*जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन*
k̷ ̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷*आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही....*
आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच बाबतीत अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आज पेपरमध्ये आपल्या वाचनात येत असते. अभ्यासाचा ताण, पेपर अवघड गेला, आई - वडील रागावले किंवा टी.व्ही. पाहू दिला नाही आणि अत्यंत शुल्लक कारणांनी 12-18 वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. शुल्लक कारणांवरुन आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकण्याचा या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे. जगभर 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.
आपले मन हे एखाद्या हिमनगासारखे असते. आईसबर्ग किंवा हिमनग जेव्हा पाण्यावर दिसतो तेव्हा बर्फ वजनाने पाण्यापेक्षा हलका असल्या कारणाने पाण्यावर तरंगतो. आणि हिमनगाचा एक दशांश आपल्याला पाण्यावर दिसतो. उरलेला नऊ दशांश भाग पाण्याखाली दडलेला असतो. म्हणून तर टायटॅनिक सारखी मोठमोठी जहाजे हिमनगावर आपटून फुटतात व बुडून जातात. धोक्याचा इशारा मिळून देखील आपला वेग कमी करता येत नाही. धोक्याचा नक्की अंदाज येत नाही. पुरेसे अंतर ठेवले जात नाहीत. आपल्या मनाच्या बाबतीतही तसेच होते. आपले मन धोक्याचा इशारा देत असले तरी आत खोलवर किती राग, व्देष, उद्वेग उकळत असतो याचा अंदाज कधी आपल्याला येत नाही. हे थोरांच्या बाबतीत काय किंवा मुलांच्या बाबतीत काय? ज्वालामुखीचा उद्रेक झाला की लाव्हा रस चहुबांजुनी वाहू लागतो कधीकधी आपल्या मुलांमध्ये आपल्याला अशी ज्वालामुखीसारखी चिन्हे दिसतात. वरवर शांत वाटणारे मुल एकदम चिडून बेभान होते. काहीतरी बोलून जाते, करुन बसते.
नवीन पिढीची सहनशिलता कमी झालेली आहे. टी.व्ही. वरील आततायी खेळ, व्हीडिओ गेम आदी आभासी विश्वातील हिंसा, क्रौय यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करीत आहेत. आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना माहिती नसते. वैद्यकीय भाषेत त्याला पुअर इम्पल्स कंट्रोल अथवा बिहेव्हिअर मॉडिफिकेशन, असे म्हणतात मुलांच्या वागण्यात आत्मविनाशाची चिन्हे दिसल्यास पालकांनी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. योग्य उपचार समुपदेशाने त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकेल. 100 पैकी 5 ते 10 टक्केच मुले दुराग्रही असतात. त्यांची काळजी घ्यायला हवी.
वारंवार प्रयत्न आलेल्या अपयशाचे काय? इथे वारंवार या शब्दाचा अर्थ आपण कसा घेणार यावर आपले पुढले वागणे अवलंबून असेल वारंवार याचा अर्थ आत्तापर्यंत असा घेतला तर व्यक्ती प्रयत्नवादी राहू शकेल. आतापर्यंत आलेल्या अपयशाचे पृथकरण करुन पुढील वाट काढू शकेल वारंवार या शब्दाचा अर्थ कायमचा असा घेतला तर मात्र आपण नशिबावर लेबल लावू. स्वत:वरही लेबल लावू आणि निराशेच्या दु:खाच्या गर्तेत प्रवेश करु, दैनिक जीवन संघर्षाचे Learned Helpessness हा Experiential (अनुभवसिध्द) नसून Precived (संवेदनाधिष्ठित) असतो. अपयशाच्या एका किंवा अनुभवानंतर जर व्यक्तीने स्वत:वर कमनशीबी व अपयशी म्हणून शिक्का मारला तर त्यातून डिप्रेशनची निर्मिती होते.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढाव उतार येत असतात. परंतु डिप्रेशनच्या जाळ्यात अडकून आत्महत्येच्या निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याकडे येऊन आपले मन मोकळे करन पहा तसेच तुमच्या आजूबाजुच्या लोकांच्या मनातील आत्महत्येच्या निर्णयाबाबत लक्ष ठेवण्यासाठी ही काही लक्षणे जी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
अनेक दिवसांपासून निस्तेज आणि निरुत्साही राहणे हे एक प्रमुख लक्षण आहे. विनाकरण भूक मंदावणे किंवा जेवण निरस वाटणे हे धोकादायक आहे. दूर रहाणे - अचानक एखादी व्यक्ती एकलकोडी होणे किंवा त्यांच्या प्रियजनांपासून दूर दूर राहणे त्यांना प्रतिसाद न देणे. निराश रहाणे - अचानक ती व्यक्ती आपल्या अपयशाबद्दल किंवा स्वत: निरुपयोगी असल्याचे म्हणत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याच कामात सहभाग न घेणे - अचानक आवडत्या कामातून आणि धंदातून मन काढून घेणे. झोप न लागणे - आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेणे रात्री झोप न आल्याने अस्वस्थ राहणे. जीवन संपवण्याबद्दल बोलणे - काही वेळेस मस्करीत किंवा काही वेळेस गांर्भीयाने पण आत्महत्येचा विचार मनात येणे ही आत्महत्येच्या कृतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. प्रत्येकाचे आत्महत्येचा पर्याय निवडण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. परंतु त्यावर बोलून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत औषधोपचार समुपदेश केले जाते.
आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत, पण आपणच आयुष्यातून कायमचे सुटतो. आयुष्य हे खूप सूंदर आहे. यात अडथळ्यांचे काटे आहेत हे बरोबर पण ते दूर केल्यावरच आयुष खऱ्या अर्थाने जगलो, असे म्हणता येईल त्यामुळे समस्येतून मार्ग काढण्यासाठी आत्महत्या करण म्हणजे मौल्यवान आयुष्य भरभरुन जगण अर्धावर सोडून देणेच होय.
***संकलित माहिती