नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरू शिष्य गोष्टी Guru disciple things

गुरु-शिष्य Guru śiṣya gōṣṭī Guru disciple things

गुरुभक्त संदीपक

गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता. त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत. त्यांच्या या शिष्यांमध्ये ‘संदीपक’ हा खूप बुध्दिमान होता. तो गुरुभक्तही होता. गुरुंची त्याच्यावर असलेली मर्जी बघून इतर शिष्य त्याचा मत्सर करत. ज्ञानार्जनाचे काम संपत आल्यावर वेदधर्मांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हटले, ‘‘माझ्या प्रिय शिष्यांनो, तुम्ही सारे गुरुभक्त आहात यात संशय नाही. माझ्याकडून शक्य होते तेवढे ज्ञानदानाचे काम मी केले आहे, तथापि माझ्या पुर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे आता मला कोड फुटेल, अंधत्व येईल, माझ्या शरीराला दुर्गंधी येईल. मी हा आश्रम सोडून निघून जाईन आणि हा व्याधीग्रस्त काळ काशीला राहून व्यतीत करीन. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही, तोपर्यंत माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोण कोण काशीला यायला तयार आहे.’’

त्यांचे ते बोलणे ऐकून सर्व शिष्यात शांतता पसरली. एवढ्यात संदीपक म्हणाला, ‘‘आचार्य, मी प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार आहे.’’

गुरुजी म्हणाले, ‘‘बघ, शरीराला कोड होईल, वास येईल, मी आंधळा होईन. तुला माझा खूप त्रास सोसावा लागेल. विचार करुन सांग.’’

संदीपक म्हणाला, ‘‘गुरुदेव, माझी तयारी आहे. आपण बरोबर येण्याची अनुमती द्यावी एवढेच ?’’

दुसर्‍या दिवशी वेदधर्म संदीपकासह काशीला निघाले. काशीत मणिककर्णिक घाटाच्या उत्तरेस कंवलेश्‍वर, येथे राहू लागले. अल्पावधीत त्यांना कोड झाले. त्यांची दृष्टी गेली. त्यांचा स्वभाव रागीट आणि विचित्र झाला. संदीपक अहोरात्र त्यांची सेवा करत होता. त्यांना आंघोळ घालणे, जखमा धुणे, औषध लावणे, कपडे धुणे, जेवू घालणे, सेवा करता करता त्याच्या सर्व इच्छावासना जळून गेल्या. त्याच्या बुध्दीत प्रकाश प्रगटला. ‘‘घर विच आनंद रह्या भरपूर । मनमुख स्वाद न पाया ॥’’ जय मनमुख होऊन साधना कराल तर हाती काही लागणार नाही. गुरुने सांगीतलेल्या मार्गाने आचरण कराल तर भटकणार नाही.

गुरुजींच्या सेवेत अनेक वर्षे लोटली. त्याची गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या पुढे प्रगटले आणि म्हणाले, ‘‘संदीपका, लोक काशीविश्‍वनाथाच्या दर्शनाला येतात; पण मी तुझ्याकडे, न बोलावता आलो आहे; कारण ज्यांच्या ह्रदयात मी सोहं स्वरुपात प्रगटलो अशा सद्गुरुची तू सेवा करतोस, त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली, तरी त्यांच्यात चिन्मय तत्व जाणून तू सेवा करतोस. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू जे हवे आहे ते माग ?’’

संदीपक संकोचला, ‘‘हे प्रभू आपली प्रसन्नता मला पुरे आहे.’’ असे म्हणाला. मात्र भगवान शंकर ऐकेनात. काहीतरी मागच म्हणून हट्ट धरला.

संदीपकाने सांगितले. ‘‘हे महादेवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे माझे भाग्य आहे. पण वर मागायला मी पराधीन आहे. माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही.’’

शंकरांनी गुरुला विचारुन येण्यास सांगितले. संदीपक गुरुकडे आला आणि विचारले, ‘‘आचार्य, आपल्या कृपेने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होऊन वर देऊ इच्छित आहेत.आपली आज्ञा असेल, तर आपले कोड आणि अंधत्व बरे होण्याचा वर मागू ? ’’

हे ऐकताच वेदधर्म संतापले आणि म्हणाले, ‘‘नालायका ! सेवा टाळू बघतोस काय ? दुष्टा माझी सेवा करुन थकला आहेस म्हणून भीक मागतोस ? शंकर देऊन देऊन काय देतील ? शरीरासाठीचा ना ? प्रारब्ध चुकेल का त्याने ? जा चालता हो इथून. नको म्हणताना बरोबर आलासच का ?’’

संदीपक धावतच भगवान शंकराकडे गेला व काही नको म्हणून सांगितले. हे पाहून शंकर प्रसन्न झाले व सुचकपणे म्हणाले, ‘‘काय गुरु आहेत ? एवढी सेवा करणार्‍या शिष्यावरही रागावतात ?’’

संदीपकाला गुरुला नावे ठेवलेली आवडली नाहीत. ‘‘गुरुकृपा ही केवलं…’’ असे सांगून तो निघून गेला.

शंकरांनी ही हकीगत विष्णूंना सांगितली. त्याची सेवावृत्ती, गुरुनिष्ठा यांचे कौतुक केले. ‘‘गुरुद्वारी झाडलोट करणे, भिक्षा मागणे, त्याला आंघोळ घालणे, जेवु घालणे हीच त्याची पूजा आहे’’ असे सांगितले. त्यांचे ऐकून विष्णूनेही त्याची परीक्षा पाहिली. त्यानेही संदीपकाला वर मागण्यास सांगितले. हट्टच धरला. तेव्हा संदीपकाने विष्णूचे पाय धरले आणि म्हणाला, ‘‘हे त्रिभुवनपती, गुरुकृपेनेच मा आपले दर्शन झाले आहे. मला एवढाच वर द्या की गुरुचरणी माझी अढळ श्रद्धा कायम राहो. त्यांची निरंतर सेवा घडो !’’

विष्णूने प्रसन्न होऊन त्याला वर दिला. वेदधर्मांना ही हकीगत कळताच ते आनंदित झाले त्याला ह्रदयाशी कवटाळीत आशीर्वाद देत म्हणाले, ‘‘बाळा, तू सर्वश्रेष्ठ शिष्य आहेस. तुला सर्व सिध्दी प्राप्त होतील. तुझ्या चित्तात ऋध्दी-सिध्दी राहतील.’’ संदीपक म्हणाला, ‘‘गुरुवर ! माझ्या ऋध्दि-सिध्दी आपल्या चरणापाशीच आहेत. या नश्‍वराच्या मोहात न टाकता आपल्या चरणसेवेचा शाश्‍वत आनंद मला मिळावा एवढेच द्या.’’

त्याचक्षणी वेदधर्माचे कोड नाहीसे झाले. त्यांचे शरीर कांतीमान झाले. हा शिष्य सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणून वेदधर्मांनी ब्रम्हविद्येचा विशाल खजिना त्याला समर्पित केला. धन्य आहे संदीपकाची गुरुभक्ती.

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच हा प्रसंग घडविला असावा.

गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जटाधारी उन्मत्त पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. मध्यान्ह समय – भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली, तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षान्नाने भरून परत आली. शिष्टाचार म्हणून गोरक्षनाथांनी त्या व्यक्तीस विचारले, आपण काही घेणार का ? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी केवळ गोदुग्धच घेतो. तेव्हा येथे आपणास कोण गोदुग्ध देते, असे गोरक्षनाथांनी विचारताच या कमंडलूतूनच दूध मिळते. कोणी ना कोणी आणून देते किंवा कमंडलूच दूध आणण्यास जातो. गोरक्षनाथांनी त्या सिद्धाची गंमत करावी; म्हणून विचारले, बघू तुमच्या कमंडलूत किती दूध आहे ? कमंडलू उचलून पाहिले, तर आत ताजे दूध भरलेले होते. तेव्हा त्या सिद्धाच्या सिद्धीसामर्थ्यांची मर्यादा, ताकद, सीमा किती आहे, ते परीक्षावे म्हणून त्यांनी आपण मला माझे पात्र भरून गोदूध भिक्षा देणार का ?, असे विचारताच ती सिद्ध व्यक्ती म्हणाली, का नाही ? येथील सर्व आपलेच आहे, असे प्रेमपूर्वक म्हणाली आणि गोरक्षनाथांना हेच हवे होते. ते तो कमंडलू उचलून आपल्या कटोर्‍यात त्यातील दूध ओतू लगले; पण कटोरा दुधाने भरत नव्हता अन् कमंडलूतून दूधधार चालू होती. गोरक्षनाथ समजून चुकले की, कमंडलू अक्षयपात्र आहे आणि त्या सिद्धाची सिद्धी प्रभावशाली आहे. त्यांनी तो तसाच ठेवला. त्या सिद्धाचा चेहरा निर्विकार होता.

गोरक्षनाथांनी विचार केला की, हे खरे दत्त भगवान आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी त्यांची परीक्षा घेऊ. ते म्हणाले, आपण लपंडाव खेळूया, बघू कोण हरते, कोण जिंकते ते. वारंवार गोरक्षनाथांनी आग्रह धरल्याने त्या सिद्धाने मैदानात उतरण्याचा निश्‍चय केला. आता प्रथम कोणी लपायचे ? यावर असे ठरले की, गोरक्षनाथांनीच प्रथम लपावे अन् हेच गोरक्षनाथांना हवे होते. त्यांना मनोमन खात्री होती की, आता सिद्ध हरणारच. त्यांनी तीन टाळ्या वाजवल्याबरोबर ते अदृश्य झाले. त्या सिद्धाने प्रचंड हास्यध्वनी केला. त्याचे प्रतिध्वनी चारी दिशांनी उमटले. थोडा वेळ मौन धरून त्यांनी तो कमंडलू उचलला आणि त्या खालील थोडी माती काढून त्यातून एक लहानसा बेडूक काढला आणि त्याला आपल्या तळहातावर ठेवून ते हसू लागले. गोरक्षनाथ लाजले, त्यांनी बेडकाचे रूप टाकून मूळ रूप धारण करून पराभव स्वीकारला.

