नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
रविवार, ३ जुलै, २०२२
विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde
विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde
(स्वातंत्र्य सेनानी, समाज प्रबोधनाचे थोर शिल्पकार व मराठी कायदेतज्ज्ञ)
जन्म : ३ जुलै १९०९
मृत्यू : २२ मार्च २००४
बॕरिस्टर भाऊसाहेब तारकुंडे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते. बॅ. विठ्ठल महादेव उर्फ भाऊसाहेब तारकुंडे यांना असामान्य बुद्धिमत्तेचे देणं मिळालं होतं. १९२५ साली झालेल्या मुंबई इलाख्यातील मॅट्रिक परीक्षेत त्यावेळी ते पहिले आले होते. याशिवाय, त्या काळात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप त्यांनी पटकावली होती. बॅ. तारकुंडे यांना मिळालेल्या या जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपचे एक वैशिट्य असे की त्यांचे वर्गमित्र न्या. पी. डी. शिखरे व बॅ. तारकुंडे यां दोघांमध्ये ही स्कॉलरशिप विभागली होती.
भाऊसाहेब तारकुंडे यांचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य असं की सर्व मुंबई इलाख्यात उत्तीर्ण होउन देखील त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे मोठा ध्येयवाद होता. शेती हाच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून असतात. खरा भारत हा खेड्यापाड्यातून राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची सुधारणा करणं हेच भारतासमोरील मुख्य आव्हान आहे, या दृष्टीने त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या ९६ वर्षांच्या इतिहासात मॅट्रिक परीक्षेला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कृषि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले तारकुंडे हे पहिलेच व एकमेव विद्यार्थी होते. कृषि महाविद्यालयामध्ये शेवटच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांनी त्या वेळी गुणांचा इतका उच्चांक प्रस्थापित केला की २००४ सालापर्यंत त्यांचा हा उच्चांक कोणीही मोडू शकलेला नव्हता. असे अलौकिक बुद्धिमत्तेचे भाऊसाहेब नंतर १९२९ साली इंग्लंडला गेले. त्यांनी आय. सी. एस. व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु त्यांना सरकारी नोकरीत कसलाही रस नव्हता. त्यामुळे ते १९३२ साली बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भाऊसाहेब तारकुंडे हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, यात कसलीच शंका नाही. परंतु त्यांच्या या बुद्धिमत्तेला उदात्त ध्येयवादाचं अधिष्ठान मिळालं होतं. त्यामुळे ते आपलं व्यक्तिगत जीवन अर्थपूर्ण करू शकले. त्याचबरोबर राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांनी यथाशक्ती वाटा उचलला. १९३२ साली ते भारतात परत आले, त्यावेळी ते इंग्लंडमधील समाजवादी विचारांची दिशा घेऊनच आले होते.
१९३१ ते १९३५ या काळात सर्व जगभर ध्येयवादी तरुणांना समाजवादाचं, मार्क्सवादाचं आकर्षण निर्माण झालं होतं. याची बीजे त्या काळातील परिस्थितीमध्येच होती असं मला वाटतं. १९३० साली सर्व जगभर आर्थिक मंदीची लाट मोठ्या प्रमाणावर आली होती. त्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था एकां मोठ्या अरिष्टामध्ये सापडली होती. या मोठ्या आर्थिक मंदीच्या लाटेची बीजं भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेत होती. त्याचप्रमाणे, या काळात जर्मनी, इटलीमध्ये हिटलर, मुसोलिनी यांच्या रूपाने एका भयानक हुकूमशाहीचा उदय होऊ लागला होता. या हुकूमशाहीची बीजंदेखील आमच्या संसदीय लोकशाहीमधील मूलभूत दोषांमध्ये आहेत. आमची लोकशाही ही भांडवलशाहीच्या प्रभावाखाली वावरत आहे. भांडवलदार, कारखानदार यांच्या हातांतील ते एक हत्यार बनले होते. उलट याच काळात सोव्हियेत रशियातील कम्युनिझमचा लाल तारा निश्चितपणे प्रगती करत होता. त्यामुळे जगाला समाजवाद, मार्क्सवाद याशिवाय पर्याय नाही, अशी अनेकांची धारणा होती. या काळात भाऊसाहेब तारकुंडे यांच्या विचारावर समाजवाद, मार्क्सवादाच्या विचारांचा प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं.
शिवाय त्यांच्या संस्कारक्षम वयात प्रा. आगरकर यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा व निरीश्वरवादाचा प्रभाव पडलेला होता. प्रा. आगरकर यांच्या जीवनातील जळजळीत ध्येयवादाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं. देशातील सारं वातावरणच ध्येयवादाने झपाटलेलं होतं. याचा प्रभाव भाऊसाहेब तारकुंडे यांच्या मनावर पडला असावा, असा माझा कयास आहे. याच काळात नानासाहेब गोरे, र. के. खाडिलकर, एस. एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर, मधु लिमये, मधु दंडवते, ह. रा. महाजनी यांच्यासारख्या तरुणांवरया ध्येयवादाचा प्रभाव पडला होता. नंतरच्या काळात एस. एम, जोशी, नानासाहेब गोरे व त्यांचे सहकारी समाजवादाकडे आकृष्ट झाले. तरी त्यांच्या मनातील गांधीवादाचा प्रभाव जाणवत होता. भाऊसाहेब तारकुंडे गान्धीयुगाच्या प्रभावाच्या काळात वाढलेले असूनही त्यांच्या मनावर गांधीवादी विचारांचा प्रभाव पडलेला नव्हता असं दिसून येतं. उलट ते गांधीवादापासून दूरच होते. नंतर ते गांधीवादाचे टीकाकार बनले. १९३२ नंतरच्या काळात त्यांच्या मनावर समाजवादाचा व मार्क्सवादाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. १९३४ साली स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षाचे ते सभासद होते. नंतर १९३६ साली भाऊसाहेब हे एम एन रॉय यांच्या संपर्कात आले. एम एन रॉय यांच्या विचारांमुळे व असामान्य बुद्धिमत्तेमुळे भाऊसाहेब प्रभावित झाले आणि नंतर ते आयुष्यभर एम एन रॉय यांचे निष्ठावंत सहकारीच बनले. मार्क्सवादाचं त्यांना या काळात विलक्षण आकर्षण वाटत होतं, याचे कारण मार्क्सवादाच्या मागे प्रभावी अशी एक नैतिक प्रेरणा होती. मार्क्सचा कॅपिटल हा ग्रंथ अर्थशास्त्रावरचा नसून तो ख-या अर्थाने नीतिशास्त्रावरचा ग्रंथ आहे, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. परंतु त्यांना मार्क्सच्या आर्थिक सिद्धांताचं आकर्षण होतं. दुस-या महायुद्धानंतर विशेषतः १९४७ ते ४८ साली ते एम. एन. रॉय यांच्याबरोबर मार्क्सवादाच्या तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. मार्क्सवाद हा ठोकळेबाज सिद्धांताचा एक सांगाडा नाही तर मार्क्सवाद ही एक शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची पद्धती आहे, अशी त्यांची प्रांजळ धारणा झाली. त्यामुळेच ते मार्क्सवादाच्या पलीकडे जाउन त्यांनी एम. एन. रॉय यांच्या विज्ञाननिष्ठ मानवतावादाचा पुरस्कार केला. माणूस हा सर्व समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे व माणसाची प्रगती हाच कोणत्याही सामाजिक संस्थेचा मानदंड आहे, हे त्यांनी मान्य केलं.
भाऊसाहेब तारकुंडे हे १९५७ ते १९६९ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करीत होते. या काळात कायद्यातील बारीक सारीक कलमांपेक्षा न्यायाकडे अधिक लक्ष दिलं. या दृष्टीने त्यांच्या काळातील अनेक निकाल पुढील काळातील न्यायाधीशांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. तारकुंडे यांना निवृत्तीसाठी काही वर्षं शिल्लक होती व कदाचित दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जाण्याची शक्यता होती. परंतु समाज प्रबोधनाच्या कामासाठी त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला.
नंतर ते दिल्लीला समाजप्रबोधनाच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिससाठी गेले. भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा निष्ठेने जोपासला. आपली मतं इतरांना आवडत किंवा न आवडण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. निर्भयपणे ते आपले विचार मांडत असत. वैचारिक प्रांजळपणाने चालतंबोलतं रूप म्हणजे भाऊसाहेब तारकुंडे यांचं सारं जीवन होतं.
सत्ता व संपत्ती यांचं त्यांना कसलंही आकर्षण नव्हतं. १९७७ साली त्यांना केंद्र सरकारने राज्यपालपद देऊ केलं होतं, त्यांनी ते नम्रपणे नाकारलं. राजभवनापेक्षा सामान्य माणसामध्ये विचारप्रबोधनाचं काम महत्त्वाचं आहे अशी त्यांची धारणा होती. शिवाय सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतांना मिळवलेले लाखो रुपये त्यांनी देशभर विचारप्रबोधनाच्या कार्यासाठी खर्च केले. मोहन धारिया हे वनराईमार्फत ग्रामीण विकासाची कामं करीत आहेत, असं कळल्यावर त्यांनी स्वेच्छेने, मोहन धारिया यांना कसलीही कल्पना नसतांना, एक लाख रुपयांचा चेक देणगीदाखल पाठवला. त्याचप्रमाणे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम निष्ठेने करीत आहेत, हे लक्षात आल्यावर आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांनी नरेंद्र दाभोलकरांकडे एक लाख रुपयांची देणगी पाठवली. अशा अनेक देणग्या त्यांनी समाजप्रबोधन व ग्रामीण विकासाच्या कामासाठी दिलेल्या आहेत.
भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर काही उदात्त मूल्ये निष्ठेने जोपासली. मानवी स्वातंत्र्य, समता व मानवी हक्कांसाठी देशभर त्यांनी प्रचार केला. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील त्यांची राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा प्रबळ होती. मला आणखी १० वर्षं आयुष्य मिळालं पाहिजे, असं ते खाजगीत नेहमी म्हणत. भाऊसाहेब तारकुंडे म्हणजे जीवनातील उदात्त मूल्यांना समर्पित केलेलं असं श्रेष्ठ दर्जाचं जीवन होतं. त्यांच्या जीवनातील उदात्त ध्येयवादाची व जीवनमूल्यांची आजच्या काळात भारताला नितांत गरज आहे. भारतातील या अत्यंत थोर अशा सुपुत्राला व समाजप्रबोधनाच्या शिल्पकाराला मी विनम्र भावाने अभिवादन करतो.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 विनम्र अभिवादन🙏
आगामी झालेले
-
विद्यार्थी दिवस Students Day in Maharashtra हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. ७ नोव...
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा