नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज Tukaram Maharaj

🚩🚩जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
 

मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म : माघ शुद्ध ५, शके १५२८ (१ फेब्रुवारी १६०७)
देहू, महाराष्ट्र
निर्वाण : फाल्गुन कृ.२ , शके १५७१, ( ९ मार्च १६५०)
देहू, महाराष्ट्र
संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर
शिष्य : संत निळोबा, संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषा : मराठी
साहित्यरचना : तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)
कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू
व्यवसाय : वाणी
वडील : बोल्होबा अंबिले
आई : कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी : आवली
अपत्ये : महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

त्यांनी सुमारे ४५०० अभंग रचले.
भागवत धर्माचा तसेच वारकरी पंथाचा पाया जिथे ज्ञानेश्वरांनी रचला त्यावर कळस चढविण्याचे काम तुकारामांनी केले.
शिवाजी महाराज व संत रामदास हे तुकारामांचे समकालीन होते.अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरूष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगद्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’!
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणीपरब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।। 
⚜️ १. जन्म व पूर्वज
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे.

इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते, ते दैववान आहेत, वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम तुकोबांचे वेळचें हे देहू गावचे वर्णन आहे.
तुकोबांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभरबाबांच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आले. जसे पुंडलीकरायाच्या निकट सेवेनें देव वैकुंठाहून पंढरपूरला धांवत आले.

पुंडलिकांचे निकट सेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥

मूळ पुरुष विश्वंभर । विठ्ठलाचा भक्त थोर ॥१॥

त्याचे भक्तीने पंढरी । सांडूनी आले देहू हरी ॥२॥

आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमचे गावी आलो असल्याचे सांगून देव आंबीयाचे वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंबीयाचे वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. मूर्तीची स्थापना बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. देवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागला. महोत्सवाचे खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्र वृत्तीकडे वळले. कुटुंबियांना घेऊन राजाश्रयास गेले. तेथे त्यांना सैन्यामध्ये अधिकाराच्या जागा मिळाल्या. त्यांचे हे कृत्य त्यांच्या आई आमाबाई यांना आवडले नाही. देवालाही पसंत पडले नाही. देवांनी आमाबाईंना स्वप्नात येऊन सांगितले की, तुमच्याकरिता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून येथे राजाश्रयास आलात हे बरे नव्हे. तुम्ही देहूला परत चला. आमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केला व देहूस परत जाण्याबद्दल परोपरीने सांगितले. मुलांनीं त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पुढे लवकरच राज्यावर परचक्र आले. उभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले. मुकुंदाची पत्‍नी सती गेली, हरिची पत्‍नी गरोदर होती. तिला घेऊन आमाबाई देहूस आल्या. सुनेला माहेरी बाळंतपणाकरिता पाठविले आणि आपण देवाची सेवा करू लागल्या. हरिच्या पत्‍नीला मुलगा झाला त्याचे नाव विठ्ठल ठेवले. विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबा. बोल्होबा यांना पुत्र तीन. वडील सावजी, मधले तुकाराम आणि धाकटे कान्होबाराय.
तुकोबांचा ज्या कुळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते.

पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥

ते कूळ क्षत्रियाचे होते. पूर्वजांनी रणांगणावर शत्रूशी लढता लढता देह ठेवले होते. घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान् पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणत. आणि तुकोबांनी या सगळयांचीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणू लागले.
गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नव्हे. आडनाव मोरे- आणि गोसावी ही पदवी (इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी ) गीता काली वैश्याची गणना शूद्रांत होऊ लागली होती.

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यांति - परां गतिम् ॥ गीता ९.३२

श्रीज्ञानदेव तुकोबांच्या काळात क्षत्रियांचीही गणना शूद्रात होऊ लागली.

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ॥ ज्ञानेदेवी ९. ४६०.

दोनच वर्ण राहिले होते. ब्राह्मण आणि शूद्र म्हणून तुकोबांना शूद्र म्हणू लागले.

♻️ २. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक स्थिती

दक्षिणेत त्यावेळी मुसलमानी सत्तेचा अंमल होता. गोव्यात पोर्तुगीज होते. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या राज्य करणाऱ्या तीन मुसलमानी सत्ता एकमेकांशी लढत होत्या, गावे बेचिराख होत होती, लुटली जात होती, राजे विलासात दंग असत. ते प्रजेला पीडित. “ब्राह्मणांनी आपले आचार सोडले होते. क्षत्रिय वैश्यांना नाडीत होते, सक्तीने धर्मांतर चालू होते.” महाराजांनी म्हटले.

सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥

राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥

वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥

वैश्य आणि शूद्र यांच्या संबंधी तर बोलावयास नको. धर्माचा लोप झाला होता. अधर्म माजला होता.

ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।।
लोक अधर्मालाच धर्म म्हणूं लागले. संतांना मान राहिला नव्हता.

संतां नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥

समाज नाना देव-देवतांच्या मागें लागून विस्कळीत झाला होता. धर्मात आकर्षण राहिले नव्हते. अज्ञानाचा अंधकार पसरलेला होता. लोक प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या उदयाची वाट पाहात होते. अशा परिस्थितीत देहू गावी चित् सूर्यांचा उदय झाला.

संतगृह मेळी । जगत् अंध्या गिळी । पैल उदयाचळी । भानु तुका ॥३॥

(रामेश्वरभट्ट अभंग)

महान भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( इ.स. १६०९ )मध्ये तुकोबांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेल. प्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळाले. पंतोजी हातांत पाटी घेऊन मुलांचा हात धरून मुलांना शिकवीत.

अर्भकाचे साठी । पंते हाते धरिली पाटी ॥१॥

मुले खडे मांडून मुळाक्षरे काढीत.

ओनाम्याच्या काळे । खडे मांडियेले बाळे ॥१॥

व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावसावकारकी पाहाण्यास सांगितली. बाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेले. वयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला. तुकोबा लौकरच स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारकीत, व्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविला. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्नकार्ये झाली. तुकोबांची प्रथम पत्‍नी दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ. जिजाबाई उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतं. घरात धन-धान्य विपुल होते. प्रेमळ माता - पिता, सज्जन बंधू, आरोग्यसंपन्न शरीर होतं. कोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.

माता पिता बंधू सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।
शरिरी आरोग्य लोकांत मान । एकहि उणे असेना ॥१॥
(महिपतीबाबा चरित्र)

हे सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे दिवस केव्हा गेले, कसे गेले हे थोड-सुध्दा समजले नाही. या नंतर सुखापुढे येतसे दुःख। या भविष्याला सुरुवात झाली.

☯️ ३. प्रेमळ मातापित्यांचा वियोग

वयाच्या सतराव्या वर्षी कर्तबगार प्रेमळ पिताश्री बोल्होबा मृत्यू पावले. ज्यांनी तुकोबांना मिराशीचे धनी केले.

बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवोनी ॥१॥

एकाएकीं केला मिराशीचा धनी । कडीये वाहुनि भार खांदी ॥२॥

मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा.ज्यांच्यामुळे संसारतापाची झळ लागत नव्हती, तेच छत्र हारपले.

बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥

(न कळता म्हणजे एकाकी माझे पश्चात) तुकोबांना असह्य दुःख झाल. हे दुःख कोठे ओसरते न ओसरते तोच पुढील वर्षी प्रेमळ माता कनकाई तुकोबांच्या देखत मृत्यु पावल्या.

माता मेली मज देखता ॥४॥

तुकोबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मातेने तुकोबांकरिता काय केल नाही सर्व काही केल.

काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ती ॥१॥

काय नाही त्याची करीते सेवा । काय नाही जीवा गोमटेते ॥२॥

अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी धरी कंठी ॥३॥

यापुढे वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्‍नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्‍नीचा मृत्यू. ते घरदार सोडून तीर्थयात्रेला जे गेले ते गेलेच. कुटुंबातील चार माणसांचा वियोग झाला. ज्या संसारात एकही उणे नव्हते त्यात आता एक एक उण होऊ लागल. तुकोबांनी धीर खचू दिला नाही. औदासीन्य आवरून विसावे वर्षी प्रपंच नेटका करण्याची हाव धरली. पण हाय ! एकविसाव्यात विपरीत काळ आला. दक्षिणेत मोठा दुष्काळ पडला. महाभयंकर दुष्काळ होता तो. इ. स. १६२९ त (शके १५५०-५१) पाऊस उशिरा पडला. शेवटी अती वृष्टीने पिके गेली. लोकांना अजून आशा होती. इ.स. १६३० मध्ये पाऊस अजिबात पडला नाही. सर्वत्र हाहाकार उडाला. धान्याचे भाव कडाडले. चाऱ्याच्या अभावी शेकडो गुरे मेली. अन्नावाचून शेकडो माणसे मेली. सधन कुटुंबे धुळीस मिळाली. अजून दुर्दशा संपली नव्हती. इ.स. १६३१ मध्ये त्या दैवी आपत्तीचा कडेलोट झाला. अती वृष्टीमुळे पिके गेली. महापुराने भयंकर नासाडी झाली. हा दुष्काळ ही दैवी आपत्ती तीन वर्षे टिकली. दुष्काळाच्या ह्या चढत्या दुर्दशेसंबंधी महीपतीबाबा लिहितात -

ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण ।

पर्जन्य निःशेष गेला तेणे । चाऱ्यावीण बैल मेले ॥१॥

पुढे दुष्काळाच स्वरुप भयंकरच वाढले.

महाकाळ पडीला पूर्ण । जाहाली धारण शेराची ।

ते ही न मिळे कोणा प्रती । प्राणी मृत्यूसदनी जाती ॥१॥

पायलीभर रत्‍नास पायलीभर उडद मिळेनात.

दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।

या दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहात झाली. गुरे ढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकातील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने बळी घेतला. सावकार आणि व्यापारी यांना दुष्काळी परिस्थिती म्हणजे सुवर्णसंधी. कृत्रीम दुष्काळ टंचाई निर्माण करून शेकडो रुपयांचा फायदा उठविणारे महाभाग आपण हल्ली पाहातोच की, लोकांच्याकडील येण दुष्काळी परिस्थितीत वसूल करणारे तुकोबा कठोर हृदयाचे नव्हते. उलट आपली दुर्दशा आपत्ती दुःख विसरून, बाजूला ठेवून - दुष्काळात गांजलेल्या पीडलेल्या लोकांना तुकोबांनीं सढळ हाताने मदत केली.

सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।

त्याग केला नाही । दिलें द्विजां याचकां ॥३॥

काही द्रव्य सहज सरून गेल होत आणि थोडबहुत जे राहिल होत ते ब्राह्मणांना, भिकाऱ्यांना, गरजूंना सढळ हाताने दिलं. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)

संसाराच्या नावे घालोनिया शून्य । वाढता हा पुण्यधर्म केला ॥९॥

मायबाप, पुत्र कलत्रादि कौटुंबिकाचे मृत्यु, दुष्काळाने प्रपंचाची झालेली वाताहात, जनामधील दुर्दशा, सखे-सोयरे यांनी केलेली निंदानालस्ती, या सर्व आपत्तींना तुकोबांनी धैर्याने तोंड दिले. ते दुर्दशेला आपत्तीला सन्मुख झाले. पळून गेले नाहीत. ते पलायनवादी नव्हते. त्यांना संसार जिंकावयाचा होता. या रणांगणावर माघार घ्यावयाची नव्हती. या असारातून सार काढावयाचे होते. दुष्काळामुळे, दैवी आपत्तीमुळे, मानवी देह, देहसंबंधी - माता,पिता, पुत्र आणि संपत्ति यांचे मूल्यमापन झाले होते. अशाश्वता पटली होती. ते शाश्वत मूल्याचा शोध करूं लागले. आपण या उद्वेगातून पार कसे पडू? पैलतीर कसे गाठू. याचा विचार करू लागले.

⚛️ ४. साक्षात्कार

विचारले आधी आपुले मानसी । वाचो येथे कैसी कोण्यापरी ॥१॥

ते सत्याच्या शोधार्थ निघाले, त्या निश्चयाने ते भामनाथांच्या पर्वतावर गेले. चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला तरच परत फिरायच नाहीतर नाही. त्यांनी निर्वाण मांडले. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली । वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ॥१॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले । पिडू जे लागले सकळीक ॥२॥
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला । विठोबा भेटला निराकार ॥३॥

निराकार परमात्मा भेटला. देवाने भक्ताला ‘चिरंजीव भव’ आशिर्वाद दिला. दिलासा दिला.

तंव साह्य झाला हृदय निवासीं । बुध्दि दिली ऐशी नाश नाही ॥२॥

तुकोबांनी घर सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ देहू गावचे परिसरातील डोंगर, दऱ्या-खोऱ्या, जंगले धुंडाळत होते. शोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले. काय दृश्य त्यांना दिसल ? तुकोबांच्या अंगावर मुंगळे, सर्प, विंचू चढलेले आहेत, वाघांनी झेप घेतलेली आहे. परमात्मा प्रगट झालेला आहे, सोनियाचा दिवस तो. कान्होबांच्या नेत्रांचे पारणे फिटले. जन्माचे सार्थक झाले. उभयता बंधूंची भेट झाली. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्या पवित्र भूमीला वंदन करून उभयता बंधू तेथून निघून सरळ इंद्रायणीच्या संगमावर आले. संगमात स्नान करून पंधरा दिवसाच्या उपवासाचे पारणे सोडले. तुकोबांनी कान्होबांकडून खते पत्रे आणून घेतली. यांचे लोकांकडे जे येणे होते त्या त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होती. त्याच्या वाटण्या केल्या. निम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाटयाची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. या धनकोने ऋणकोकडून येण असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेण वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना कर्जमुक्त केले आणि आपण सावकारकीकडे पाठ फिरवून विन्मुख झाल्याचे जगाला दाखवून दिल. याला म्हणतात सच्चा समाजवाद.

देवाचे देऊळ होते जे भंगले । चित्ती ते आले करावे ते ॥१॥

जसे खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून सावकारशाहीला विन्मुख झाल्याचे विलक्षण रीत्या दाखवून दिले तसेच दुष्काळानंतर भंगलेला संसार न सांधता, देवाच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोध्दार करून देवाला - परमार्थाला सन्मुख झाल्याचे तुकोबांनी जग जाहीर केले. पिताश्री बोल्होबांच्या कारकिर्दीत वाढत्या यात्रेला देवघर अपुरे पडू लागले म्हणून इंद्रायणीच्या रम्य तीरावर बोल्होबांनी देवाचे देवालय बांधले व राहत्या वाडयाच्या देवघरातील मूर्तीची स्थापना या नव्या देवालयात केली. तुकोबांच्या वेळी देऊळ भंगले होते. म्हणून दुष्काळानंतर सर्वप्रथम तुकोबांनी देवालयाचा जीर्णोध्दार केला.

श्रीमूर्तींचे होते देवालय भंगले । पाहाता स्फुरले चित्ती ऐसे ॥१॥
म्हणे हे देवालय करावयाचे आता । करावया कथा जागरण ॥२॥

देवालयाचा जीर्णोध्दार केला तो देऊळ बांधण्याने होणाऱ्या पुण्यप्राप्‍तीरिता नव्हे तर भजन, कीर्तन, कथा, जागरण करण्याकरिता. हरीजागरण, श्रवण, कीर्तन, मनन, सहज साक्षात्कार आणि मग पांडुरंग कृपा - देवालयाने या अशक्य गोष्टीची सहज साध्यता-प्राप्‍ती झाली.

काही पाठ केली संतांची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥१॥
कीर्तन करण्यास उभे राहण्याकरिता देवालय बांधले. आणि कीर्तन करण्यास लागणाऱ्या पाठ-पाठांतराकरिता तुकोबा रोज भंडारा डोंगरावर एकांतात जाऊन अभ्यास करूं लागले. प्रातःकाळी स्नान करून कूळ दैवत श्रीविठ्ठल-रखुमाई यांची स्वहस्ते पूजा अर्चा करावयाची व भंडारा डोंगर गाठावयाचा.

कीर्तन संपूर्ण यावयासी हाता । अभ्यास करिता झाला तुका ॥५॥
अभ्यास तुकया करीतसे ऐसा । सरितासी जैसा पात्र सिंधु ॥६॥
तैसे जे ऐके ते राहे अंतरी । ग्रंथ याहीवरी वाचीयेले ॥७॥

ज्ञानदेव महाराजांची - ज्ञानदेवी, अमृतानुभव, एकनाथ महाराजांची भागवतावरील टीका, भावार्थ रामायण, स्वात्मानुभव, नामदेवरायांचे अभंग, कबीरांची पदे यांचे तुकोबांनी परीशीलन केले. ज्ञानदेव महाराज, नाथ महाराज, नामदेवराय आणि कबीर या थोर भक्तिमार्गीय संतांची काही वचने त्यांनी पाठ केली.

करू तैसे पाठांतर । करुणाकार भाषण ॥१॥
जिही केला मूर्तिमंत । ऐसा संतप्रसाद ॥२॥

निर्गुण निराकार परमात्म्याला ज्यांनी सगुण साकार केला. अमूर्ताला ज्यांनी मूर्तिमंत केला असा हा संत प्रसाद सेवन केला. तुकोबांनी पुराणे पाहिली, शास्त्राचा धांडोळा घेतला.

पाहिलीं पुराणे । धांडोळिली दरूषणे ॥१॥

पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥

तुकोबांना हा एकांतवास फार आवडत असे. या एकांतात त्यांना सखेसोयरे भेटले होते. अर्थात्‍ ते एकांतांतील सख्यासोयऱ्यांपेक्षा निराळे होते. कोण होते ते ? वृक्ष होते, वेली होत्या ! वनचरे होती. पक्षीराज मधुर, मंजुळ सुरात कुजन करीत होते. देवाला आवळीत होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥

येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥

आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥

येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥

तुकोबांच्या पत्‍नी सौ. जिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.

✡️ ५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥

सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥

माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥

प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥

द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥

आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥

सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥

नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥

तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होता. परमात्म्याचा संदेश, निरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.

तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥

तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.

यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥

आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागली. सभाग्यश्रोते श्रवण करू लागले.

बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥

भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥

तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित, महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्रीज्ञानदेव महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता, ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली. त्यांना धक्काच बसला. ही गीताची किं मूर्तीमंत, किं नेणो श्रीमत् भागवत ॥ - ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !

तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।

म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥

तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥

रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले - “तुम्ही शूद्र आहात? तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही. तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे. तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला.” तुकोबा म्हणाले, “ही माझी वाणी नव्हे, ही देववाणी आहे.”

करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥

नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥

नव्हती माझे बोल, बोले पांडुरंग । असे अंग संग व्यापुनिया ॥२॥

नामदेवराय आणि पंढरीराय स्वप्नात येऊन त्यांनी कवित्व करावयाची आज्ञा केली.

विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।

यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥

तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।

तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥

तुमचे कवित्व बुडवून टाका. देववाणी असेल तर देव तीच पाण्यात रक्षील. गावच्या पाटलाला रामेश्वरशास्त्रींनी तुकोबाच्या या अधर्माबद्दल कळविले. गावचा पाटील रागावला. लोक खवळले.

काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥

कोपला पाटील गावचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥

तुकोबांनी अभंगाच्या सर्व वह्या घेतल्या. दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडविल्या. पूर्वी खत-पत्रे प्रपंच बुडविला, आता अभंगाच्या वह्या-परमार्थ बुडविला.

बुडविल्या वह्या बैसिलो धरणे ॥

तुकोबांना असह्य दुःख झाल. लोक निंदा करू लागले. कसला दृष्टांत आणि कसला प्रसाद ! सगळ थोतांड. कसला देव आणि कसला धर्म ! तुकोबा महाद्वारात असलेल्या शिळेवर देवासमोर धरणे धरून बसले. प्राण पणाला लावला. निर्वाण मांडले. तेरा दिवस झाले. देव काही पावेना.

तेरा दिवस झाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥

तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा॥

तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुज वरी ॥

इकडे रामेश्वरशास्त्री तुकोबांचा निषेध करून आळंदीहून निघाले ते नागझरीच्या उगमाजवळील पंचवटापाशी आले. ते तेथे असलेल्या सरोवरात स्नानाकरिता उतरले. स्नान करीत असता त्या सरोवरातील पाणी नेण्याकरिता अनगड सिध्द फकीर आला. “आपण कोण ? कोठून आलात ?” म्हणून त्याने विचारले असता त्याला पाहाताच शास्त्रीबुवांनी कानात बोटे घालून बुडी मारली- (यावनी भाषा ऐकावयाची नाही म्हणून) या कृत्याने अनगड सिध्दास राग आला व त्यांनी शाप दिला. रामेश्वरशास्त्री पाण्यातून बाहेर निघताच त्यांच्या अंगाचा दाह होऊं लागला. अंगाला ओले कपडे गुंडाळून फकिराच्या शापातून मुक्‍त होण्याकरिता शिष्या समवेत शास्त्री आळंदीला परतले व अजान वृक्षाखाली अनुष्ठान करीत बसले.

तो इकडे देहूस तेरावे रात्री भगवंताने सगुण बाळवेष धारण करून तुकोबांना भेटले. आणि सांगितले की, “आपल्या वह्यांचे मी पाण्यांत अठरा दिवस अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहे. त्या उद्या पाण्यावरती येतील.” याप्रमाणे देहू गावच्या भाविक भक्‍तानांही दृष्टांत झाले. दृष्टांताप्रमाणे ही सर्व भक्तमंडळी इंद्रायणीच्या डोहावर गेली. तो काय सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्या. पोहोणारांनी उडया टाकून त्या ऐल तीरावर आणल्या. त्यांना पाण्याचा यत्किंचितही स्पर्श झाला नव्हता. सर्वांनी जयजयकार केला. देवाला आपण त्रास दिल्याबद्दल तुकोबांना फार खेद वाटला.

थोर अन्याय मी केला । तुझा अंत म्यां पाहिला ॥

जनाचिया बोलासाठी । चित्त क्षोभविले ॥१॥

उदकी राखीले कागद । चुकविला जनवाद ।

तुका म्हणे ब्रीद । साचे केलें आपुलें ॥

तिकडे आळंदीला रामेश्वरशास्त्रींना ज्ञानदेव महाराजांनी सांगितले की, “आपण तुकोबांची निंदानालस्ती केली त्याचे हे फळ आहे. तरी यावर आता एकच इलाज आपण तुकोबांकडे देहूला जा.” रामेश्वरशास्त्री देहूला निघाले, हे तुकोबांना समजले. तुकोबांनी आपल्या शिष्याजवळ शास्त्रीबुवाकरिता एक अभंग देऊन त्यास आळंदीला पाठविले तो अभंग रामेश्वरभटजींनी वाचताच त्यांचा दाह शांत झाला.

चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥

दुःख तें देईल सर्व सुखफळ । होतील शितळ अग्निज्वाळा ॥

रामेश्वर भटजी यासंबंधी आपला अनुभव सांगतात.

काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा हे शरीरी बहू झाली ॥

म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझे ॥

रामेश्वर भट तुकोबांच्या दर्शनास देहूस आले आणि कथा कीर्तने ऐकण्याकरिता देहूलाच राहिले. रामेश्वर भटांना शापमुक्त केल्याचे वर्तमान अनगडशाहाला कळले, त्याला विषाद वाटला. तो तुकोबांचा छळ करण्याकरिता देहूस आला. तुकोबांचे घरी गेला. कटोराभर भिक्षा मागितली. तुकोबांच्या कन्या हिने चिमूटभर पीठ कटोऱ्यात टाकताच तो पूर्ण भरून पीठ खाली सांडले. सिध्दाचे सामर्थ्य तुकोबांचे द्वारी लयाला गेले. अनगडशहा भक्‍तिभावाने तुकोबांना भेटले व तुकोबांचे जवळ भजन कीर्तन ऐकण्याकरिता राहिले. दार्शनिक ज्ञान, पांडित्य ऋद्धी व सिद्धी , हरिभक्तीला शरण आल्या. असो. वह्या तरल्याचे शुभवर्तमान देशोदेशी पसरले; वह्या तरल्याने लोकापवाद टळला. अभंगवाणी अविनाशी ठरली; परमात्म्याचे सगुण दर्शन झाले तुकोबांच्या कथा कीर्तनाचा मार्ग मोकळा झाला.

⚜️ ६. तुकोबा आणि दोन संन्याशी

अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥१॥

तुकोबांची कीर्तने नव्या जोमाने व उत्साहाने सुरू झाली. तुकोबांचे लोकाध्दाराचे व जनता जागृतीचे साधन भजन कीर्तन.

तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥४॥

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेचा पण प्रेमसुख लुटले, गोकुळच्या लोकांनी तुकोबांचा जन्म देहूचा पण भक्‍तीप्रेम सुख लुटले लोहगावच्या लोकांनी. लोहगाव तुकोबांचे आजोळ. तुकोबांची कीर्तने नेहमी लोहगावला होत असावियीची. एकदा दोन संन्याशी तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसले. त्यांना काय दिसले- स्त्री- पुरुष, कथा- कीर्तन मोठया तल्लीनतेने ऐकत आहेत. लहान-थोर, ब्राह्मण, शूद्र एकमेकांच्या पाया पडत आहेत. भेदभाव नाहीसा झालेला आहे. हे दृश्य पाहून त्यांनी तुकोबांची निंदा करून ब्राह्मणाची निर्भत्सना केली. तुम्ही कर्म भ्रष्ट झालात. कर्ममार्ग सोडून रामराम करत बसलात. ते तेथून निघाले. काखेतील मृगाजीन सावरत सावरत दाद मागण्याकरिता दादोजी कोंडदेवाकडे गेले.

काखे कडासन आड पडे । खडबड खडबड हुसकले ॥१॥

दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥३॥

दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

त्यांनी फिर्याद दिली की - “लोहगावच्या ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म सोडून दिले आहे ते शूद्राचे चरणी लागले आहेत. आणि राम राम म्हणत आहेत. अधर्म माजलेला आहे. तरी आपण याचे परिपत्य केले पाहिजे.” दादोजींनी आपले सैनिक पाठवून ब्राह्मणांना १०० रुपये दंड केला. तुकोबांना आणि लोहगावच्या लोकांना यावयास सांगितले. तुकोबा लोहगावच्या लोकांसह पुण्यास संगमावर आले व कीर्तन आरंभिले. तुकोबा आल्याचे समजतांच संपूर्ण पुण्य नगरी तुकोबांचे दर्शनास व कीर्तनास लोटली. दादोजीही निघाले. दादोजी, तुकोबांचे कीर्तन ऐकत बसले. संन्याशीही बसले होते. त्यांना तुकोबा परमात्मा स्वरूप दिसू लागले. त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, त्यांनी तुकोबांच्या चरणावर लोटांगण घातल. दादोजींने त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला की, “ब्राह्मण शूद्राच्या पाया पडतात, अधर्म होतो अशी फिर्याद आपण देता आणि आपण पाया पडता हे काय?” ते म्हणाले, “आम्हाला कीर्तनात तुकोबांमध्ये नारायण दिसले. ” स्वतः दादोजीने तुकोबांचा सत्कार केला आणि संन्याशांची फटफजिती करून त्यांना शहराबाहेर हाकलून दिले.

☸️ ७. धरणेकरी

बीड परगण्याचा देशपांडे उतारवयांत त्याला वाटू लागले की, आपण पंडित व्हावे. या वयात पाठपाठांतर अभ्यास करून पंडित होण अशक्य म्हणून तो आळंदीला ज्ञानदेव महाराजांच्या जवळ धरणे धरून बसला. ज्ञानदेव महाराजांनी त्याला सांगितले, “बाबा, तू देहूला तुकोबांकडे जा. कोर्ट सध्या तेथे आहे.” त्याप्रमाणे तो देहूस आला. ते समयी तुकोबांनी एकतीस अभंग केले. देवाचा धांवा अभंग सात आणि उपदेश अभंग अकरा तुकोबांचा बोध, विचारसरणी, उपदेशाची पध्दत आणि तत्त्वज्ञान यांतून अभंगाच्या गटात साकल्याने पाहावयास मिळते. तुकोबांनी प्रथम देवाकडे धाव घेतली. देवा तुम्हाला न सांगताहि अंतरातलं गुप्त कळू शकत. तेव्हा अभयदान देऊन आळीकराचे समाधान करा आणि आपली लाज आपण राखा.

न सांगता कळे अंतरीचे गुज । आता तुझी लाज तुज देवा ॥१॥

आळीकर त्यांचे करी समाधान । अभयाचे दान देऊनी ॥२॥

धरणेकऱ्यास उपदेश

पोथ्या, पुस्तक आणि ग्रंथ पाहण्याच्या भानगडीत आता पडू नको. ताबडतोब तू आता हेच एक कर. देवाकरिता देवाला आळव. म्हातारपण आलेले आहे तेव्हा आता उशीर किती करावयाचा ?

देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभाव पाडोनियां ॥१॥

तू मनाला गोविंदाचा छंद लाव मग तूच गोविंद होशील.

गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥

मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥१॥

सुखाने अन्न खा आणि परमात्म्याचे चिंतन कर. हरीकथा ही माउली आहे. आणि सुखाची समाधि आहे. शिणलेल्याची साऊली, विश्रांति स्थान आहे.

सुखाची समाधि हरीकथा माऊली । विश्रांति साऊली शिणलियांची ॥१॥

इतरांनी उपास करावा. विठ्ठलाचे दासाने चिंता झुगारून द्यावी- आमच्या अंगात सगळे बळ आले आहे. तुकोबांनी हा बहुमोल उपदेश त्या धरणेकऱ्यास केला - त्याने मूर्खपणाने काय केल-

देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करोनि गेला ॥

🚩 ८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा

तुकोबांची कीर्ती शिवाजी राजे यांच्या कानावर गेली. त्यांनी तुकोबांना दिवटया, छत्री घोडे आणि जडजवाहीर सेवकाबरोबर पाठवून दिले. तुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोबत चार अभंगांचे पत्र देऊन तो नजराणा शिवाजी राजांकडे परत पाठविला. ते देवास म्हणाले,

नावडे जे चित्ता । ते तू होशी पुरविता ॥१॥

दिवटया, छत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत (किंवा ह्यांच्यांत मी पडणारा नव्हे) देवा तूं मला यात कशाला गुंतवतोस? तुकोबांच्या ह्या निरपेक्षतेच शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटलं व ते स्वतः तुकोबांचे भेटीला वस्त्रे, भूषणे, अलंकार, मोहरा घेऊन सेवकांसह लोहगावला आले, ते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले -

काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥३॥

मुंगी आणि राव आम्हाला दोन्ही सारखेच आहे. त्याचप्रमाणे सोने आणि माती ही आम्हाला समानच वाटते.

मुंगी आणि राव । आम्हा समानचि जीव ॥१॥
सोने आणी माती । आम्हा समानचि चित्ती ॥२॥

आम्ही या गोष्टीने सुखी होणार नाहीत तर आपण देवाचे नाव घ्या. श्रीहरीचे सेवक म्हणवा.

आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥२॥

तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागले, तेव्हा तुकोबांनी त्यांना आणि त्यांच्या सेवकांना क्षात्र धर्म सांगीतला :

आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥

भांडण पडले असता सेवकांनी स्वामीच्या पुढे व्हावे ।

स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण ॥

गोळया, बाण यांचा वर्षाव होत असतां सैनिकांनी तो सहन करावा. आपले संरक्षण करून शत्रूला फसवावे. आणि त्याचे सगळे हिरून घ्यावे. शत्रूला आपला माग लागूं देऊ नये. आपण स्वामीकरिता जीवावर उदार असावे, असे ज्याचे सैनिक- सेवक आहेत तोच त्रैलोक्यांतील सामर्थ्यवान राजा होय.

तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.

🌀 ९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥

ज्ञानमार्गात गुरुची महती विशेष भक्‍तिमार्गात तितकी नाही.

मेघवृष्टीने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य ॥

या विचारसरणीचे तुकोबा. अद्वैत शास्त्राची तुकोबांना मुळीच आवड नसे.

अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥१॥

तुकोबांचे सगुणावर प्रेम विशेष. यामुळे महाराज श्रीगुरूस शरण गेले नाहीत.

अद्वैतशास्त्र नावडे यासी । यास्तव शरण न जाय सद्‍गुरुशी ॥

पुढे वाट पडेल ऐसी । गुरु भक्तीशी अवरोध ॥

एक श्रेष्ठ आचरला जैसे । जन पाहोनि वर्तती तैसे ॥

तरी आपण धरूनि विप्रवेश । द्यावा तुकयासी अनुग्रह ॥

स्वप्नामध्ये तुकोबा इंद्रायणीचे स्नान करून देवळात जात असता त्यांनी रस्त्यात एक ब्राह्यण पाहिला व त्याला नमस्कार केला. ब्राह्मणाने संतुष्ट होऊन तुकोबांच्या मस्तकावर हात ठेवला व ‘रामकृष्ण हरि’ मंत्र दिला. आपली परंपरा सांगितली. माघ शुध्द दशमीस गुरूवारी ही घटना घडली.

सापडविले वाटे जात गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥

राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालिकेची ॥४॥

बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरि ॥५॥

माघ शुध्द दशमी पाहोनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥

तुकोबांनी स्वतः कोणापाशी मंत्राची याचना केली नाही. ते म्हणतात

नाही म्या वंचिला मत्र कोणापाशी । राहिलो जिवाशी धरोनिया ॥१॥

तुकोबा म्हणतात, मला कान फुंकण्याचे माहीत नाही व मजजवळ एकांतीचे ज्ञान नाही. पण जो देव कोणी डोळयांनी पाहिला नाही तो आम्ही दाखवू.

नेणो फुंको कान । नाही एकांतीचे ज्ञान ॥२॥

नाही देखिला तो डोळा । देव दाखवू ते कळा ॥३॥

प्रपंचामध्ये प्रभूचे अधिष्ठान असल्याखेरीज देव आपलासा केल्याखेरीज जीवांना सुख होणार नाही.

आपुला तो एक देव करोनी घ्यावा । तेणे विन जीवा सुख नोहे ॥२॥

तुम्ही माझा अनुभव पाहा

माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥

बोलवले तेची द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥२॥

हा अनुभव कशाचा म्हणाल तर-

हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥

ऋणी केला नारायण । नोहे क्षण वेगळा ॥२॥

दैवाच्या लीलेने तुकोबांचा संसार रसातळाला नेला.देवाच्या लीलेने तुकोबांनी गौरीशंकर गाठल. दैव अनिर्बंध आहे त्याला कशाचेही बंधन नाही. देवाला बंधन आहे कशाच ? तर प्रेमाच.

प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥

ते प्रभू प्रेम स्मरणाने मिळते.

आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥

संताच्या गावीही प्रेमाचा सुकाळ असतो.

संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःख लेश ॥१॥

संताच्या व्यापारात, उपदेशाच्या पेठेत प्रेमसुखाची देवाण- घेवाण चाललेली असते.

संतांचा व्यापार उपदेशाची पेठ । प्रेमसुखासाठी देती घेती ॥

येऱ्हवी हे भक्‍ती प्रेमसुख काय आहे, हे पंडितांना, ज्ञानियांना, मुक्‍तांना माहितही नाही आणि कळत नाही.

भक्ति प्रेम सुख नेणवे आणिका । पंडिता वाचका ज्ञानियासी ॥

या प्रेमाने समाज सांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेद-आपपरभाव नाहीसे होतात. प्रेमानें जीवन सुखी समृध्द होतें. असें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेल. संताचे सान्निध्यात मिळेल.प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल.

उपदेश

उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धरावा ॥

आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥

मोलाचे आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥

गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥

कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरीख वाटे देवा ॥

गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥

हित ते करावे देवाचे चिंतन । करोनियां मन शुध्द भावे ॥

तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥

संतसंग

संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥

पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदासे विचारे वेच करी ॥

तुकोबांची शिकवण सुविचाराची, सदाचाराची आणि समतेची होती. प्राणिमात्राचे कल्याण होण्याकरिता ते कोणाची भीडभाड ठेवीत नसत.

नाही भिडभाड । तुका म्हणे सानाथोर ॥

तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥

तुका म्हणे लासू फासू देऊ डाव । सुखाचा उपाय पुढे आहे ॥

👬🏻 १०. तुकोबांचे ध्रृपदे, टाळकरी, अनुयायी व शिष्य

तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते म्हणून महीपतीबाबाने त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.

१. महादजीपंत कुलकर्णी देहू गावचे कुलकर्णी - याचा उल्लेख बहिणाबाईचे गाथेतही आलेला आहे - देवालयाच्या बांधकामावर यांची देखरेख होती.
२. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव), अभंग लेखक, हे तुकोबांचे सेवेस लागल्याचा कागदोपत्री उल्लेख आहे.
३. संताजी जगनाडे - (चाकणकर) - तुकोबाचे अभंग लेखक.
४. तुकया बंधू कान्होबा.
५. मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.
६. कोंडोपंत लोहकरे - लोहगाव.
७. गवार शेट वाणी - सुदुंबरे.
८. मल्हारपंत कुलकर्णी - चिखली.
९. आबाजीपंत लोहगावकर.
१०.रामेश्वरभट्ट बहुळकर.
११.कोंडपाटील, लोहगाव.
१२.नावजी माळी - लोहगाव.
१३.शिवबा कासार - लोहगाव.
१४.सोनबा ठाकूर - कीर्तनांत मृदंग वाजवीत असत.

तुकोबांची शिष्या बहिणाबाई यांना तुकोबांचा स्वप्नात उपदेश झाला. त्या देहूस दर्शनाकरिता आल्या, कवित्वस्फूर्ती बाईंना देहूस झाली. बहिणाबाईंनी तुकोबाची कथा कीर्तने प्रत्यक्षांत ऐकली. मंबाजीकडून यांना बराच त्रास पोहोचला. बहिणाबाईंची योग्यता अधिकार तुकोबांचे खालोखाल होता. बहिणाबाईंची अभंगाची गाथा एकदा तरी वाचून पाहावीच.

🕯️ ११. प्रयाण

कार्तिक वद्य एकादशीला आळंदीस ज्ञानदेव महाराजांचे पुढे तुकोबाचे कीर्तन चालले होते. यात्रा अपार होती. कीर्तनाचा अभंग होता.

भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनू ॥१॥

शरीर कोठे ब्रह्म होईल काय? कोणी केले आहे काय? असे आत्मानात्म विचारकर्ते, ज्ञानी जे श्रोते होते त्यांनी तुकोबाला विचारले. तुकोबा म्हणाले, ‘मी करून दाखवीन.’

घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥

ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥

लोहगावला तुकोबांचे कीर्तन चालू असताना परचक्र येऊन लोहगाव लुटले. तुकोबांनी देवाचा धावा केला.

न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥

देव ताबडतोब पावले नाहीत. तुकोबांनी देवाला सांगितले.

तुज भक्ताची आण देवा । जरी तुका येथे ठेवा ॥१॥

तिसरी गोष्ट - ज्ञानदेव महाराजांनी तुकोबांची अपार सेवा केली त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता ज्ञानदेव महाराज जिजाईचे पोटी आले. तुकोबाने ओळखले की, देव सेवा करू पाहातात हे बरें नव्हे आपणच येऊन जावे सर्वाची विचारपूस केली, सर्वाना सांगितले, ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत. तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ कोणी तयार झाले नाही. महाराज सर्वासमवेत इंद्रायणीच्या काठी आले तेथे नांदुरुखीचे वृक्षाखाली कीर्तनास आरंभ केला. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले तुकोबांचे चिरंजीव महादेव विठोबा पुढे आले त्यांनी तुकोबांना नमस्कार केला. तुकोबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. जिजाबाईकडे कौतुकाने पाहिले. सगळयांना सांगितले-

सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥

वाढवेळ झाला उभा पांडुरंगा । वैकुंठा श्रीरंग बोलावतो ॥

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥

अंतःकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥२॥

भगवत्‌कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. याचा उल्लेख राज्याभिषेक शके ३० च्या सनदेत आहे. श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली , जि. पुणे येथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते. इ.स.१७०४ च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.

शके पंधराशे एकाहत्तरी । विरोधी नाम संवत्सरी ।
फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी । प्रथम प्रहरि प्रयाण केले ॥२॥

“तुकोबा गोसावी वैकुंठास गेले. स्वदेहीनिशी गेले. ” बाळोजी तेली जगनाडे वही, पृ. २१६, संताजींच्या वहीची नक्कल. संताजी प्रयाण समयी प्रत्यक्ष हजर होते.

तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. सर्वानी स्नाने उरकली. तुकोबांची मुले, बंधू कान्होबा देवाशी भांडले. ‘देवा तू माझ्या बंधूला आणून दे. वैकुंठाला नेऊ नकोस.’ देवाने कान्होबाचे समाधान केले.

⛲ १२. तुकोबांच्या पश्चात्‌

तुकोबा देहासह वैकुंठास गेल्याचे वर्तमान ऐकून शिवाजीराजे विस्मय पावले. तेव्हा त्यांनी देहू येथील जानोजी भोसले याच्याजवळ तुकोबांच्या कुटुंबियांची विचारपूस केली व तुकोबांचे वडील पुत्र महादेवबुवा यांना भेटी घेऊन येण्याविषयीची आज्ञा केली. जानोजी भोसले महादेव बाबास घेऊन शिवाजी राजे यांचेकडे गेले. शिवाजी राजे यांनी महादेवबाबास वर्षासन “एक खंडी धान्य व लुगडयाकरितां एक होनाची सनद करून दिली.” संभाजी राजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.

तुकोबांचे वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला. नारायण महाराज ज्ञानदेव महाराजांचे अवतार असल्यामुळे दोघे वडील बंधू महादेवबुवा विठोबा नारायणरावांच्या आज्ञेत असत. मातोश्री असेपर्यत एकत्र होते. मातोश्रीचा काल जाहल्यावर विठ्ठलबुवा, नारायणबुवा, जिजाबाईंच्या अस्थी घेऊन महायात्रेला गेले. महादेवबुवा श्री विठ्ठलदेवाची पूजाअर्चा नित्य नियम सांभाळून होते. महादेवबाबांनी तुकोबांचे अभंग लिहिले आहेत. नारायणबाबा प्रथम सरंजामी - सरदारी थाटाने राहू लागले. त्यांचे भेटीस संताजी पवार आले. त्यांनीं नारायणबाबास धिःकारले. बाबांनी घर ब्राह्मणाकडून लुटविले. तपश्चर्या केली. अरण्यवास पत्करला. विठोबाचें भव्य देऊळ बांधलें.

तुकाराम तो आधीच गेले होते वैकुंठा ।बहु दिवसांनी मग वैराग्य झालें नीळकंठा ॥१॥
तुकयाचा नंदन मागे नारायणबाबा ।दर्शन त्याचे घेऊनि म्हणती सुसंग लाभावा ॥२॥

निळोबा गोसावी पिंपळनेरकर बाबांच्या दर्शनास आले. बाबांनी त्यांना साद्यंत तुकोबांचे चरित्र सांगितलें निळोबांना घेऊन ते तीर्थयात्रेला गेले. निळोबांनी तुकोबांचे भेटीकरिता ४२ दिवसाचे निर्वाण मांडले. तुकोबा भेटले.

येऊनियां कृपावंते । तुकया स्वामी सदगुरूनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकीं । देऊनी प्रसाद केले सुखी ॥२॥

निळोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांनीही अनेक अभंग केलेत. नारायणबाबा थोर तपस्वी हरिभक्त म्हणून सनदा पत्रात उल्लेख आढळतो. बाबांच्या दर्शनास तडीतापडी संन्याशी, यात्री येऊ लागले. बीजेचा महोत्सव होऊं लागला. त्यांना बाबांना अन्नदान करावे लागे. त्याकरिता इ. स. १६९१ मध्ये छत्रपति राजाराम महाराजांनी नारायणबाबांना येलवाडी गांव इनाम दिला. पुढे देहू किन्हई ही गांवे देवाच्या महोत्सवाकरिता पूजा-अर्चा, अन्नछत्राकरितां बाबांना छत्रपती दुसरे शिवाजी आणि शाहू महाराज यांचेकडून मिळाली. शाहू महाराज आणि राणी सरवारबाई बाबांना गुरूचे ठिकाणी मानीत असत. नारायण महाराजांनी तुकोबांची पालखी सोहळा आषाढी वारीस सुरू केला. बाबांनीं देवस्थान नांवारूपास आणले. सांप्रदाय वाढविला. औरंगजेबाचा तळ महाराष्ट्रात पडला असता पंढरपूरच्या आणि शिंगणापूरच्या यात्रेकरूना होणारा उपद्रव थांबविला. बाबा शके १६४५ श्रावण शुध्द चतुर्थीस वैकुंठवासी झाले. त्यांच्या अस्थी घेऊन महादेवबाबांचे चिरंजीव आबाजी बाबा काशीयात्रेस गेले.

गंगोदकाची कावड घेऊन आबाजीबाबा देहूस आले. दरम्यान विठ्ठलबाबांचे चिरंजीव उध्दवबाबा हे या समयी शाहू तुकोबांच्याजवळ होते. ते देहूस आले. त्यांनी देवस्थान संस्थानचा कारभार हाती घेतला. आबाजीबाबांचे ताब्यात देवस्थाने ते देईनात. आबाजी बाबा हेही वैराग्यसंपन्न तपस्वी हरिभक्ती रत होते. आबाजीबाबा नंतर त्यांचे चिरंजीव महादेवबाबा हेहि देवस्थान संस्थानाकरितां भांडले. भांडण वडीलपणाच, देवाकरिता होत, संस्थानाकरिता नव्हत. सरकारने विशेष लक्ष घातले नाही. तेव्हा महादेवबाबा देहू सोडून देवाकरिता संप्रदायाकरिता पंढरपूरला येऊन राहिले. भक्‍त देवाकडे आले. यांनी तुकोबांच्या अभंगांचे संकलन करून गाथा तयार केली, देहूकरांच्या फडाची परंपरा चालविली. त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज देहूकर यांनी पंढरीच्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे कार्य भरीव असे केले व त्यांचेंच वेळी अनेक लहानमोठे फड नांवारूपास आले व वारकरी पंथाची परंपरा अधिकाधिक वाढू लागली. कर्नाटकापर्यंत संप्रदाय वाढविला. त्यांचे चिरंजीव वासुदेवबाबा यांनी फड नावारूपास आणला तुकोबाचे पणतू गोपाळबुवा हेहि साक्षात्कारी होते.

तुकोबांचें चरित्र लिहिले, हे त्यांचे महान कार्य होय. देहू संस्थानने घराण्याची आषाढी कार्तिकीची पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा आजतागायत अखंड चालू ठेवला. देहूकर मंडळीनी गावोगावी कथा, कीर्तने करून वारकरी संप्रदाय वाढविला. संप्रदायाची व कुलदेवतेची अमोल सेवा केली. आजही सर्वजण,
अमृताची फळे अमृताचे वेली । तेची पुढे चाली बीजाचिहि ॥१॥

हे तुकोबांचे वचन सार्थ करून दाखवीत आहेत.
🚩 जय जय पांडूरंग हरी... 🚩
🙏 विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती ~

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

अप्रतिम संकलन.संत तुकारामांची ही माहिती वाचताना साक्षात तुकोबा उभे राहिले. माझे आजोबा किर्तनकार होते. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या काही गाथा लहानपणी ऐकलेल्या आठविल्या. धन्यवाद सर.

Master म्हणाले...

धन्यवाद 🙏

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले