नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, १८ एप्रिल, २०२१

तात्या टोपे Tatya Tope

तात्या टोपे…नाव तर सर्वांच्याच परिचयाचे, मात्र त्यामागची कहाणी फारच कमी जणांना ठावूक आहे. या व्यक्तीच्या जीवनाबद्दल खूप काही जाणून घेण्यासारखं आहे.

🏇 तात्या टोपे 🏇 ( रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग टोपे)
जन्म : १६ फेब्रुवारी १८१४ येवला (नाशिक)
फाशी : १८ एप्रिल १८५९ शिवपुरी (मध्यप्रदेश)



"१८५७ च्या विद्रोहात जो सर्व नेते होते सामील होते, त्या सर्व नेत्यांमध्ये तात्या टोपे अप्रतिम साहसी, अति धैर्यवान आणि दृढनिश्चयी होते. त्यांची संघठनशक्ती व प्रतिभा प्रशंसनीय होती"- सर हयू रोज.
ह्यू रोज प्रमाणेच जॉर्ज फारेस्ट याने तात्या टोपेला 'सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नेता ' म्हटले आहे. " तात्या टोपे जगातील सर्वश्रेष्ठ गुरिल्ला सेना नायक होते....... जर त्या विद्रोहात त्याच्यासारखे आणखी दोन तरी नेते असते , तर हिंदुस्थान इंग्रजांना तेव्हाच सोडावा लागला असता. यात शंकाच नाही."
"40 हजार सैनिक खऱ्याखुऱ्या तात्या टोपेंना आणि त्यांच्या 5 हजार सैन्याला पकडायला सज्ज आहेत", हे वाक्य आहे मेजर जनरल जीएसपी लॉरेन्स यांनी भारत सरकारच्या सेक्रेटरींना लिहिलेल्या पत्राचं. तेही 1863 सालचं. म्हणजेच युद्ध संपून आणि तात्या टोपेंचा मृत्यू होऊन 4 वर्षं झाली तरी ब्रिटिशांना तात्या टोपे मेल्याची खात्री पटत नव्हती.
तात्यांच्या मृत्यूबद्दल अशा अनेक वदंता, दंतकथा तयार झाल्या. काही लोकांना तात्या टोपेंना मारलं जाऊ शकत नाही, तसं त्यांना वरदान आहे असं वाटत होतं. काहीही असलं तरी तात्या टोपेंचा मृत्यू ब्रिटिश साम्राज्याची डोकेदुखी नक्कीच झाला असणार असं अनुमान काढता येतं.
दुसरा शिवाजी अशी ओळख निर्माण करणारे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनापती तात्या टोपे !
१८५७ च्या युद्धात तात्या टोपे हे एकमेव सेनापती असते आणि ठरलेल्या दिवशी उठाव झाला असता, तर भारताला १५० वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. लंडन टाईम्ससारख्या शत्रूराष्ट्राच्या वृत्तपत्रानेही तात्यांचे चातुर्य आणि कल्पकता यांचे कौतुक केले होते. त्या वेळी ब्रिटिश वृत्तपत्रे दुसरा शिवाजी, असा त्यांचा नामोल्लेख करत होती. – डॉ. सच्चिदानंद शेवडे
' तात्या टोपेबद्दल वर दर्शविल्याप्रमाणे लिहिणारे तिन्ही लोक इंग्रज होते. हे लक्षणीय आहे. शत्रुसुद्धा ज्याची अशी प्रशंसा करतात, तो सेनानायक आधी नानासाहेब पेशव्यांच्या पदरी मुख्य लेखनिक होता. तो नानासाहेबां पेक्षा दहा वर्षांनी वयाने मोठा होता. कानपूरला जेव्हा नानासाहेबांनी उठावाची सूत्रे हातात घेतली. तेव्हा त्यांनी लेखनिक तात्याला आपल्या दरबारात बोलावले व त्यांना सैनिकी वेष व रत्नाजडीत तलवार देऊन आपला सरसेनापती घोषित केले. लेखणी टाकून देऊन तलवार हाती घेणारा व युद्धाचा कसलाही अनुभव नसणारा तो सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला आणि आपल्या देशाच्या स्वतंत्रतेच्या बलिवेदीवर त्याने धैर्यपूर्वक आपले बलिदान केले. आपल्या आयुष्याच्या उण्यापु-या शेवटच्या दोन वर्षात तात्याने एवढी चिकाटी , निष्ठा , शौर्य व बाणेदारपणा दाखविला की, शत्रुंना ( इंग्रजाना ) सुद्धा त्याच्या गुणांची व कर्तृत्वाची वाखाणणी करावी लागली.
तात्याचे वडील पांडुरंगराव , ते वेदशास्त्र संपन्न होते. त्यांचे मुळगांव बीड़ जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जोळ हे खेडे. त्या काळात पाटोदा तालुका नगर जिल्ह्यात होता. नंतर ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी स्थायिक झाले . दुस-या बाजीरावाचा विश्वासू सरदार त्र्यंबकजी डेंगळे हा नगर जिल्हयातल्या संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथला राहणारा. त्याचा व पांडुरंगरावांचा चांगला परिचय होता. त्र्यंबकजी डेंगळ्यांनीच पांडुरंगरावांना दुस-या बाजीरावाच्या सेवेत आणले. त्यांच्याकडे धर्मदाय खाते सोपविण्यात आले. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडविली व
दुस-या बाजीरावाला आठ लाख रुपये पेन्शन देऊन उत्तरेत गंगेच्या काठी ब्रम्हावर्त ( विठूर ) येथे स्थायिक केले. दुस-या बाजीरावाबरोबर जी ब्राम्हण मंडळी विठूरला गेली, त्यांत पांडूरंगरावही होते व तेथेही त्यांच्याकडे धर्मदाय खाते होते. ते आधी अण्णासाहेब विंचूरकरांचे आश्रित होते . पांडुरंगरावांना आठ मुले होती. त्यातला दुसरा रामचंद्र ऊर्फ तात्या.त्याचा जन्म येवले येथे सन १८१४ सुमारास झाला. विचूरकरांच्या ' तीर्थयात्रा प्रबंध ' या तत्कालीन हस्तलिखितात रामचंद्ररावांचा उल्लेख 'अप्पा टोपे' य तात्यांचा उल्लेख 'तात्या टोपे ' असा आहे. यावरून त्यांचे मूळ आडनाव टोपे हेच होते. बाजीरावाने दिलेल्या टोपीवरून त्याचे आडनाव टोपे असे पडले, ही आख्यायिका त्यावरून वाद ठरते. ते येवले येथे स्थायिक झाल्याने त्यांना येवलेकर असेही आडनाव लाभले. ते देशस्थ ब्राह्मण होते.
नानासाहेब पेशव्यांचे संबंध कानपूरच्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांशी चांगले होते. ते अधिकारी अधूनमधून विठूरला नानासाहेबांकडे येत असत. नानासाहेब त्यांचे आदरातिथ्य उत्तमप्रकारे करायचे. त्यामुळे त्या अधिका-यांचा नानासाहेबांवर विश्वास होता. १० मे रोजी मेरठच्या पलटणीतील देशी शिपायांनी , ११ मे रोजी दिल्लीच्या देशी पलटणींनी व ३० मे रोजी लखनौच्या पलटणींनी इंग्रजाविरुद्ध उठाव केले. त्याच्या बातम्या कानपूरला येऊन धडकल्या. कानपूरच्या देशी पलटणी तीन होत्या. त्यात ३००० शिपाई होते. ते ही उठाव करण्याच्या बेतात आले. त्याची कुणकुण तेथला इंग्रज सेनापती व्हीलर व कलेक्टर हिलर्डसन यांना लागली. त्यांनी लगेच नानासाहेबांना त्याचे शिपाई व तोफा घेऊन कानपूरला बोलावले. नानासाहेब तीनशे सशस्त्र शिपाई व दोन तोफा घेऊन कानपूरला आले. त्याच्याकडे कानपूरच्या नबाबगंज मधील सरकारी खजिना व दारूगोळ्याचे कोठार आणि शस्त्रागार यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्रज अधिका-यांनी सोपविली. तात्या टोपेही त्यांच्याबरोबर कानपूरला आले होते.
कानपूरच्या पलटणीचा सुभेदार टीकासिंह नानांना व तात्याना भेटला. नानांचा सल्लागार अजीमुल्लाखाँसुद्धा तेथेच होता. चौघांनी उठावाचा बेत आखला. ४ जून १८५७ रोजी टीकासिंहच्या नेतृत्वाखाली कानपूरच्या ३००० शिपायांनी इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले. त्या छावणीत बायकामुलांसह फक्त १००० इंग्रज होते. व्हीलरने संरक्षणाची तयारी केलेलीच होती. टीकासिंह व तात्या टोपे यांनी कानपूरच्या रेसिडेन्सिवर हल्ला चढविला. नानासाहेब त्यांचे ८ लाखाचे पेन्शन इंग्रज सरकारने बंद केल्याने मनातून इंग्रजावर चिडलेले होतेच. ते वरवरून मैत्री दाखवित होते. त्यांनीही नबाबगंज मधला इंग्रज सरकारचा खजिना, दारूगोळा - भांडार व शस्त्रागार ताब्यात घेतले. हिलरने १६-१७ दिवस चांगली टक्कर दिली पण रेसिडेन्सीतील अन्नपाणी संपत आले. अनेक इंग्रज मारले गेले. त्यामुळे त्याने शरणागती पत्करली. नानासाहेबांनी उरलेल्या इंग्रजांना अलाहाबादेस पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कानपूर स्वतंत्र झाले. विठूरला जाऊन नानासाहेबांचा राज्याभिषेक थाटात झाला.
कानपूरची बातमी कळताच हॅवलॉक व नील हे दोघे सेनापती चिडले. नील तर क्रुरकर्माच होता. ते दोघे मोठे सैन्य घेऊन रस्त्यात दिसेल त्याला फासावर चढवित
कानपूरला पोहचले. कानपूरला टीकासिंह व तात्या टोपे शर्थीने लढले. पण त्यांचा पराभव झाला. नानासाहेब आपला खजिना व सारे कुटूंब घेऊन गंगापार निघुन गेले. तात्या उरलेले सैन्य घेऊन ग्वाल्हेरकडे गेला. तात्याने ग्वाल्हेरच्या राजाच्या सैन्याला उठावास प्रवृत केले.
हॕवलॉक व नील लखनौकडे तेथल्या इंग्रजांच्या मदतीला सन्य घेऊन गेले. ही संधी संधी तात्याने साधली व पुन्हा कानपूर जिंकून घेतले. ते कळताच हॕवलाॕक व नील वाटेतून परतले. त्यांनी कानपूरवर हल्ला केला. तात्याने मोठ्या जिद्दीने त्यांचा प्रतिकाराला केला पण त्याचा टिकाव लागला नाही. कानपूर व विठूर हातातून गेले. तात्या पुन्हा पश्चिमेकडे निघाला.
तात्याने जेव्हा कानपूर पुन्हा स्वबळावर जिंकले होते, तेव्हा त्याला युध्दोपयागी अशी प्रचंड लूट मिळाली होती. त्या लुटीत ५ लाख रुपये , ११ हजार काडतुसांच्या पेट्या , ५०० तंबू, बैलाचे पुष्कळ तांडे, भरपूर धान्य व कपडे त्याला मिळाले होते. ते त्यात काल्पीच्या किल्ल्यात ठेवून दिले होते. पश्चिमेकडे जाताना शिवराजपूरची देशी पलटण त्याला येऊन मिळाली होती. आता त्याच्या जवळ २० हजारावर सैन्य होते. त्याची बाजू आता भक्कम होती.
सर ह्यू रोजने २० मार्च १८५८ रोजी झाशीला वेढा घातला. राणी लक्ष्मीबाई जिद्दीने लढत होती. पण तिचे सैन्य बेताचच होते. तिने तात्याला मदतीसाठी बोलावले. तात्या आपले सैन्य घेऊन निघाला पण ह्यु रोजच्या सैन्याने त्याचा पराभव केला. राणी लक्ष्मीबाई झांशीहून मोजक्या सैनिकांसह गुप्त मार्गाने बाहेर पडून काल्पीला आली. तात्याने तिचे सांत्वन केले. नानासाहेब पेशव्यांचे पुतणे रावसाहेब हे सुद्धा तेथे होते. झांशी काबीज केल्यावर ह्यू रोज काल्पीयावर चालून आला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने ग्वाल्हेरवर हल्ला करण्याचा सल्ला त्यांना दिला. तिघेही आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरला आले. थोड्याशा चकमकीत ग्वाल्हेर त्यांच्या हाती आले. राजे जयाजीराव शिंदे व दीवाण दिनकरराव राजवाडे आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेले.
सर हयू रोजने काल्पी जिकल्यानंतर आपला मोर्चा ग्वाल्हेरकडे वळविला. तेथे तुंबळ युद्ध झाले. त्यात राणी लक्ष्मीबाईचे दुःखद निधन झाले. इंग्रजांनी तात्यासह सर्वांचा तेथे पराभव केला. तात्या आपल्या उरलेल्या सैन्यासह त्या युद्धातून निसटले. जाताना त्यांनी आसपासचे जंगल पेटवन दिले.
तात्याबरोबर रावसाहेब पेशवेही निघाले. तात्याने मार्च १८५९ अखेरीपर्यंत आपल्या दुर्दम्य ध्येयवादाच्या बळावर आपल्या अपु-या सैन्यानिशी गनिमी काव्याने मध्य भारतात इंग्रज सेनाधिका-यांना अगदी बेजार करून सोडले. उत्तर अलवर ते दक्षिणेला सातपुड्यातील बैतुल, पूर्वेला सागर ते पश्चिमेला छोटा उदयपूर एवढ्या मोठ्यामध्य भारताच्या प्रचंड टापूत जवळ जवळ एक डझन मोठे मोठे इंग्रज सेनाधिकारी त्याचा पाठलाग करीत होते. पण तात्याचे दर्शन सुद्धा त्यांना होत नव्हते. म्हणून इंग्रज सरकारने तात्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. पण एवढ्या मोठ्या रकमेच्या लोभाने कोणीही तात्याचा थांगपत्ता लागू देत नव्हता.
लढायांच्या काळात सैन्य आपल्या गावाकडे येत आहे. असे कळताच प्रत्येक गावातील सगळे लोक आपले सामान - सुमान घेऊन जंगलात पळून जात असत. त्यामुळे सैन्याला धान्य , किराणा इ. जिवनावश्यक पदार्थ मिळणे दुरापास्त होऊन जाई. आपल्या सैन्यावर तशी पाळी येऊ नये, म्हणून तात्याने रावसाहेब पेशव्याच्या नावे सा-या प्रजेसाठी एक जाहीरनामा काढून तो गावोगावी पोहचविण्याची व्यवस्था केली. या जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग असा -
" सर्व शहरे , लहानमोठी गावे खेडीपाडी येथील राहणारे मध्यम प्रतीचे लोक, व्यापारी , दुकानदार , लष्करी लोक व इतर सर्व प्रतीचे लोक यास कळविले जाते की, जयाचा झेंडा बरोबर बाळगून राजाच्या मुख्याबरोबर असणारी ही फौज इकडेस आली आहे. या देशात राहणा-या लोकांची खराबी करण्याकरीता ती ईकडे आलेली नाही. फक्त धर्मबाह्य पिरती लोयाच्या नाशाकरीता इथे आली आहे . या उपर कोणत्याही गावच्या लोकांनी ही फौज गावानजीक आली असता पळून जाऊ नये, या फौजेस ज्या सामानाची गरज लागेल, ते सामान शिरस्त्यापेक्षा काही जास्त किंमत ठरवून ज्या किंमतीने गावकरी लोकांकडून विकत घेतले जाईल. हा जाहीरनामा ज्या गावी जाऊन दाखल होईल, त्या गावच्या मुख्याने तो आपल्या आसपासच्या गावात पाठवून द्यावा म्हणजे जेणेकरून लोकांची सर्व भीती दूर होईल."
तात्याला पकडणे शक्य नाही, म्हणून इंग्रज सेनाधिका-यांनी त्याचे म्हातारे वडिल, त्याची पत्नी, मुलगा व मुलगी यांना अटक करून ग्वाल्हेरच्या भयाण किल्ल्यात नजर कैदेत ठेवून दिले. मध्य भारतात तात्या २० जून १८५८ ते मार्च १८५९ अखेर सुमारे ९-१० महीने अत्यंत वेगाने आपल्या सैन्यासह इंग्रज सैन्याला झुकांड्या देत घुमवित राहीला. त्याचा दरदिवसाचा वेग ५० मैलाच्या वर होता, तर इंग्रज सैन्य ४0 मैलांपेक्षा जास्त अंतर कापू शकत नव्हते. या काळात तात्याने एवढ्या मोठमोठ्या इंग्रज अधिका - यांना ३००० मैलाच्या वर पायपीट करायला लावली. पण तात्या त्याच्या हाती लागला नाही. म्हणून त्यांनी फितुर शोधायला सुरुवात केली.
२१ जानेवारी १८ ५९ रोजी तात्याने रावसाहेब पेशवे व फिरोजशहा यांच्यासह अलवर जवळील शिक्कारा ( सीकर ) या गावाजवळ इंग्रज सेनापती कर्नल मीड याच्याशी शेवटची झुंज दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. रावसाहेब पेशवे नेपाळात निघून गेले व फिरोजशहा इराणकडे निघाला. आता तात्याकडे फारच थोडे सैन्य राहिले. त्याने त्या सैन्यालाही रजा दिली व तो तीन चांगले घोड़े, एक तट्टू, रामराव व नारायण हे दोन ब्राहाण आचारी आणि गोविंद हा मोतद्दार यांच्या सह परोणच्या जंगलात एका सुरक्षित स्थानी निघून गेला.
त्याचा जुना मित्र मानसिंह हा राजपूत जवळच होता. त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर मानसिंग जातांना म्हणाला , “ मी थोडेसे शिपाई, काही दारूगोळा व अन्नसामग्री घेऊन दोन - तीन दिवसात तुझ्या मदतीला येतो." मानसिंहाची जहागीर ग्वाल्हेरच्या राजाने काढून घेतली होती. ती कशी मिळवावी या चिंतेत तो होता. हे कर्नल मीडला समजले होते. म्हणून मीडने त्याला बोलावून घेतले व त्याला ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडून अलवरची जहागीरी मिळवून देण्याचे मधाचे बोट त्याला लावले. त्या बदल्यात तात्या टोपे याला पकडून देण्याचे वचन मीडने त्याच्याकडून घेतले.
तात्याला विश्रांती मिळाल्यामुळे तो आता ठाकठिक झाला होता. सिरोज जवळच्या विद्रोही सैन्याला व शिवपुरच्या एक हजार विद्रोही सैन्याला जाऊन मिळण्याच्या व त्यांच्या साह्याने पुन्हा इंग्रजाविरूद्ध लढण्याचा तात्याचा विचार होता. तशी त्यांच्यात निरोपानिरोपी चालू होती. तो मानसिंहाची वाट पाहात परोणच्या जंगलात थांबला होता. पण मानसिंहाने त्याला दगा दिला ७ एप्रिल १८५९ च्या मध्यरात्री तात्या गाढ झोपेत असताना मानसिंह काही इंग्रज सैनिक घेऊन गुपचूप तात्याच्या मुक्कामी आला व त्याने तात्याला पकडून दिले. त्याआधी त्या सैनिकांनी तात्याची सर्व शस्त्रे हस्तगत केली होती. तात्याची त्यांनी झडती घेतली. तेव्हा तात्याजवळ सोन्याची तीन कडी, एक तांब्याचे कडे, १०८ मोहरांची पिशवी सापडली. तात्यांचे हुजरे मात्र तात्यांचे सर्व कागदपत्र घेऊन निसटून गेले. १०८ मोहरांपैकी ९७ मोहरा मीडने मानसिंहला दिल्या. बाकीच्या २१ मोहरा तात्याला पकडणा-या शिपायाःना वाटून दिल्या.
१० एप्रिल १८५९ रोजी इंग्रजांच्या मुशैरी छावणीत तात्यांचे शेवटचे वक्तव्य लिहून घेण्यात आले. तात्याने त्यात आपली आत्मकहाणी सांगितली आहे. ती फार विस्तृत आहे. तात्याला शिप्री येथल्या मीडच्या छावणीतील सैनिकी न्यायालयापुढे १४ एप्रिल १८५९ रोजीच उभे करण्यात आले. तीन दिवस तात्याची चौकशी चालली. त्या न्यायालयात तात्याने स्पष्टपणे सांगितले, "मी जे जे काही केले ते माझे धनी नानासाहेब पेशवे यांच्या आज्ञेनुसार केले. काल्पीपर्यंत मी त्यांच्या हाताखाली वागलो. तेथून पुढे रावसाहेबांच्या आज्ञा पाळल्या. न्याय्ययुद्धातल्या व्यतिरिक्त किंवा लढाई व्यतिरिक्त मी किंवा नानांनी एकाही युरोपियन माणसाला किंवा स्त्रीला ठार मारले नाही किंवा फाशी दिले नाही. कुठलाही साक्षीपुरावा देण्याची माझी नाही. मी तुमच्या विरूद्ध युद्ध खेळलो आहे म्हणून मला पक्के माहीत आहे की, आता मला मरणाला सिद्ध झाले पाहिजे. कोणतेही न्यायालय नको आहे व त्यामध्ये मला कोणताच भाग घ्यावयाचा नाही."

१७ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशीची शिक्षा सुनविण्यात आली. तेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा तात्या म्हणाला, माझ्या वृद्ध आईवडिलांचा माझ्या कृत्याशी कोणताच संबंध नाही. म्हणून त्यांना माझ्याकरीता कोणताही त्रास देऊ नये." नंतर बेड्या घातलेले हात उंचावून तात्या धीरगंभीरपणे म्हणाला, आता मला एकच आशा आहे की, या शृंखलांतून मुक्त होण्यासाठी मला एक तर तोफेच्या तोंडी द्यावे किंवा फासावर लटकविले जावे.
नंतर तात्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले. त्याने शेजारच्या मांगाकडे एक दृष्टीक्षेप टाकला व तो शांतपणे पाय-या चढून वर आला. सभोवारच्या इंग्रजांकडे तुच्छतेने दृष्टी टाकून त्याने आपल्या हाताने स्वतः ची मान फाशीच्या दोराच्या फासात अडकविली. त्याच्या पायाखालची फळी काढून घेताच एका क्षणापूर्वी तरतरीत व तेजस्वी दिसणारे तात्याचे रुबाबदार व बांधेसुद शरीर क्षणार्धात अचेतन होऊन लोंबकळू लागले. झाले ! स्वातंत्र्य युद्धातले चैतन्यच हरपले .
तात्या मध्यम उंचीचा, निमगोरा, धट्टाकट्टा, भव्य कपाळ असलेला, उंच व सरळ नाक असलेला, काळेभोर डोळे व कमानदार भुवया असलेला, भेदक नजर असलेला तो वीर मातृभूमीच्या कुशीत विलीन झाला. त्याच्या चेह-यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्याचा चेहरा पाहताच हा मोठा कर्तबगार पुरूष आहे, असे सर्वांना वाटायचे. तात्याला उर्दू, हिंदी, मराठी, संस्कृत या भाषांचे चांगले ज्ञान होते. सही करण्याइतके इंग्रजी त्याला येत होते. ताचे बाळबोध व मोडी अक्षर वळणदार होते. त्याचा पोशाख साधा होता. खांद्यावर काश्मिरी शाल व कमरेला तलवार आणि कुकरी असायची.
स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सोशीत, इंग्रज सेनाधिका-यांना सळो की पळो करीत हा अत्यंत स्वाभिमानी वीर योद्धा अखेर विश्वासघाताने प्राणांना मुकला.


मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे ज्या ठिकाणी तात्यांना फाशी देण्यात आली तेथे तात्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 स्वातंत्र्य वेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

संकलित माहिती



आगामी झालेले