नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

भगिनी निवेदिता

*🙏भगिनी निवेदिता🙏🌴*

*जन्म:-* २८ ऑक्टोबर १८६७* (डेंगानेन,आयरलैण्ड)

*मृत्यू:- १३ ऑक्टोबर १९११* (दार्जिलिंग, भारत)  

या लेखिका,शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले. उत्तर आयर्लंड येथे मार्गारेटचा जन्म झाला. (सन २०१६-१७ हे निवेदितांचे जन्मशताब्दी वर्ष होते.) नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते. मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मेंचेस्टर येथे झाले. स्वदेशाविषयी प्रेम, स्वदेश स्वातंत्र्याविषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम तिच्या मनावर होत होता. वडिलांच्या निधनानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीत लंडन येथे आली व शिक्षिका म्हणून काम करू लागली. हसत-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे तिचे लक्ष वेधले गेले आणि तिने त्याचा सखोल अभ्यास केला. शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी तिने 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रिय सहभागही घेतला. इ.स. १८९४ च्या सुमारास क्रांतिकार्यासाठी 'सिनफेन' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेटने त्याचे सदस्यत्व घेतले.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागली. तिला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. आणि त्यामुळेच ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली. मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजीना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेटने प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली. २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आली. दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांचे आशीर्वाद तिला आणि स्वामींच्या अन्य परदेशी महिला शिष्याना लाभले. २९ मार्च १८९८ ला मार्गारेटला दीक्षा लाभली .स्वामीजींनी तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली ! स्वामाजीनी तिला सांगितले होते ही हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितानी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे तिचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.

इ.स. १८९८मध्ये मध्ये कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांतील विविध संकल्पना स्वामीजी तिला उलगडून दाखवीत होते. नोव्हेंबर १८९८ मध्ये शारदामाता यांच्या हस्ते निवेदितांच्या बालिका विद्यालयाचे उद्‌घाटन झाले. लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलीना काय काय शिकविले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र व व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. निवेदिताने कलकत्त्यातील विद्वान लोकांच्या ओळखी करून घेतल्या. ती समाजात देत असलेली व्याख्याने हे या ओळखीचे साधन ठरले. तिने 'काली' या विषयावर दिलेल्या व्याख्यानाने तर ती समाजात प्रसिद्ध झाली आणि हिंदू धर्म तिने अंतर्बाह्य स्वीकारला आहे याची समाजातील लोकांनाही जाणीव झाली. निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असे. नैष्ठिक ब्रह्मचारिणी दीक्षा तिला मार्च १८९९ मध्ये प्राप्त झाली त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी तिला सांगितले की "मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण". सन १९०१ पासून निवेदितांनी हिंदुस्थानासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात. त्यांचे हे सर्व कार्य पाहून १९०२ साली त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्रही देण्यात आले. परकीय म्हणून हा सत्कार नव्हता तर ही विदुषी स्त्री म्हणजे सर्व हिंदू समाजाच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावलेली हिंदू कन्या, धर्मभगिनी अशा भूमिकेतून झाला. या सर्व घटनाक्रमात निवेदिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची चिरविश्रांती. ४ जुलै १९०२ ला स्वामीजी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 'मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही' असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदिताने हाती घेतले. निवेदितांचे हे जहाल विचार आणि हालचाली ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या. मार्च १९०२ पासून सरकारतर्फे त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत राहू लागली. त्यांची पत्रे फोडली जाऊन वाचण्यात येऊ लागली. निवेदितानी 'आशिया खंडाचे ऐक्य', आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन ' अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. भारतभर चालू असलेल्या क्रांतिकार्याची ओळख आता निवेदितांना झाली होती. योगी अरविंद यांचाही क्रांतिकार्यात विशेष सहभाग होता. त्यांना भेटल्यावर निवेदिताने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा तर केलीच पण त्याच्या जोडीने एकत्रितपणे क्रांतिकार्याची धुराही सांभाळण्याचे ठरविले. अनुशीलन समितीची स्थापना झाल्यावर युवकांच्या गटाला क्रांतिकार्यासाठी निवेदिता मार्गदर्शन करीत. डॉन सोसायटीच्या माध्यमातूनही क्रांतिकार्य चाले. या कार्यातून बंगाली तरुणांना स्वदेशभक्तीचे शिक्षण दिले जाई. निवेदिता या गटालाही मार्गदर्शन करीत असत.आपल्या युवकांसमोर आणि हिंदुस्थानासमोरच आपल्या राष्ट्राचे चिह्न असावे या भूमिकेतून निवेदिताने एक वज्रचिह्न असलेला ध्वज तयार केला. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध्वज! स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तूंचा प्रसारही केला.

रवीन्द्रनाथ ठाकूर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू आणि अबला बसू, यासारख्या अनेक मंडळींशी निवेदितांचे अतिशय सौहार्दपूर्ण नाते होते. जगदीशचंद्र बसूंची मानसकन्या असे निवेदितांचे स्थान होते.Response in the Living and Non-Living हा बसूंचा पहिला ग्रंथ लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामी निवेदितांचे खूप साहाय्य झाले होते. निवेदितानी बसूंच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख लिहून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून दिली. बसूंच्या टिपणाच्या आधारे निवेदितांनी 'Plant Response as a Means of Physiological Investigation' हा ग्रंथ पूर्ण लिहिला.जगदीशचंद्र बसूंची 'Comparitive Electro-Psysiology', 'Researches on Irritability of Plants" ही पुस्तकेही निवेदितानेच लिहिली आहेत. {२}

भारतीय कलेतील प्राचीन परंपरा,पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य,सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या असे म्हणता येईल.पाश्चात्य कलेची परिमाणे लावून भारतीय कलेची समीक्षा करणे थांबले पाहिजे असे निवेदिताने आग्रहाने नोंदविले. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते.

१३ ऑक्टोबर १९११ रोजी निवेदिता यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपविला. निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे.{२} भगिनी निवेदिता यांचा विचार- कला, विज्ञान, शिक्षण उद्योग आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतूसाठी नव्हेत, तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर्उभारणीच्या हेतूसाठीच करायला हव्यात . [१] मातृभूमीच्या पुनर्घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.

चरित्रे आणि निवेदितांचे चिंतनविश्व संपादन करा

भगिनी निवेदिता यांच्याविषयीची काही पुस्तके :

अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)

कर्मयोगिनी निवेदिता -डॉ सुरेश शास्त्री

क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी

चिंतन भगिनी निवेदितांचे : कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)

चिंतन भगिनी निवेदितांचे : भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरुची पांडे)

चिंतन भगिनी निवेदितांचे : शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)

चिंतन भगिनी निवेदितांचे : स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)

भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)

भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)

भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)

भगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)

भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ' अश्विनी सोवनी)

भगिनी निवेदिता : संक्षिप्त चरित्र व कार्य (काशिनाथ विनायक कुलकर्णी).

भारताच्या पाऊलखुणांवर ... -डॉ. सुरुचि पांडे

विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)

शतरूपे निवेदिता -अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरुचि पांडे, डॉ.य.शं.लेले )                        

   🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

             *स्त्रोत पर माहिती

आगामी झालेले