पांडुरंग सदाशिव खानखोजे Pandurang Sadashiv Khankhoje
क्रांतिकारक, कृषी शास्त्रज्ञ
क्रांतिकारक की कृषी शास्त्रज्ञ, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.
१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.
कृषी शास्त्रज्ञ खानखोजे
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.
मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत 'आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल' असे लिहिले आहे.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वत: शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.
जन्म : नोव्हेंबर ७, इ.स. १८८४ (वर्धा , महाराष्ट्र)
मृत्यू : जानेवारी १८, इ.स. १९६७
(वय 83)(नागपूर , महाराष्ट्र)
संघटना : गदर पार्टी,
बर्लिन समिती, भारतीय
कम्युनिस्ट पार्टी
हालचाल : हिंदू-जर्मन षड्यंत्र , भारतीय कम्युनिझम
गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा भन्नाट प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. सात नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा धावता आढावा..
परकीय भूमीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या एका क्रांतिकारकाची ही कहाणी आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचे नाव. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अक्षरश: होम केला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी जगभर वणवण केली. इंडो-चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानची सीमा, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मेक्सिको अशी ही भ्रमंती १८ जानेवारी १९६७ ला शांत झाली.
७ नोव्हेंबर १८८६ रोजी वर्धा जन्मलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा आयुष्यपट चक्रावून टाकणारा आहे. वयाच्या २० व्या वर्षी मातृभूमीला पारखे झालेल्या या वीराची स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य आकांक्षा, परकीय ब्रिटिश सत्तेला शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानेच देशाबाहेर घालवता येईल, ही पक्की मनोधारणा त्यांच्या जीवनप्रवासात जागोजागी दृष्टोत्पत्तीस येते. गदर चळवळींच्या प्रणेत्या खानखोजेंकडे प्रयोगशीलता होती. गदर चळवळीत, मेक्सिकोत शेती संशोधनांतही ती कामी आली; पण या प्रयोगशीलतेचा योग्य उपयोग आमचे शासनकर्ते करून घेऊ शकले नाहीत.
लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली खानखोजेंनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावणीच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशिराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आदी क्रांतिकारक त्यांच्याबरोबर होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी अर्धे जग पालथे घातले, पृथ्वीप्रदक्षिणा केली, अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन्यत सेन, जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर हे त्यांचे आदर्श होते. दोघेही शेती क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच मेक्सिकोत त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. हे सगळे करीत असताना मायभूमीच्या ओढीने ते तीन वेळा भारतात आले. पैकी एकदा इराणी नाव, इराणी पासपोर्ट आणि इराणी वेश धारण करून १० जून १९१९ ला मुंबईत आले. लोकमान्य टिळकांना गुप्तपणे भेटले. त्यांनी भारतात न राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे परत पॅरिस, बर्लिन, मॉस्को असा प्रवास करून मेक्सिकोत स्थायिक झाले. मॉस्कोत लेनिनशी दोनदा भेट झाली. त्याअगोदर सन्यत सेनशी भेट झाली होती. १९२४ ते १९४९ असे २५ वर्षे भारताबाहेर मेक्सिकोत राहून ते कृषी सल्लागार म्हणून भारतात आले; पण पाच महिन्यांनंतर परत गेले. त्यानंतर फेब्रुवारी १९५० ते ऑगस्ट १९५१ असे दीड वर्षे ते भारतात राहिले; पण इथल्या शासनकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर नोव्हेंबर १९५५ मध्ये नागपूरला कायमच्या वास्तव्यासाठी आले ते केवळ मायभूमीत अखेरचा श्वास घ्यायचा म्हणून.
खानखोजे हे कधी काळी तेलंगणातून आलेले कुटुंब असावे. त्यांच्या एका पूर्वजाने पुंडावा करणाऱ्या एका खानाला शोधून काढले होते. म्हणून त्यांचे नाव खानखोजे असे पडले. त्यांचे मातुल घराण्याचे आडनाव फत्तेखानी. एका पुंडावा करणाऱ्या खानाला त्यांनी पकडले म्हणून ते फत्तेखानी झाले. त्यांचे आजोबा व्यंकटेश हे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले होते. त्यांची भेट तंटय़ा भिल्लाशी झाली होती. त्याने त्यांना ब्रिटिशांशी लढा देण्यास सांगितले होते.
डॉ. खानखोजे माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर येथे आले. नील सिटी हायस्कूलचे ते विद्यार्थी. वयाच्या अठराव्या वर्षी या मुलाचे लग्न केले तर तो मार्गावर येईल या धारणेने त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न ठरवले, पण त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले. बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचा या सुमारास संपर्क आला. सखाराम देऊस्कर, ब्रह्मबांधव बंडोपाध्याय यांच्याशी भेट झाली. एक वेगळा प्रयोग म्हणून सर्कस चालू केली, पण हा प्रयोग फसला. सर्कस वादळात सापडली आणि अक्षरश: कोलमडली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. ते पुण्यास टिळकांना भेटले. (१९०५) टिळकांनी त्यांना जपानला जाण्याचे सुचवले. १६ ऑक्टोबर १९०५ला लॉर्ड कर्झन यांनी वंगभंगाचा आदेश काढला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. ब्रिटिशांची दडपशाही वाढत होती. अशा वातावरणात हा सल्ला टिळकांनी त्यांना दिला होता.
खानखोजेंना भाऊ म्हटले जात असे. भाऊ प्रथम बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थाना भेटले. रामतीर्थानी त्यांना एक पत्र दिले. भाऊंना मोबासा येथे टाइमकीपरची नोकरी मिळाली, पण जायला मिळाले नाही. अमेरिकन वकिलातीने मदत केली, पण अमेरिकन जहाजाच्या ब्रिटिश कप्तानाने त्यांना प्रवेश नाकारला. नंतर मेसेंजर मेरिटाइम या जहाज कंपनीचे येरा हे जहाज कोलंबोपर्यंत जाणार होते, त्यावर ते हरकाम्या म्हणून नोकरीस लागले. पोलिसांनी कोलंबो येथे चौकशी केली, पण त्यातून ते सुटले. सायगाव येथे उतरल्यावर रिक्षावाल्याने त्यांना हिंदू देवळांत नेले. तेथील पुजारी तेलगू भाषिक. त्याच्याकडून बरीच माहिती मिळवली. पुढील प्रवासात हाँगकाँग, शांघाय येथे उतरू न दिल्याने योकोहामा येथे उतरले. कॅप्टनने त्यांच्यासाठी रदबदली केली. ते जपानी भाषेचे विद्यार्थी झाले. इथे त्यांना गोविंदराव पोतदारांची खूप मदत झाली. इंग्लिशचे वर्ग चालवले. जेवणखाण्याचे हाल होते. इथे त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. जहाजावर मित्र झालेल्या चिनी मित्रांच्या ओळखीने त्यांची सन्यत् सेनशी भेट झाली. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय शेती यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
खानखोजे यांनी या काळात स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. २ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांनी कोबे चेंबर ऑफ कॉमर्सपुढे भाषण दिले. याच काळात त्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची क्रांती सेना स्थापन केली. १९०६ला सॅनफ्रान्सिस्को येथे भीषण भूकंप झाला होता. पुनर्वसनाच्या कामासाठी मजुरांची आवश्यकता होती. खानखोजे मजूर म्हणून खालच्या डेकचे स्वस्त तिकीट घेऊन सॅनफ्रान्सिस्को येथे गेले. सॅनफ्रान्सिस्को बंदरात त्यांना अडवण्यात आले. तू काय करणार आहेस? खानखोजे उत्तरले. ‘विद्यार्जन’. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. बर्कलेला त्यांचे मित्र (सर्व बंगाली) भेटले. एका हॉटेलात भांडी विसळण्याचे काम मिळाले, पण ते नीट होईना म्हणून मालकाने त्यांना काढून टाकले. नंतर एका रुग्णालयात बशा धुण्याचे काम मिळाले. पगार नव्हता, पण राहायला जागा आणि तीन वेळ खाना होता. त्यांनी ‘इंडिया इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली. बर्कले विद्यापीठात त्यांनी शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठवडाअखेर रेल्वेरुळांवर खडी वाहून नेण्याचे हे काम केले. हॉम नावाची सुगंधी फुले वेचली. ही हिरव्या रंगाची फुले बीअरमध्ये वापरत असत.
तिथून ते सॅक्रोमेंटोला पोहोचले. त्यांनी शेतात काम केले. त्यांचा अनेक पंजाब्यांशी परिचय झाला. मेक्सिकन क्रातिकारकांशी घनिष्ठ परिचय झाला. तो पुढे उपयोगी पडला. पोर्टलंड येथे अशिक्षितपणाचे सोंग आणून लाकूड फॅक्टरीत काम मिळवले. १९१०मध्ये त्यांनी शेतीशास्त्राची कॉर्नवालिसची पदवी मिळाली. राफेल येथील मिलिटरी अॅकॅडमीत वेटरचे काम मिळाले. तेथे सैनिक प्रशिक्षणही घेतले. इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. पीरखान या नावाने सीएटल, सॅक्रोमेंटो, सॅनफ्रान्सिस्को येथे शाखा काढल्या. वॉशिंग्टन स्टार विद्यापीठात जेनेटिक्सचा अभ्यास केला. स्पोकेन येथे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांत काम केले. पिंगळे, हरदयाळ यांच्या संपर्कात आले. आझाद हिंद पक्षाचे गदर पार्टी असे नामकरण झाले. त्यांना स्वत:ला गदर हे नाव पसंत नव्हते. (१९१३) युगांतर आश्रमाची स्थापना झाली. जर्मनीने उघड पाठिंबा दिला.
याच काळात सम फॅक्टर्स विच इनफ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लान्टस् हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. (दुर्जल कृषीशास्त्र) एम.एस. पदवी मिळवली. पुलमन येथे सॉइल फिजिक्स प्रयोगशाळेत काम केले. अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनची लाइफ मेंबरशिप मिळवली. भारतावर सिनेस्लाइड्सच्या साहाय्याने व्याख्याने देणे चालू केले. हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेची स्थापना केली. गनिमी युद्धाची तयारी सुरू झाली. जुलै १३मध्ये कॉव्र्हरची भेट झाली. मिनेसोटा विद्यापीठांत पीएच.डी.साठी त्यांनी नाव नोंदवले. पण पहिले महायुद्ध चालू झाले. खानखोजे आणि त्यांचे सहकारी सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करू लागले. पीएच.डी. मागे पडली. याच वेळेला कोमागाटा मारू प्रकरण झाले.
कोमागोटा मारूचा गदर चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, पण खानखोजे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. चळवळीच्या प्रहारक विभागाचे खानखोजे प्रमुख होते. दहा हजार स्वयंसेवक लढण्यासाठी तयार होते. त्यांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ा करून भारतात शिरण्याची योजना होती. जर्मनीचा उघड पाठिंबा होता. भारतीय जनतेस जागे करण्यासाठी एम्डेनने पूर्व किनाऱ्यावर हल्ला केला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खानखोजे पीएच.डी. अर्धवट टाकून निघाले. न्यूयॉर्कला भारतीय पासपोर्ट मिळाला नाही तेव्हा तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानमार्गे शिरण्याची योजना झाली. सप्टेंबर १९१४ मध्ये तिघे जण निघाले. आगाशे (मिर्झा महमद अली), खानखोजे (महमदखान), कोचर (दाऊदखान) यापैकी आगाशे यांच्याकडे इराणीयन पासपोर्ट होता. इराणी जेन्डार्मीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. न्यूयॉर्क, अथेन्स, पिरओस- वेगवेगळ्या जहाजांनी, स्मर्नास रेल्वेने आले. कोचर यास प्रचार साहित्यासह जहाजाने मुंबईत पाठवले. पण त्यास पंजाबात पकडण्यात आले. खानखोजे यांचा पुढचा प्रवास इस्तंबुल (सप्टेंबर १९१४), बगदाद (डिसेंबर १९१४), पुस्तइकुत (फेब्रवारी १९१५), बुशायर (मार्च १९१५) असा झाला. इस्कोनडेरेन येथे रेल्वेवर ब्रिटिश विमानांनी हल्ला केला. ते थोडक्यात बचावले. पर्शियात त्यांनी महमदखान हे नाव घेतले होते. पर्शियन सीमेपर्यंत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी होडीतून २०० मैल जावे लागले. पर्शिया जर्मनीच्या बाजूने होता. देशफुल येथे ब्रिटिश हल्ल्यामुळे रातोरात पळावे लागले. बुशायर येथे जनानखान्यात लपावे लागले. नंतर जनान्याबरोबरच ते शहराच्या बाहेर पडले. शिराजला एप्रिल १९१५, निरीज ऑगस्ट १९१५, केरमान नोव्हेंबर १९१५, ३५० मैल वाळवंटी प्रवास करून बलुचिस्तान सीमेपर्यंत आले. गदरचे हंगामी सरकार १ डिसेंबर १९१५ ला स्थापन केले. जर्मनी, तुर्की, हंगेरी या सरकारांनी मान्यता दिली, पण फासे उलटे पडू लागले होते. स्थानिक सुलतान दगाबाज निघाला. खानखोजे यांना उंटावरून पळ काढावा लागला. काही गदर सैनिक मेले. बाफ्त येथे बर्फाच्छादित पर्वतराजींतून प्रवास झाला. इथे ते इंग्रजांचे कैदी झाले. पण ते बहाई सुन्नी शिपायांत स्वातंत्र्याचा प्रचार करीत राहिले. त्यांनी खानखोजेंची साखळदंडांतून मुक्तता केली. रात्री त्यांनी छावणीतून पलायन केले. एका गुहेत राहिले. पोट बिघडले होते. उपाशी, खोकला, ताप होता असताना बर्फाळ उतारावरून स्वत:ला खाली झोकून दिले. दोन टोळीवाल्यांनी त्यांना पकडले. त्यांच्या प्रमुखाने त्यांना आश्रय दिला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी दरवेशाचा वेश घातला आणि पळाले. नाही तर युद्धकैदी झाले असते. बलुची टोळीत वर्षभर राहिले. याच काळात त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. पर्शियन युद्ध थांबले होते. ब्रिटिशांनी पर्शियन सरदाराने खानखोजे यांना स्वाधीन करावे असे सांगितले होते. खानखोजे काशघईच्या वेषांत पळाले म्हणून वाचले. उरुजान येथे प्रयाण केले. काशगई प्रमुख सहामे याचे ते स्वीय सहायक बनले. १ डिसेंबर १९१५ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात स्वतंत्र हिंदुस्थानाचे सरकार अस्तित्वात होते. इराणी बलुचिस्तानच्या भागात ते होते. उरुजान येथे ते इंग्लिश आणि शेतीशास्त्र शिकवू लागले. याच सुमारास सुलतान आजारी झाला आणि उपचारासाठी त्याला मुंबईमार्गे युरोपला जायचे होते. खानखोजे त्याच्याबरोबरच मुंबईत आले. गिरगावात पोतदार यांच्यामार्फत टिळकांना भेटले.
टिळकांनी खानखोजे यांना पर्शियात परत जायला सांगितले. गदर चळवळ संपली होती. त्याची अनेक कारणे होती. १) भारतीय जनतेचा अनुत्साह. २) एम्डेन प्रकरणांनंतर जर्मनीचा भारतीय स्वातंत्र्य लढय़ांतील उत्साह कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने ४३ फरारी क्रांतिकारकांची नावे घोषित केली. त्यांच्यावर मृत्यूचा हुकूमनामा होता. खानखोजे यांचे नाव त्यात होते. काळ्या यादीतले नाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काढले गेले नव्हते. ३) महायुद्धात हरल्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी याचा पाठिंबा गेला. ४) खुद्द पंजाबमध्ये या चळवळीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ५) कोमागाटा मारूच्या प्रकरणातील एकही जण पंजाबपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जनजागृती झाली नाही. ६) गदर चळवळीला खालसा दिवाणचा पाठिंबा नव्हता. ७) किरपालसिंग फितूर झाला. ४२ जण फांशी गेले, ११४ ना काळेपाणी, ९३ सश्रम कारावास, कर्तारसिंग, पिंगळे हे फाशी गेले.
नोव्हेंबर १९२१ मध्ये सुलतानचे प्रमाणपत्र घेऊन खानखोजे जर्मनीत गेले. रशियास भेट दिली. गदर चळवळीत तीन गट झाले होते. एम्. एन्. रॉय उघडपणे लेनिनवादी होते. कम्युनिझम प्रथम, स्वातंत्र्य नंतर, अशी त्यांची भूमिका होती. खानखोजे आधी स्वातंत्र्य, मग साम्यवाद अशी भूमिका मांडत होते. लेनिनशी त्यांची दोनदा भेट झाली होती. रॉय गट गदर क्रांतिकारकांविरुद्ध जात होता, अशी शंका होती. त्यामुळे रशिया वा जर्मनीत वावरणे धोक्याचे झाले होते. काही गदर कार्यकर्त्यांचा रहस्यमय शेवट झाला होता. बर्लिनमध्येही राहणे धोक्याचे होते. अमेरिका ब्रिटनच्या बाजूने उतरली होती. अमेरिकेतील सर्व गदर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
खानखोजे यांनी सर्व विचारांती मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मेक्सिकन क्रांतिकारकांबरोबर मोलमजुरी केली होती, त्यापैकी काही आता स्वतंत्र मेक्सिकोत मोठय़ा पदावर होते. रोमन नेग्री हे शेतीमंत्री झाले होते. जानेवारी १९२४ मध्ये खानखोजा मेक्सिकोत दाखल झाले. स्कूल ऑफ अॅग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्यांना आठ भाषा येत होत्या. पण स्पॅनिश येत नव्हती. प्रस्तुत लेखकाला १९५६-५७ मध्ये नागपूरला नोकरीनिमित्ताने मादाम जान खानखोजेंकडून फ्रेंच शिकण्याची संधी मिळाली.
खानखोजे यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन केले. गव्हाची अनेक नवीन वाणे तयार केली. मक्याच्या जनुकांत मूलभूत फेरफार करून मक्याच्या एका कणसाचे उत्पन्न पाचपट केले. खानखोजे शेतकऱ्यांचे देव बनले. ख्रिस्ताच्या बरोबरीने त्यांची छायाचित्रे घराघरांतून लागली. मक्याच्या एकेका ताटावर तीस-तीस कणसे. मक्याची निर्यात वाढली. शेतकऱ्याकडे पैसा आला. खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असे नांव मिळाले. चापिंगो त्यांचे राहण्याचे गाव. तूर, चवळी, जंगली वाल, सोया डाळ, शेवगा यावर त्यांनी संशोधन केले. अगदी निवडुंगावरसुद्धा. मेक्सिकन रेल्वेने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. त्यांनी ‘जेनेटिक्स’ हा विषय शिकवला. १९३१-३२ मध्ये मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते पॅरिस, बेल्जियम, जर्मनी येथे गेले. परत आल्यावर त्यांनी व्हेराक्रूझ येथे डाळिंबाची नवी जात विकसित केली. १९३६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी २७ वर्षांनी तरुण असलेल्या जान सिंड्रिक तरुणीशी विवाहबद्ध झाले. जानची जानकी झाली. मेक्सिकोतील बेल्जियम कॉन्सलरची ती मेव्हणी होती. तिने त्यांना मागणी घातली. खानखोजे रेल्वेचे शेतीखातेप्रमुख झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रबरावर संशोधन करून त्याचे उत्पन्न वाढवले. १९२७ मध्ये खानखोजे यांच्यावरील बंदी उठवावी, असा प्रयत्न माधव अणे यांनी केला, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, मेक्सिकोतील खाणधंद्यात गुंतलेली त्यांची सगळी रक्कम बुडाली. १९१९ च्या गुप्त भेटीनंतर एप्रिल १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते भारतात कायमसाठी आले.
ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. भारत सरकारने १९६३ पासून त्यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. त्यांचा मृत्यू २२ जानेवारी १९६७ ला झाला. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांच्या पत्नीने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले. फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. त्यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.
(संदर्भ -खानखोजे यांच्या कार्याचा उल्लेख अनेक पुस्तकांतून आलेला आहे. ‘रणझुंजार डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ (ग. वि. केतकर), ‘कथा एका क्रांतिकारकाची’ (म. ना. काळे) ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. क्रांतिकार्यविषयक अनेक पुस्तकांतून त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आहे.
📚 *अलीकडील तीन पुस्तके आहेत.*
१. नाही चिरा- वीणा गवाणकर १९९७ राजहंस
२. आय शाॕल नॉट आस्क फॉर पार्डन – सावित्री साहनी २०११ (पेंग्विन)
३. क्रांती आणि हरित क्रांती- उपरोक्तचा मराठी अनुवाद.
🇮🇳 *जयहिंद*🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹💐
संकलित माहिती