नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

वीर मुरारबाजी देशपांडे

 

वीर मुरारबाजी देशपांडे                          
जन्म : १६१६ (महाड)                                                 वीरगती : १६ मे १६६५ (पुरंदर)                                                 मुरारबाजी हे मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.

🏇 *सैनिकी कारकीर्द*
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव.
मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.

इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेनी दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी १६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला.दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली. वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला.  मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची! पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते.

१६६५ च्या आषाढातील तो एक भयाण दिवस…… १६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता. हा विचार की अविचार? त्याला एक कारणही होतेच. कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते. एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर? नाहितरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल. मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. मुरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , ‘ अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! ‘
हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ‘ मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय ?’
आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला. धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला.बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.

त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे –
‘सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय?’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला!’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’
🛕 *समाधी*
मुरारबाजी देशपांडे यांची समाधी पुरंदर किल्ल्यावर आहे.                            🏰  *पुरंदर किल्ल्याचा इतिहास*

पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले.

▪️या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.

▪️इसवी सन १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.

▪️इसवी सन १३८० बहामनी राज्याकडून किल्ला दुरुस्ती. शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी

▪️इसवी सन १४८६ अहमदनगर निजामशाहीचे किल्ल्यावर राज्य

▪️इसवी सन १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला

▪️इसवी सन १६२९ किल्ला आदिलशाही कडे

▪️इसवी सन १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू. त्याचे मुलांमधील वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर. स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच.

▪️इसवी सन १६४८ पहिली लढाई याच किल्यावरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला.

▪️१४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म

▪️राणी सईबाई यांचे निधनानंतर कापूरहोळच्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजी राजेंना वाढविले.

▪️इसवी सन १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.

▪️३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा

▪️१४  एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.

▪️एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडेंचे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६, महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.

▪️१३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह. किल्ला मोघलांचे ताब्यात.

▪️८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.

▪️इसवी सन १६८९ किल्ला मुघलांकडे. औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले

▪️इसवी सन १६९१ किल्ला स्वराज्यात परत
▪️इसवी सन १७०५ किल्ला मुघलांकडे
▪️इसवी सन १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मुघलांकडून परत मिळवला
▪️इसवी सन १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य
▪️इसवी सन १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.
▪️इसवी सन १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.
▪️इसवी सन १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकऱ्यांचे बंड. मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारींनी हल्ला. गडावर कब्जा.
▪️इसवी सन १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४ सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा कारभार गडावरून.
▪️इसवी सन १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात
▪️इसवी सन १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली. तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.
▪️१९  एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण
▪️इसवी सन १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली.        
      🚩 *हर हर महादेव* 🚩
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
     ♾️♾♾♾ संकलित माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले