जगन्नाथ (नाना)शंकरशेठ
हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
◆जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३
◆मृत्यू :~ ३१ जुलै १८६५
🔷ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
🔶नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
♦ एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.16 एप्रिल 1853 रोजी पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे धावली
बोरीबंदर स्थानकातून दुपारी 3.30 वाजता 21 तोफांची सलामी घेऊन ठाण्याच्या दिशेने निघालेल्या या गाडीला 14 डबे होते. साहिब,सिंध आणि सुलतान अशी शक्तीशाली 3 वाफेची इंजिने लावलेली होती.21 मैल म्हणजे 34 किलोमीटर प्रवासाला या रेल्वेला 1 तास 12 मिनिटे लागली. लोकांनी या रेल्वे गाडीला चाक्या म्हसोबा हे नाव दिले होते.
मोजक्याच प्रतिष्ठित अशा 400 माणसांना गाडीत बसण्याचे निमंत्रण होते. 25 व्हिआयपी होते त्यात ही रेल्वे सुरू करण्यासाठी ज्यांचे मोठे योगदान होते ते नाना शंकरशेठ होते.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून रेल्वेने त्यांना सोन्याचा रेल्वे पास दिला होता.
🔷पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.