगाडा नाही तर मार्क्सवाद ही एक शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची पद्धती आहे, अशी त्यांची प्रांजळ धारणा झाली. त्यामुळेच ते मार्क्सवादाच्या पलीकडे जाउन त्यांनी एम. एन. रॉय यांच्या विज्ञाननिष्ठ मानवतावादाचा पुरस्कार केला. माणूस हा सर्व समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे व माणसाची प्रगती हाच कोणत्याही सामाजिक संस्थेचा मानदंड आहे, हे त्यांनी मान्य केलं.
भाऊसाहेब तारकुंडे हे १९५७ ते १९६९ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करीत होते. या काळात कायद्यातील बारीक सारीक कलमांपेक्षा न्यायाकडे अधिक लक्ष दिलं. या दृष्टीने त्यांच्या काळातील अनेक निकाल पुढील काळातील न्यायाधीशांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. तारकुंडे यांना निवृत्तीसाठी काही वर्षं शिल्लक होती व कदाचित दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जाण्याची शक्यता होती. परंतु समाज प्रबोधनाच्या कामासाठी त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला.
नंतर ते दिल्लीला समाजप्रबोधनाच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिससाठी गेले. भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा निष्ठेने जोपासला. आपली मतं इतरांना आवडत किंवा न आवडण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. निर्भयपणे ते आपले विचार मांडत असत. वैचारिक प्रांजळपणाने चालतंबोलतं रूप म्हणजे भाऊसाहेब तारकुंडे यांचं सारं जीवन होतं.
सत्ता व संपत्ती यांचं त्यांना कसलंही आकर्षण नव्हतं. १९७७ साली त्यांना केंद्र सरकारने राज्यपालपद देऊ केलं होतं, त्यांनी ते नम्रपणे नाकारलं. राजभवनापेक्षा सामान्य माणसामध्ये विचारप्रबोधनाचं काम महत्त्वाचं आहे अशी त्यांची धारणा होती. शिवाय सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतांना मिळवलेले लाखो रुपये त्यांनी देशभर विचारप्रबोधनाच्या कार्यासाठी खर्च केले. मोहन धारिया हे वनराईमार्फत ग्रामीण विकासाची कामं करीत आहेत, असं कळल्यावर त्यांनी स्वेच्छेने, मोहन धारिया यांना कसलीही कल्पना नसतांना, एक लाख रुपयांचा चेक देणगीदाखल पाठवला. त्याचप्रमाणे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम निष्ठेने करीत आहेत, हे लक्षात आल्यावर आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांनी नरेंद्र दाभोलकरांकडे एक लाख रुपयांची देणगी पाठवली. अशा अनेक देणग्या त्यांनी समाजप्रबोधन व ग्रामीण विकासाच्या कामासाठी दिलेल्या आहेत.
भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर काही उदात्त मूल्ये निष्ठेने जोपासली. मानवी स्वातंत्र्य, समता व मानवी हक्कांसाठी देशभर त्यांनी प्रचार केला. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील त्यांची राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा प्रबळ होती. मला आणखी १० वर्षं आयुष्य मिळालं पाहिजे, असं ते खाजगीत नेहमी म्हणत. भाऊसाहेब तारकुंडे म्हणजे जीवनातील उदात्त मूल्यांना समर्पित केलेलं असं श्रेष्ठ दर्जाचं जीवन होतं. त्यांच्या जीवनातील उदात्त ध्येयवादाची व जीवनमूल्यांची आजच्या काळात भारताला नितांत गरज आहे. भारतातील या अत्यंत थोर अशा सुपुत्राला व समाजप्रबोधनाच्या शिल्पकाराला मी विनम्र भावाने अभिवादन करतो.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन🙏

आगामी झालेले