आता त्या सिद्धाची पाळी होती. तोही तीन टाळ्यांच्या आवाजाबरोबर आकाशात उड्डाण करून दिसेनासा झाला. गोरक्षनाथांनी राजहंसाचे रूप घेऊन त्याचा पाठलाग केला; पण सगळे आकाश पालथे घालूनही सिद्ध गवसला नाही. श्‍वासाद्वारे सर्व हवा गाळून सोडली, तरी पत्ता लागेना. शेवटी थकून-भागून ते परत भूमीवर आले आणि पराभव मान्य केला. पाहिले तर तो सिद्ध समोरच उभा होता; पण गोरक्षनाथांना वाटले की, परत एक संधी मिळावी; म्हणून त्यांनी परत सिद्धास फार आग्रह केला आणि त्या आग्रहाचा मान राखण्यासाठी तो परत अदृश्य झाला. गोरक्षनाथांनी योगसिद्धीने हे जाणले की, तो कमंडलूत लपला आहे. त्यांनी माशाचे रूप घेऊन कमंडलुतील सर्व पाणी गाळून काढले; पण शून्य ! मोठ्या निराशेने, दुःखाने ते बाहेर येऊन मूळ रूप घेऊन बसले. त्यांनी पराभव मान्य केला आणि पहातात तो काय, तो सिद्ध त्याच्या आसनावर शांत मुद्रेने, पूर्वीसारखाच धीरगंभीर, जणू काही झालेच नाही, असा बसलेला आहे. गोरक्षनाथांनी त्यांना विचारले, आपण कोणत्या सिद्धबळावर कोठे लपला होता ? सिद्धाने शांतपणे उत्तर दिले, ज्ञानामृतं समरसं गगनीपमोऽहम । म्हणजे मी आकाशात आकाश आणि पाण्यात पाणी झालो होतो. गोरक्षनाथांनी जाणले की, ही समरस सिद्धी आहे आणि त्यांनी त्यांना श्रद्धापूर्वक प्रणाम केला.

तात्पर्य : वृथा अहंकार का बाळगू नये.

गुरुदक्षिणेत अंगठा देणारा एकलव्य

एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना जाऊन विचारले, “गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकवण्याची कृपा कराल का ?”

गुरु द्रोणाचार्यांच्या समोर धर्मसंकट उभे राहिले; कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन दिले होते की, केवळ राजकुमारांनाच ही विद्या शिकवीन. एकलव्य राजकुमार नव्हता, त्यामुळे त्याला ही विद्या कशी शिकवणार ? द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, “मी तुला ही विद्या देऊ शकत नाही.”

एकदा द्रोणाचार्य, पांडव, तसेच कौरव धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी अरण्यात गेले. त्यांच्या समवेत एक कुत्राही होता, जो फिरत फिरत जरा पुढे निघून गेला. तो कुत्रा एकलव्याजवळ पोहोचला. त्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला.

एकलव्याने कुत्र्याला लागू नये आणि त्याचे केवळ भुंकणे बंद व्हावे, अशा रितीने सात बाण त्याच्या तोंडात मारले. कुत्रा परत गुरु द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव जिथे होते तिथे गेला.

गुरु द्रोणाचार्य तर वचन देऊन बसले होते की, अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणीही होणार नाही; पण हा दुसरा कोणीतरी अधिक शिकलेला धनुर्धर होता. गुरूंपुढे धर्मसंकट निर्माण झाले. एकलव्याची अतूट श्रद्धा पाहून गुरुदेवांनी विचारले, “माझ्या मूर्तीसमोर बसून तू धनुर्विद्या शिकलास, असे म्हणालास; पण गुरुदक्षिणा दिली नाहीस.”

एकलव्य : आपण जी मागाल ती गुरुदक्षिणा देईन.

गुरु द्रोणाचार्य : तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे !

एकलव्याने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला.

गुरु द्रोणाचार्य : बाळा ! अर्जुनाला मी वचन दिले असल्याने तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ असला, तरी जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे आहेत, तोपर्यंत लोक तुझ्या गुरुनिष्ठेचे, तुझ्या गुरुभक्तीचे स्मरण करतील, तुझी यशोगाथा गातील !

शिष्य अर्जुनाचे अनुसंधान (मनाची एकाग्रता)

लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल !

द्रोणाचार्यांनी झाडाच्या फांदीवर बांधलेल्या मातीच्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगून पक्ष्यावर नेम धरल्यावर काय दिसते, असे प्रत्येकाला विचारणे

द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले.

द्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर.

युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्ष्यावर नेम धरला.

द्रोणाचार्य : आता तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?

युधिष्ठिर : मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो.

द्रोणाचार्य : तू पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊ शकणार नाहीस. बाजूला हो.

मग दुर्योधनाची पाळी होती. त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले.

द्रोणाचार्य : दुर्योधना, तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?

दुर्योधन : होय, मला हे झाड दिसते. आपण दिसता. माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो.

द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले.

द्रोणाचार्यांनी अर्जुनाला ’काय दिसते’, असे विचारल्यावर त्याने ‘मला केवळ पक्ष्याचा डोळा दिसतो’,असे सांगणे आणि ते ऐकून द्रोणाचार्यांना आनंद होणे

इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्‍न विचारले. सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली. त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी वेध घेऊ दिला नाही. शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलावले. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि नेम धरला.

द्रोणाचार्य : अर्जुना, तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?

अर्जुन : मला केवळ पक्ष्याचा डोळा दिसतो. झाड दिसत नाही. आपण दिसत नाही. माझे भाऊही दिसत नाहीत.

द्रोणाचार्य प्रसन्न झाले.

द्रोणाचार्य (थोडा वेळ थांबून) : नीट विचार करून उत्तर दे. तुला पक्षीच दिसतो कि आणखी काही ते नीट सांग पाहू.

अर्जुन : मला केवळ त्या पक्ष्याचा डोळा दिसतो. इतर काही दिसत नाही.

अर्जुनाचे हे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बाण सोड. अर्जुनाने बाण सोडून पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली.

महाबली हनुमानाने केले भिमाचे गर्वहरण

१. जंगलातून जातांना भिमाला वाटेत लांबलचक

शेपटी पसरून बसलेले म्हातारे माकड दिसणे

एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती.

भीम : ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे.

माकड : मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर.

भीम : घाणेरड्या शेपटीला मी हात लावूकाय ? उचल ती लवकर.

माकड : बरं, मग असंकर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर.

भीम : माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर ?

माकड (किंचित हसून) : आणि तुझी गदाच तुटली तर ?

२. वृद्ध माकडाशी गर्वाने बोलणारा भीम !

म्हातारे माकड थट्टा करत असल्याचे पाहून रागावलेल्या भिमाने गदेने शेपटी हलवणे आणि सगळी शक्ती लावूनही शेपटी तसूभरही न हलणे : एक म्हातारे माकड आपली थट्टा करत आहे, ते पाहून भिमाला राग आला. त्याने रागाने शेपटीला गदा लावली; पण शेपटी हलेना. त्याने शेपटीखाली गदा घातली; पण तो शेपटी उचलू शकेना. उडवून देऊ शकेना. त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला. तो घामाघूम झाला; पण शेपटी हलेना. मग त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला गदा काढताही येईना.

३. भिमाचे डोळे उघडल्यामुळे माकडाने खरी ओळख सांगून हनुमानाचे रूप दाखवणे

आता भिमाचे डोळे उघडले. हे सामान्य माकड नाही, हे त्याच्या लक्षात आले.

भीम (नम्रपणे) : महाराज, आपण कोण आहात ?

माकड : मी श्रीरामभक्त हनुमान आहे.

भिमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भिमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मला क्षमा करा. हनुमानाने भिमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला.

निर्मळता

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."

स्वामी विवेकानंदांनी जगदम्बेकडे केवळ ‘ज्ञान, भक्ति आणि वैराग्य’ मागितले होते. हे कसे घडले, याचा उलगडा करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘संसारातील शेकडो विचारांनी माझ्या मनात ठाण मांडले होते. पूर्वीप्रमाणे पैसा मिळविण्यासाठी घरातून बाहेर पडलो आणि अनेक प्रयत्न करीत इकडेतिकडे फिरू लागलो. एका अटर्नीच्या ऑफिसात थोडेबहुत काम करून आणि काही पुस्तकांचा अनुवाद करून थोडे धन मिळवले आणि कसेबसे दिवस लोटू लागले; पण कायमचे असे काम मिळाले नाही. त्यामुळे आईच्या आणि भावांच्या पोषणाची पक्की व्यवस्था झाली नाही. काही दिवसांनंतर मनात विचार आला की ईश्वर ठाकुरांचे ( रामकृष्ण परमहंस ) सांगणे ऐकतो, म्हणून त्यांना विनंती करून आईला व भावांना अन्न-वस्त्राच्या अभावामुळे होणारे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रार्थना करवून घेईन. माझ्यासाठी अशी प्रार्थना करण्यास ते कधीही नाकबूल होणार नाहीत. असा विचार करून मी घाईने दक्षिणेश्वरी पोहोचलो आणि ठाकुरांना आग्रहाने वारंवार सांगू लागलो, ‘आईचे व भावाचे आर्थिक कष्ट दूर करण्यासाठी आपण जगन्मातेला प्रार्थना केलीच पाहिजे.’ ठाकूर उत्तरले, ‘बाबारे, आईला मी अशा गोष्टी सांगू शकत नाही. तू स्वतः आईला ही गोष्ट का सांगत नाहीस? तू आईला मानीत नाहीस, म्हणून तू इतके कष्ट भोगीत आहेस.’ मी म्हटले, ‘मी तर आईला जाणत नाही; आपणच माझ्यासाठी तिला सांगा- आपण सांगितलेच पाहिजे; तसे केल्यावाचून मी आपणास मुळीच सोडणार नाही.’ प्रेमाने ठाकूर उत्तरले, ‘अरे, कितीतरी वेळा मी म्हटले आहे की आई, नरेन्द्राचे दुःखकष्ट दूर कर; तू तिला मानीत नाहीस, म्हणून तर आई ऐकत नाही. बरे, आज मंगळवार आहे; मी सांगतो, आज रात्री कालीमंदिरात जाऊन आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल. माझी आई चिन्मयी ब्रह्मशक्ती आहे. तिने आपल्या इच्छेने या जगाला जन्म दिला आहे. तिची इच्छा असल्यास ती काय करू शकणार नाही?’

‘माझा दृढ विश्वास बसला की ज्या अर्थी ठाकुरांनी तसे म्हटले आहे त्या अर्थी प्रार्थना करताच निश्चितच सर्व दुःख दूर होईल. अत्यंत उत्कंठेने रात्रीची वाट पाहू लागलो. हळूहळू रात्र झाली. एक प्रहर उलटल्यानंतर ठाकुरांनी मला कालीमंदिरात जाण्यास सांगितले. मंदिरात जाता जाता एक प्रकारच्या गाढ नशेने माझ्यावर अंमल बसविला, पाय लटपटू लागले आणि आईला मी खरोखरच पाहू शकेन व तिच्या मुखातून शब्द ऐकू शकेन असा प्रकारच्या स्थिर विश्वासामुळे इतर सर्व विषयांचा विसर पडून मन अत्यंत एकाग्र व तन्मय झाले आणि त्याच गोष्टीचा विचार करू लागले. मंदिरात उपस्थित झाल्यावर बघितले की आई खरोखरीच चिन्मयी आहे, खरोखरच ती जिवंत आहे आणि अनंत प्रेमाचे व सौंदर्याचे ती उत्पत्तिस्थान आहे. भक्तीने व प्रेमाने हृदय उचंबळू लागले; विव्हल होऊन वारंवार प्रणाम करीत म्हणून लागलो, ‘आई मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ति दे असे करून दे की मला तुझे नेहमी अबाधित दर्शन लाभेल.’ हृदय शांतीने भरून गेले. सर्व जग पूर्णपणे अदृश्य होऊन एकमात्र आईच हृदय व्यापून उरली.

‘ठाकुरांजवळ परत पोहोचताच त्यांनी विचारले, ‘काय रे, संसारातील उणीवा दूर करण्यासाठी तू आईला प्रार्थना केलीस ना?’ त्यांच्या प्रश्नाने चकित होऊन मी म्हटले, ‘नाही महाराज, विसरून गेलो. आता मी काय करू?’ ते म्हणाले, ‘जा, जा, पुनः जा, आणि प्रार्थना कर.’ फिरून मी मंदिरात गेलो. आईसमोर उपस्थित झाल्यावर पुनः मुग्ध होऊन सर्वकाही विसरून गेलो व पुनःपुन्हा प्रणाम करीत ज्ञान-भक्ति-लाभासाठी प्रार्थना करून परत फिरलो. हसत हसत ठाकूर म्हणाले, ‘काय रे, यावेळी तू सांगितलेस ना?’ पुनः चकित होऊन म्हटले, ‘नाही महाराज, आईला पाहताच एका दैवी शक्तीच्या प्रभावामुळे सर्व गोष्टी विसरून जाऊन केवळ ज्ञान-भक्तिलाभाविषयीच सांगितले. आता काय होईल?’ ठाकूर म्हणाले, ‘ वा रे पोरा, स्वतःला थोडे सावरून ही प्रार्थना करू शकला नाहीस ना! शक्य असेल तर पुनः एकदा जाऊन या गोष्टी सांगून ये. जा, लवकर जा.’ फिरून मंदिरात गेलो; मंदिरात प्रवेश करताच घोर लज्जेने माझे हृदय भरून गेले. विचार करू लागलो की ही असली क्षुद्र गोष्ट आईला सांगण्यासाठी आलो आहे. हा तर ठाकूर म्हणत त्याप्रमाणे ‘राजाला प्रसन्न करून घेतल्यावर त्याला भोपळा मागण्यासारखा निर्बुद्धपणा झाला! माझी बुद्धी इतकी का हीन झाली आहे! लज्जेने व घृणेने भरून जाऊन आईला पुनःपुन्हा प्रणाम करून म्हणू लागलो, ‘ आई मला दुसरे काही नको, केवळ ज्ञानभक्ती दे.’ मंदिराबाहेर आल्यावर मनात विचार आला की ही निश्चितच ठाकुरांची लीला आहे. नाहीतर तीनतीनदा आईकडे गेल्यावरही काही सांगता आले नाही. त्यानंतर ठाकुरांना मी आग्रहपूर्वक म्हणू लागलो की निश्चित आपणच अशी भुरळ पाडली, आता आपल्यालाच सांगावे लागेल की माझ्या आईला व भावांना अन्नवस्त्राची ददात उरणार नाही. ते उत्तरले, ‘अरे, तशी प्रार्थना मी कुणासाठीदेखील कधीच करू शकलो नाही, माझ्या मुखातून तशी प्रार्थना बाहेर पडताच नाही. तुला मी सांगितले की आईला जे तू मागशील तेच तुला मिळेल. तू मागू शकला नाहीस, तुज्या नशिबी संसारातील सुख नाही, त्याला मी काय करू?’ मी म्हटले, ‘महाराज, ते काही चालणार नाही. माझ्यासाठी आपण ही गोष्ट सांगितलीच पाहिजे; माझा पक्का विश्वास आहे की आपण म्हटल्यास माझ्या आईचे व भावाचे दुःख उरणार नाही. याप्रमाणे जेव्हा मी सारखा त्यांच्यामागे लागलो तेव्हा ते म्हणाले, ‘बरे जा, त्यांना जाड्याभरड्या अन्नवस्त्राची कधीच उणीव भासणार नाही.’

तात्पर्य, चित्तशुद्धी झालेला उपासक मागणे मागणार ते परमार्थाचेच ! लोककल्याणाचेच ! स्वार्थाचा लवलेशही मागण्यात नसणार. अशा उपासकाच्या इच्छापूर्तीतून जगाचे भलेच होणार !

असा गुरु, असा शिष्य

गिर्यारोहकांची एक तुकडी एक अवघड शिखर सर करण्यासाठी चालली होती. वाट खूप अवघड व धोकादायक होती. वेळेत शिखरावर पोहोचू शकणार नसल्याची जाणीव होताच सर्वांनी बेस कॅम्पवर परतण्याचे ठरवले. पण एक जिद्दी गिर्यारोहक तसाच पुढे चालत राहिला. शिखर जवळ आले पण तेवढयात अंधार पडला. तरीही तो चालत राहिला व दुर्दैवाने अंधारात पाय घसरून पडला आणि खोल दरीत कोसळू लागला. कोसळत असताना त्याला जाणवले की या प्रचंड उंचीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या देहाच्या चिंधड्या उडणार आहेत. तो जीवाच्या आकांताने ओरडला,

"गुरुजी मला वाचवा … वाचवा … "

कोसळताना त्याच्या कमरेच्या दोरीमुळे तो अधांतरी लोंबकळू लागला. डोळे विस्फारून पाहिले तरीही खाली अजून किती खोल दरी आहे याचा अंधारामुळे त्याला अंदाज येत नव्हता. त्याने पुन्हा एकदा गुरुजींचा धावा केला. त्या भीषण दरीतील अंधारात त्याचा आवाज घुमला व क्षणार्धात प्रतिध्वनी उमटला,

"तुला मी खरंच वाचवावं असं वाटतं काय ?"

"होय गुरुजी, मी अत्यंत कळकळीची विनंती करतो, मला वाचवा"

"ठीक आहे", दरीतून आवाज आला," मग तुझ्या खिशातला चाकू काढ आणि कमरेला गुंडाळलेली दोरी कापून काढ."

गिर्यारोहकाला ही सूचना पार वेडेपणाची वाटली. आजूबाजूला हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी होती. पण दोरीला लोंबकळत राहिल्याने जगण्याची थोडीतरी खात्री होती. पण गुरूच्या आज्ञेनुसार कमरेची दोरी कापली तर खोल दरीत कोसळून आपण नक्कीच मरणार या कल्पनेने तो क्षणभर गोंधळला. शेवटी त्याने दोरी कापून शरीराच्या चिंधड्या उडवून घेण्यापेक्षा रात्रभर थंडीत लोंबकळत राहण्याचा पर्याय स्वीकारला.

सकाळ झाली. ऊन पडले. बर्फ वितळू लागले. गिर्यारोहकांची तुकडी रात्रभर कॅम्पवर न परतलेल्या सहकाऱ्याच्या शोधात बाहेर पडली. थोडयाच वेळात ते त्या शिखराच्या खालच्या भागात पोहोचले. तेथे त्यांना दिसले कि त्यांच्या सहकाऱ्याचा मृतदेह दोरीला लोंबकळत होता आणि जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर तो देह थंडीने गारठून थिजलेला होता!

तात्पर्य - जेंव्हा आपली बुद्धी चालेनाशी होते तेंव्हा आपण गुरूला शरण जातो. पण एकदा शरण गेल्यानंतर उपदेश मानण्याच्या वेळी पुन्हा आपली बुद्धी चालवण्याचा मोह किंवा स्वसामर्थ्याची व्यर्थ जाणीव धोक्याची असते. सर्व गोष्टींचा विचार करूनच गुरूने मार्गदर्शन केलेले असते. पण समर्पणाऐवजी अहंभाव जागा झाल्यास सर्वनाश होतो!

गुरूदक्षिणा

सूर्य न चुकता प्रकाश देतो, ढग, पाऊस देतो. हवा कोणताही भेदभाव न करता सर्वांना जिवंत ठेवते. फूलही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाहीत. त्याचप्रमाणे गुरूजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात. शिष्यांकडून गुरूदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो. परंतु शिष्याचे सूर्याप्रमाणे देदिप्यमान होणे हीच गुरूला दिलेली सर्वांत योग्य गुरूदक्षिणा आहे.

प्राचीन काळातील एक कथा आहे. एक गुरू आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते. ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते. पण आश्रम योग्य प्रकारे चालवू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती. आश्रमात दोन शिष्य होते. दोघेही गुरूला प्रिय होते. एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले. मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हाला दोन मुठी गहू देतो आहे. मी परत येईल तेव्हा मला दोन मुठी गहू परत द्या.

जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल, मी त्याला या गुरूकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेन. दोघांनी गुरूंना आज्ञा पाळू असे वचन देऊन निरोप दिला. काही महिन्यांनंतर गुरू परत आले. त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलविले. हा शिष्य या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करीत होता. त्याने गव्हाची पुरचंडी गुरूंना दिली. त्यातील गहू पार सडून गेले होते. आता त्यांचा कोणताही उपयोग नव्हता.

नंतर गुरूंनी दुसर्‍या शिष्याला बोलाविले. तो गुरूंना आश्रमामागे घेऊन गेला. तेथे त्याने समोरचे शेत दाखवून गुरूंना सांगितले, हे तरारून आलेले पीक पहाताय ना ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गव्हातून उभे राहिले आहे. त्यामुळे आपण मला क्षमा करा. तुम्ही दिलेले गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही. डोलणारे हिरवेगार पीक पाहून गुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, जो शिष्य गुरूचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे. गुरूसाठी हीच खरी गुरूदक्षिणा आहे.

सामान्यतः गुरूदक्षिणेचा अर्थ बक्षिस वा आर्थिक मोबदला असा घेतला जातो, परंतु तो खऱा अर्थ नाही. गुरूदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. गुरूकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा प्रसार-प्रचार व त्याचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरूदक्षिणा आहे. गुरूदक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परिक्षेसंदर्भातही घेतला जातो. गुरूदक्षिणा गुरूप्रती सन्मान व समर्पण या भावनेचे प्रतीक आहे. गुरूला योग्य दक्षिणा म्हणजे तुम्ही स्वत: गुरू बना. खरा गुरू तोच की जो शिष्याला स्वत: चे गुरूत्व बहाल देतो.

गुरूदक्षिणा अशा वेळी दिली जाते किंवा घेतली जाते, ज्यावेळी शिष्य गुरूने दिलेल्या ज्ञानाने ओथंबलेला असतो. अर्थात, शिष्यच गुरू होण्याच्या स्थितीत आलेला असतो. गुरूजवळचे समग्र ज्ञान जेव्हा शिष्य ग्रहण करून घेतो आणि गुरूजवळ देण्यासाठी काहीही उरलेले नसते तेव्हा गुरूदक्षिणेचे सार्थक होते.

अर्जुनाने यूद्धभूमीवर गुरू द्रोणाचार्याला समोर प्रतिस्पर्धी योद्ध्याच्या रूपात पाहिले तेव्हा त्याने लढण्यास नकार दिला. असे करण्यात अर्जुनाचा गुरूप्रती आदर दिसतो. एकलव्याला गुरू द्रोणाचार्यांनी विचारले, की तुझा गुरू कोण आहे? तेव्हा त्याने सांगितले, की गुरूदेव आपणच माझे गुरू आहात. आपल्या कृपेने आपल्या मूर्तीला गुरू मानून मी धनुर्विद्या शिकलो आहे. तेव्हा द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरूदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. एकलव्याने हसत आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांना दिला. यामुळे एकलव्याची ख्याती दूर पसरली आणि तो एक इतिहास पुरूष बनला. गुरूचे संपूर्ण जीवन आपल्या शिष्याला सर्व बाबतीत लायक बनविण्यात जाते. गुरू आपले कर्तव्य पूर्ण करतो पण दुसरे कर्तव्य शिष्याचे आहे, ते म्हणजे गुरूदक्षिणा देणे. हिंदू धर्मात गुरूदक्षिणेचे महत्त्व अधिक मानले जाते. गुरूकुलामध्ये शिक्षण घेतल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरूदक्षिणा देतो. गुरूदक्षिणेचा अर्थ काही धन-दौलत नाही. ते गुरूवर अवलंबून असते की तो आपल्या शिष्याला कोणत्या प्रकारची गुरूदक्षिणा मागतो. गुरू आपल्या शिष्याची परीक्षा घेताना अनेकदा गुरूदक्षिणा मागतात. त्यावेळी गुरूच्या आदेशाचे पालन करणे शिष्याच्या जीवनाचे परम कर्तव्य बनते. विवेकानंदांनी गुरूंचा आदेश मानून संपूर्ण जगात सनातन धर्माचा प्रचार-प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या आदेशानुसार हिंदवी स्वराज्याची उभारणी केली.

कृष्ण आणि बलराम यांनी सांदिपनींच्या आश्रमात राहून शिक्षण पूर्ण केले. गुरूदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा गुरूने मगरीने गिळलेल्या आपल्या पुत्राला परत मिळवून द्यावे अशी गुरूदक्षिणा कृष्णाकडे मागितली. गुरूदक्षिणा देण्यासाठी कृष्ण-बलरामाने यमराजाकडे जाऊन त्यांचा पुत्र परत आणून दिला.




अंगुलीमालसारखा क्रूर दरोडेखोर बुद्धामुळेच भिक्षू बनला. असे गुरूचे सामर्थ्य असते. गुरूच योग्य शिष्याला शोधून काढतात. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला, समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजीला आणि रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना शोधले. आपण योग्य शिष्य असाल तर आपल्याला गुरू शोधण्याची गरज नाही. गुरू स्वतःच तुमचा शोध घेईल. फक्त तुम्ही गुरूदक्षिणा देण्यासाठी तयार रहा.

गुरूंचे आज्ञापालन

पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले.

मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'

प्रेम आणि शांतता

एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही हे जाणवून तो दूर निघून गेला.

तात्पर्य- प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.

पाणी

एक शिष्य आपल्या गुरुकडून आठवड्याच्या सुट्टीनंतर आपल्या गावी जात होता. मग गावात पायवाट व्हावी लागली. जाताना त्याला एक विहीर दिसली.शिष्य तहानलेला होता, म्हणून त्याने विहिरीतून पाणी काढले आणि त्याचा घसा भिजविला. शिष्याला आश्चर्यकारक समाधान मिळाले कारण विहिरीचे पाणी खूप गोड आणि थंड होते.

शिष्याने विचार केला - गुरुजींसाठी इथे पाणी का घेत नाही? त्याने आपले डोके भरून परत आश्रमाकडे निघाले. त्यांनी आश्रम गाठले आणि गुरुजींना सर्व काही सांगितले.

गुरुजींनी शिष्यापासून मुखवटा काढून पाणी प्यायले व समाधानी झाले. तो शिष्याला म्हणाला- खरोखर पाणी हे गंगेच्या पाण्यासारखे आहे. शिष्य प्रसन्न झाला. गुरुजींकडून अशी स्तुती ऐकून शिष्य परवानगी घेतल्यावर आपल्या गावी गेले.

काही वेळातच आश्रमात राहणारा दुसरा शिष्य गुरुजींकडे पोहोचला आणि त्याने ते पाणी पिण्याची इच्छाही व्यक्त केली. गुरुजींनी शिष्याला मुखवटा दिला. शिष्याने घूंट घेताच त्याने पाणी काढून स्वच्छ केले.

शिष्य म्हणाले - गुरुजी, या पाण्यात कटुता नाही आणि हे पाणीही थंड नाही. तुम्ही व्यर्थपणे त्या शिष्याचे खूप कौतुक केले.

गुरुजी म्हणाले - मुला, या पाण्यात गोडपणा आणि शीतलता नसेल तर काय? हे ज्याने आणले त्याच्या मनात आहे. जेव्हा तो शिष्य पाणी पित असता, तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झाले. तेच महत्वाचे आहे. मलाही तुमच्यासारख्या या मास्कचे पाणी आवडले नाही. पण हे बोलून मला त्याचे हृदय दुखवायचे नव्हते.

हे असू शकते की जेव्हा बाटलीत पाणी भरले जाते, तेव्हा ते थंड होते आणि पाणी साफ होत नसतानाही हे पाणी एकसारखे राहिले नाही, परंतु ज्याने आणले आहे त्याचे प्रेम कमी होत नाही, नाही का? ?

तात्पर्य - इतरांच्या अंतःकरणाला दुखविणार्‍या गोष्टी टाळता येतील आणि प्रत्येक वाईटात चांगल्या गोष्टी मिळू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले