नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, १३ मे, २०२०

शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस

 रोनाल्ड राॅस

जन्मदिन - १३ मे १८५३
मलेरिया हा रोग डासांच्या प्रादुर्भावाने होतो याचा शोध लावला
हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचा आज जन्मदिन..
-----------------------------------------------
रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते. रोनाल्ड रॉस यांचा जन्म भारतात अलमोडा येथे १८५७ साली झाला. यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.वैद्यकीय पदवी मिळवल्यावर रॉस यांनी भारतीय सेनादलात मेडिकल ऑफिसर म्हणून प्रवेश घेतला. मॅन्सन यांच्या डासांवरील संशोधनाने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानात परतले. येथील सिकंदराबाद, हैदराबाद व कलकत्ता येथे प्रयोग करायला सुरुवात केली.
मलेरिया हा रोग ‘प्लाझ्‌मोडियम्’ या सूक्ष्म जंतूपासून होतो, हे लव्हेरान यांनी सिद्ध केलं होतंच. पण, याची प्रसारयंत्रणा कशी आहे, याची सुतराम कल्पना नव्हती. इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. यातून प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले. इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. २० ऑगस्ट १८९७ रोजी रॉस यांनी या जंतूंचा प्रसार ‘ऍनोफेलिस’ जातीच्या डासांची मादी रुग्णाचे रक्त शोषून घेत इतर माणसांच्या शरीरात सोडते व रोग पसरतो, हे प्रतिपादित केले. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले. या संशोधनामुळे ब्रिटिश-राज खूपच आनंदित व प्रभावित झाले. रॉस यांचा ठिकठिकाणी सत्कार झाला तसेच १९५७ पासून २० ऑगस्ट हा दिवस ‘मलेरिया दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.  ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना ‘सर’ हा किताब दिला तसेच १९०२ मध्ये डॉ. रोनाल्ड रॉस यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकदेखील मिळाले!
या संशोधनामुळे उत्साहित होत इंग्लड व अमेरिका या दोन्ही देशांत डासांविरुद्ध युद्धस्तरावर मोहीम सुरू झाली. दलदलीचे भाग नष्ट करणे, सांडपाण्याच्या नाल्या व साठलेल्या पाण्याची डबकी नाहीशी करणे, प्रतिकारक लोशन्सचा भडिमार करणे इत्यादी प्रयत्नांमुळे या दोन्ही देशांनी मलेरियाचा परिणामकारक पाडाव करण्यात यश मिळवले. या शोधानंतर विविध शास्त्रज्ञांनी प्लासमोडियम मलेरिया, प्लासमोडियम फेल्सीपेरम, प्लासमोडियम वाइवॉक्स आणि प्लासमोडियम ओवेल हे मलेरियाचे चार प्रकार शोधून काढले. प्लासमोडियम फेल्सीपेरम मलेरिया हा सर्वात धोकादायक आहे. जसजसे विविध प्रकारच्या मलेरियाचे शोध लागले तसे क्लोरोक्वीन, मेफ्लोक्वीन, हॅलोफॅट्रीन, क्विनीन, आणि आरटेसुनेट ही औषधे निर्माण करण्यात आली.
मलेरिया हे नाव अठराव्या शतकात पडलं. (मल= वाईट व अरिया= एअर) आपल्याकडे याला हिवताप अथवा शीतज्वरदेखील म्हणतात. ‘क्विनिन’ हे अत्यंत कडू असलेले औषध सतराव्या शतकापासूनच या तापावर वापरले जायचे. हे औषध पेरू देशातील सिंकोना या झाडाच्या सालीचा अर्क आहे. सिंकोना हे नाव झाडाला देण्यात एक मजेशीर योगायोग आहे. ‘चिंचोन’ येथील (स्पेन) राणी आपल्या नवर्‍यासह पेरू येथे आली असता तिचा नवरा हिवतापाने आजारी पडला. तेथील ‘क्विना-क्विना’ झाडाच्या सालीच्या अर्कामुळे नवरा बरा झाला म्हणून त्या झाडाला ‘सिंकोना’ असे नाव पडले! दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास सैनिकांना मलेरियाचा त्रास होऊ नये म्हणून जर्मन शास्त्रज्ञांनी ‘मेपाक्रीन’ म्हणून औषध काढले. त्या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. पण, कुणीतरी कंडी पिकवली की, या औषधामुळे नपुंसकत्व येते. झाले! सैनिकांनी गोळ्या घेणं थांबवलं! जर्मन सरकारने शेवटी जनानखाने बागळणार्‍या मुस्लिम शेख यांना गोळ्या घेताना दाखवून सैनिकांच्या मनातील भीती घालवली.
'डास’ यासारखा छोटासा कीटकदेखील किती अनर्थ करू शकतो, याची कल्पना आल्यावर अंगावर शहारे येतात. जुन्या काळी ‘मलेरिया’ हा मानवजातीचा एक प्रमुख शत्रू होता. तुम्हाला वाचून आश्‍चर्य वाटेल की, अतिप्राचीन काळी (सी.ए.डी. ५००) भारतातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य सुश्रूत ऋषी यांनी शंका व्यक्त केली होती की, मलेरिया (हिवताप) हा रोग हवेतून न पसरता उष्ण, दमट वातावरणात घोंगावणार्‍या डासांपासून होतो! यावरूनच सुश्रूत ऋषींच्या सखोल ज्ञानाची व द्रष्टेपणाची कल्पना येते. हीच गोष्ट सिद्ध करायला जगभरातील संशोधकांना हजारो वर्षे लागली! धन्य ते सुश्रूत ऋषी व धन्य आपला भारत!
संकलित माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले