डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर उर्फ ज्ञानकोशकार केतकर
(समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत. १९२१ ते १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. *पुस्तके :* भारतीय जातिसंस्थेचा इतिहास, महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण. *कादंबऱ्या :* आशावादी, गांवसासू, गोंडवनातील प्रियंवदा, परागंदा, ब्राह्मणकन्या, भटक्या, विचक्षणा.
ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. ९० वर्षांपूर्वी केतकर यांनी या कादंबरीलेखनाच्या माध्यमातून वेश्या संतती, विवाहबाह्य़ संबंध, अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विषय मांडले आहेत. त्यावेळी बंडखोर असलेले हे विचार आता समकालीन असेच आहेत. त्यामुळे या कादंबऱ्या आजचेच वास्तव मांडणाऱ्या ठरतात.
जन्म - २ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत
मृत्यु - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत
हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
सुरुवातीचे जीवन
त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
इ.स. १९२० साली त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरूणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर तिला शीलवती हे नाव मिळाले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कार्य
इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतिशब्द बनवला. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले.
असे म्हणतात की कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय ठेवली होती.
स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले.
ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते.
ते इ.स. १९३१ सालातल्या हैदराबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले.
ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’ अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव डॉ. केतकरांना त्यावेळी नसेल असे संभवत नाही. पण मराठी ज्ञानकोश निर्मितीच्या पराकोटीच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे पदरचे सारे पैसे टाकून कामाला सुरूवात केली. शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे. मुद्दा हा की ब्रिटीशांच्या काळात मराठी ज्ञानकोश निर्मितीसाठी त्यांनी केलेला त्याग हा अनन्यसाधारण आहे.”