संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये औरंगाबाद मधील पैठणजवळील आपेगाव या गावी झाला होता.
भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी (१८ अध्याय, ओवी ९ हजार) १२९० साली नेवासे सच्चिदानंद यांच्याकडून लिहून घेतली.
संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेत अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, अभंगाची गाथा इत्यादींची भर पडली.
इ. स. १२९६ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली.
‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
- श्रीस्वरूपानंद स्वामी
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर! ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले. लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले . कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखी वेद बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात.
आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.
वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.
ज्ञानेश्वरांची आरती
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥
कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,
नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥
प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,
रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ४ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा