नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज
जन्म : ८ डिसेंबर १६२४ ( सदुंबरे, मावळ, पुणे, महाराष्ट्र )
निधन : १६८८
वडील : विठोबा जगनाडे
आई : माथाबाई
हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
💁♂ *बालपण*
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यां पैकी एक झाले.
🔱 *विवाह*
संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.
☯ *गुरुभेट*
त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.
✒ *गाथांचे पुनर्लेखन*
संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
⏳ *इहलोकाचा त्याग*
शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
संताजी जगनाडे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-
📝 *संताजी महाराजांचे अभंग*
★☆ *संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग* ☆★
》》》भाग-1《《《
{क्र. 1 }
माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। 1 ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। 2 ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। 3 ।।
{अभंग क्र. 2}
एकादशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ।। 1 ।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ।।2।।
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
अलिँगन देता झाला त्याशी ।।3।।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।4।।
{अभंग क्र.-3}
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। 1 ।।
काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ।।2।।
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा का गेला ।।3।।
तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।। 4
{अभंग क्र.-4}
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।
आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। 1 ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी ।
पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। 2।।
संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।
आपुले ते मन सुधारले ।। 3 ।।
{अभंग क्र.- 5}
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। 1 ।।
भक्ति या भावाची करुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। 2 ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। 3 ।।
》》》भाग-2《《《
{क्र.6}
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।1।।
मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।2।।
किर्तीविणा कांही मागे ते राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ।।3।।
{क्र.7}
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।1।।
त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही ।
प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।2।। संतु म्हणे असा अंभग गाइला ।
पुढे चालु केला देहावरी ।।3।।
{क्र.8}
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही ।
निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।1।।
तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही ।
जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।2।।
असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाही आला कदा काळी ।।3।।
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ।।4।।
{क्र.9}
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।
तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।1।।
नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।2।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।3।।
{क्र.10}
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा ।।1।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।2।।
सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।3।।
फेरे फिरो दिले जन्मवरी ।
तेल काढियले चैतन्य ते ।।4।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।5।।
》》》》भाग - 3《《《《
{क्र.11}
देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा ।
गुदस्थान जाणा उखळ ते ।।1।।
स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।
विदुं दंत चक्र आनु हात ।।2।।
एकविस मनी खांब जो रोविला ।
सुतार तो भला विश्वकर्मा ।।3।।
मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले ।
तेल हाता आले सुटे मन ।।4।।
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।
चालवि आपोआप पांडुरगं ।।5।।
{क्र.12}
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।1।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।2।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही । शोधुनिया पाही संतु म्हणे ।।3।।
{क्र.13}
निदंक हा घाणा म्हणावा तो जरी ।
शुभ कार्या आधिं भरतात ।।1।।
श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।
म्हणवेना कोणा निंदक तो ।।2।।
संतु म्हणे म्या तो घाणा भरियला । सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।3।।
{क्र.14}
आणिक तो घाणा कोणता सादर ।
सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।1।।
ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे ।
दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।2।।
संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।
सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।3।।
{क्र. 15}
घाण्याचा कर करा पुसलासी मज ।
तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।1।।
दशनाद होती सर्वाँचे ब्रम्हांडी ।
तुझे काय पिँडी वाजताती ।।2।।
संतु म्हणे घाण्याचा करकरा ।
दशनादाचा तो खरा जगा माजी ।।3।।
》》》भाग - 4《《《
{क्र.16}
आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून ।
दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।1।।
त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून ।
सरकायासी जागा नाही मुळापासून ।।2।।
संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी ।
जग भुलव्या नारी खय्राच ह्या ।।3।।
{क्र.17}
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।
आणिक नारदाशी त्याच रीती ।।1।।
ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।2।।
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशी देहातुनी ।।3।।
{क्र.18}
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।
हाकलुनि दिल्या घरातुनी ।। 1 ।।
अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।
गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।
सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।3।।
{क्र. 19}
पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा ।
भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। 1 ।।
विश्वामिञासी रंभेने कुञा बनविला।
मागे मागे नेला घराप्रती ।।2।।
संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ।।3।।
{क्र.20}
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। 1 ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।2।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।3।।
》》》भाग - 5《《《
{क्र. 21}
मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।1।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।2।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची .... फाट ।।3।।
{क्र.22}
लाट उचलली जगामधी कोणी ।
मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।1।।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।2।।
लाट उचलली भक्तीची । संतु तेल्याचे मुक्तिची ।।3।।
{क्र.23}
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।
उचलितो कोण देउनिया नेट ।।1।।
नेट तो दिधला लंकेचे रावणे ।
उचलेना तेने कदापिहि ।।2।।
संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ।।3।।
{क्र.24}
सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।
रावणाशी होती पुष्कळच ती ।।1।।
रावणा उचलेना सुदामा उचली ।
मती गुंग झाली रावणाची ।।2।।
संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।
लाट ही उचलेना कदाकाळी ।।3।।
{क्र.25}
लाठ माझी माता लाठ माझा पिता ।
लाठी विना कांता विद्रुपची ।।1।।
लाठी हीने मजला दिधली ती लाट ।
चुकवीली वाट जन्ममरणाची ।।2।।
संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।
व्यर्थची खटपट करु नका ।।3।।
》》》》भाग-6《《《《《
{क्र. 26}
मन मोहाची करुनि खुटी ।
लाठीस ठोकली बळकटी ।।1।।
फिरे गरगरा लाठी भोवताली ।
ध्यान जाईना लाठीवरी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी ।
पहा उठाउठी अगोदर ।।3।।
{क्र.27}
खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।
दशरथ राजाला आणि नारदाला ।।1।।
दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।
नारद तो झाला नारदीच ।।2।।
संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।
विश्वाच्या तोलाची एकटीच ।।3।।
{क्र.28}
खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे ।
मनी नाही आले अगोदर ।।1।।
आता तरी सावध व्हारे लवकरी ।
खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।2।।
संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या ।
खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।3।।
{क्र.29}
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला ।
वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।1।।
भरतानी त्याग केला पादुकास मान दिला ।
दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी ।
केली तुटा तुटी मायलेका ।।3।।
{क्र.30}
अशिया खुंटिला धरु नये हाती ।
करिल ती माती सर्वञांची ।।1।।
असेच खुंटिने गोपिचंदन फसविले ।
धातुचे पुतळे जळोनिया गेले ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी ।
सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ।।3।।
》》》》भाग - 7《《《《
{क्र.31}
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।1।।
काळ मोडुन टाकिल मुंडी ।
कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।2।।
सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ।।3।।
{क्र.32}
शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।1।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले । कधी नाही भ्याले राञंदिन ।।2।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ।।3।।
{क्र.33}
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची ।
नारद मुनिची असेच कीं ।।1।।
जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना ।
तेव्हां ती कडाडे आपोआप ।।2।।
संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे ।
शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।3।।
{क्र.34}
आणिक शेँडीने फसविलेँ कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।। कुंभकर्णाशीँ होती झोँप फार । तेणेँ तो आहार फार करी ।। संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ।।
{क्र.35}
झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।। भार सुवर्ण होईना तेँ पुरे। पुरे सर्व देऊन घेतलेँ स्वतःस विकून।। संतु तेली म्हणे हो म्हणेही झोँप। हिचा सर्वाहीँ करा करा कोप।।
》》》》भाग - 08《《《《
{क्र.३६ }
मनोसुविचारी करुनि कातर। शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।।
लाटिचा आधार तिला फार हो लाठि। फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।।
मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ । संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।
{क्र.३७}
कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।।
कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।।
संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ। आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।
{क्र. ३८}
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।।
आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।।
संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
{क्र.३९}
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।
आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।।
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।
{क्र.४०}
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।।
तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।।
संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।
》》》》भाग - 09《《《《
{क्र. ४१}
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।।
तिच जन्म मरणाचे मुळ। असेँ माझेँ सांगणे समुळ।।
संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे । तेथेँ यम पाश उभा राहे ।।
{क्र.४२}
असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।।
आणिक कोणाशीँ लागला तो पाश । मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।।
संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ । नरकाचे डोही जाऊं नका।।
{क्र.४३}
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।।
सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतेँ तिळगुळ यमा हाती।।
{क्र.४४}
क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।।
जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।।
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।
{क्र.४५}
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।
आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।।
संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।
》》》》भाग - 10《《《《
{क्र. ४६}
सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।।
मन पावन ओढी जोरानेँ। मग तो घाणा चाले मौजेने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी।।
{क्र. ४७}
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।।
मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ । हाता काय आलेँ काळकुट ।।
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची।।
{क्र.४८}
आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।।
घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी।।
{क्र.४९}
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।।
कर्णानेँही दिली सारथी शल्यास । आणिक ती दिली धर्मानीँ कौरवांस ।।
संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।
{क्र.५०}
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।
मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।।
संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।।
》》》》भाग - 11《《《《
{क्र. ५१}
संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।।
तुकाचे नावेँ फोडी खडे। विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।।
संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट सर्वाँलागीँ ।
{क्र. ५२}
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।।
म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड । संसारात जोड करि कांही ।।
संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड । करा कांही जोड देवाजाची ।।
{क्र. ५३}
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।।
देवाची करिना कधी जोड । हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।।
संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।
{क्र. ५४}
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।।
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।
{क्र. ५५}
जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।।
फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।।
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।
》》》》भाग - 12《《《《
{क्र.५६}
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।।
तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।।
संतु म्हणे हा मोठा बोका। मस्तकी बाहुली ठोक ।।
{क्र.५७}
मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।।
भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ।।
संतु म्हणे हा मत्सर । जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।
{क्र.५८}
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।।
भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ।।
संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।
{क्र.५९ }
आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।।
हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।।
संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।।
{क्र.६०}
आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।।
गौरोबानेँ हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।।
संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।
》》》भाग - 13《《《
{क्र.६१}
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।।
प्रपंच जोखड शिरीँ घेऊन । चाले मन पवन आनंदाचे ।।
संतु म्हणे हेँ बाहुले । जन्मवरी करी हुल हुल ।।
{क्र.६२}
अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।।
केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच । आखेर बैमानी झालेच ते ।।
संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।
{क्र.६३}
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ।पुष्कळच ते धन मिळविलेँ ।।
आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ।रांडा आणि पोरां आवघ्याशीँ।।
संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ । मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।
{क्र.६४}
तुझिया सांगातीँ येते कांही कांही। कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
सोयरा न येतोँ बंधू ही येईना।। येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।।
संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ। आठवा वनमाळी रात्रंदिन।।
{क्र.६५}
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।।
सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।।
संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।
》》》भाग - 14《《《
{क्र.६६}
सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ।
आवघ्या जनानोँ सावध व्हारे।। काळाचिये उडी पडेल बा जेव्हां।
सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला। देहासहित गेला तुकावाणी।।
{क्र.६७}
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ।। जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी।। संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।
{क्र.६८}
मन हेँ ओढाळ गुरु फार आहे।
परधन पर कामिनीकडे धांवेँ।। असेच हे मन राहिना हो स्थिर।
नेहमीँ हुरहुर लागली असे।।
संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर।
राऊळा आंगणीँ जाऊनियां।।
{क्र.६९}
मनाला तो बोध रामदासांनेँ केला।
उपदेश दिला जगामाजीँ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा।
यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी।
विठ्ठल विटेवरी उभा असे।।
{क्र.७०}
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता।। संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ।।
》》》भाग -15《《《
{क्र.७१}
पवन तो नंदी असे शंकराचा।आणीक बळीचा शेतकिचा ।।
नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार।कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां।दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।
{क्र.७२}
घेऊनिया घाणा तेल काढियले।गि-हाइक संत मंडळीचे आले।। कसे देतां तेल सांगावे संताजी।तुम्ही काय घेता घेणार तो तुका।। संतु म्हणे तेल जो कोणी घेईल।कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज।।
{क्र.७३}
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो।तुका वाणी येतो घ्यावयास।। घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत। गळ्यांत जो आहे त्यांतही घाला।। संतु म्हणे तेल घालुनि उरले।मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे।।
{क्र.७४}
आणीक हे तेल घेतलेँ कोणी।निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी।। मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी।तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी।। संतु म्हणे तेल कोणी जो घेईल।दुकाना येईल विठलाच्या।।
{क्र.७५}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी।गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ।। तसेच घेतले नरहारी सोनारानीँ।कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल। त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग।।
》》》भाग - 16《《《
{क्र.७६}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
तसेच हे तेल घेते जनाबाई । मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।
संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ । पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।
{क्र.७७}
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा।आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही । मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।।
संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही।पांडुरंग पायीँ धरियलेँ।।
{क्र.७८}
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।
कानाडी कानड्याचा,मुसलमान तो दिल्लीचा।।
मराठी महाराष्ट्राचा । कोँकणी कोकणचा ।।
संतु तुका या देशीचा ।
वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका ।
विठल चरनीँ वाहु बुका।।
{क्र.७९}
देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार।
दोहीँचा विचार एकपणेँ।। भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे।
देव त्यांच्या संगे सुख भोगी।। देवेँ भक्तारूप दिलासे आकार।
भक्ती त्याचा परिवार वाणिला।। एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण ।
देव भक्तपण स्वामी सेवा।। संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव।
भक्त तोचि देव देव भक्त।।
{क्र.८०}
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे।
एक उभा राऊळा आंगणीँ।। एक घाना बैसे जाऊनि।
एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।
एका आंगा लाविले गंध।
एका अंगा येई सुगंध।। एक वाजवितो विणा ।
एक दाखवितो खुणा।।
एक म्हणतो अभंग ।
एक म्हणे पांडुरंग।। संतु म्हणे एक जीँव।
दोहोँ कुडी दिला ठाव।।
》》》भाग -17《《《
{क्र.८१}
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।
एका कुडी घातलेँ शिट। एक कुडी दिसे तेलकट ।।
एके कुडी घातली माळा।एकीचा रंग दिसे सावळा ।।
संतु म्हणे कुडी टोपन। हिचे करूं नका जोपन।।
{क्र.८२}
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।।
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही। शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी।।
{क्र.८३}
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी।
आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ।। तुका विकी सौदा आणिक मिरची।
संतु विकी तेल लागुनि चुरशी।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।
तुकयाशी खुण पटली असे।।
{क्र.८४}
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण।
तुजलागी ज्ञान फार आहे।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।
मजलागी देख कळो आलेँ।। ज्ञानाचा सागर होशील तूं योगी।
नेणती हेँ जगीँ मूढ जन।। तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान।
ऐकतां वचन गोड लागे।।
{क्र.८५}
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता।काय तुज आता सांगू वर्म।। किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय।। यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।
🙏🌹 *जय संताजी* 🌷🙏🚩 *गुरुमाऊली* 🚩
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹
स्त्रोतपर माहिती
आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य उर्फ भाऊसाहेब देशमुख Panjabrao Deshmukh जन्म : २७ डिसेंबर १८९८ (पापळ, अमरावती, महाराष्ट्र ) मृत...