नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

दीप अमावास्या


२००४ पासून मी दीप अमावस्या कार्यक्रम शाळेत साजरा करतं आहे.... 
आषाढमासाच्या अखेरच्या दिवशी दीप उजळून सभोवतालचा काळोख नष्ट करायचा असतो. हा दिवस भाग्योदय घडवणारा. घरात अखंड लक्ष्मीचा वास घडवून आणणारा. भाग्योदय तेव्हाच होतो, जेव्हा देहही सक्षम असतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि संप्रेरकांचे संतुलन करवण्यासाठी संस्कृतीने करून दिलेली आठवण म्हणजे दीप अमावास्या.
दीप पूजनाची तयारी कशी कराल?
दीपपूजनाची जागा स्वच्छ करून घ्यावी. घरातील दिव्यांवरची धूळ निघून जावी यासाठी आधीच ते धुवून घ्यावेत. संध्याकाळी दिवे दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत. मग पाटावर वस्त्र पसरून त्यावर दिवे ठेवावेत. गूळ घातलेल्या उकडलेल्या कणकेचे गोड दिवे उजळावेत. त्यांची मनोभावे पूजा करावी. श्रावण-भाद्रपदातील अनेक सणांत पत्रीचे महत्त्व आहे. या पत्रीचे महत्त्व दीप अमावास्येपासूनच सुरू होते. आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. पुरणाच्या धिंडाचा गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. नैवेद्य दाखवत असताना दिव्याची प्रार्थना करावी.

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

- ‘हे दिव्या, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’
त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.
आज दिव्यांची अमावास्या आहे. आजकाल 'गटारी' च्या सतत होणाऱ्या उल्लेखामुळे आपली दीप अमावास्येची संस्कृती लोप पावत चालली आहे. म्हणूनच आजच्या दिवसाचे महत्त्व सांगणारी ही कविता..

आत्मतेजा ईश्वरी ओजा
नमन माझे दीपका
आत्मज्योती नंदादीप
नमो तुजला तिमिरांतका ||१||
समईच्या ह्या शुभ्र वाती
मंद तेवूनी प्रकाश देती
आयुष्याचे तेल मिसळूनी
पंचप्राणांच्या पंचज्योती ||२||
दीपमहात्म्य असे विश्वव्यापी
दिव्याचे स्थान ईश्वरासमीप
शुभकार्ये लावू दीपमाळ
निधन समयी लावतात दीप ||३||
दिव्याची उपमा देती जगी ह्या
सद्गुरू असे ज्ञानदीप
दीपस्तंभासारिखा मार्ग दाखवी
भवसागरी असे ज्ञानप्रदीप ||४||
आषाढाचा अंतिम दिन हा
दिवस दीपअमावास्येचा
लक्ष लक्ष दिव्यांना नमूनी
पथ चालूया जीवनाचा ||५||

गटार ( Gutter) नव्हे , गताहार ! ...…. 
आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते।
आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो। या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे तो)अमावस्या म्हणतात।
आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे। आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय।
आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा। आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे। आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं। आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या।
गटार(Gutter) नव्हे, गताहार
गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते
आहार= भोजन
गत+आहार=गताहार
जसे:-
शाक+आहारी=शाकाहारी
तसे:-
गत+आहारी=गताहारी
गत+आहारी+अमावस्या=गताहारी अमावस्या

या दिवशी दीप पुजन करतात
 दीप अमावस्या. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.

आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.

म्हणून विनंती करतो " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!

( कृपया हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )

४ टिप्पण्या:

लक्षवेधी म्हणाले...

छान विवेचन केलेत , आजच्या पिढीला चांगली माहिती दिलीत ,शुभेच्छा 💐💐💐

Master म्हणाले...

होय.... गेली अनेक वर्षे दीप अमावस्या कार्यक्रम करत आहोत...

Unknown म्हणाले...

Khup chhan.

अनामित म्हणाले...

खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले