जन्म- इ.स. १९०९; महाळुंगे पडवळ
मृत्यू- डिसेंबर १२, इ.स. १९३०, मुंबई)
हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला एक स्वातंत्र्यसैनिक होता.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात जन्मलेल्या बाबू गेनू सैद यांचे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्य होते. मुंबईत गिरणीत काम करून ते उदरनिर्वाह करीत असत; पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्यांवरच्या बंदीच्या चळवळीत ते सक्रीय झाले.
१२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला; पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ते ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रज ड्रायव्हरने ट्रक या २२ वर्षांच्या तरुणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबू गेनूंना हौतात्म्य लाभले.त्याच्या अंत यात्रेस २० हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढे १७ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण कापड बाजारातील एका छोट्या गल्लीला नाव व आंबेगावात एक छोटेसेच स्मारक या पलीकडे स्वदेशी व सत्याग्रहाच्या या सच्च्या गांधीवादी कार्यकर्त्याचे स्मरण मात्र कुणालाच राहिले नाही.
बाबू गेनूच्या कवटीला मार लागल्यामुळं त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला असल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं. या घटनेच्या वेळी सर्व आंदोलक जखमी झाल्यानं कोणताही साक्षीदार नोंदवण्यात आलेला नव्हता. बाबू गेनू हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगत कॉंग्रेस कार्यालयात त्याचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. क्वीन्स् रोडवर झालेल्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते जमनालाल बजाज, लिलावती मुंशी, पेरीन कॅप्टन आणि जमनादास मेहता या प्रभूती उपस्थित होत्या. बाबू गेनू परळमध्ये राहत होते. त्यामुळं परळच्या कामगार मैदानात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातल्या एका रस्त्याला बाबू गेनूचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावाने एक संस्थाही आहे. स्वदेशीच्या चळवळीत आपले प्राण झोकूण देणा-या या विराविषयी भारतीय स्वातंत्र्याइतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. ज्या मुंबई शहरात बाबू गेनूने देशासाठी आपले प्राण त्यागले तिथं एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
हुतात्मा बाबू गेनू व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आत्माहुती देणाऱ्या असंख्य अनामिक हुतात्म्यांना श्रद्धांजली.