नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०
क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे Vishnu Ganesh Pingle
क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे
Vishnu Ganesh Pingle
The Unsung Hero from Maharashtra
जन्म : 2 जानेवारी 1888 (तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)
फाशी : 16 नोव्हेंबर 1915 (लाहोर कारागृह, पाकीस्तान)
स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले. शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.
सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, “हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!
🇮🇳 जयहिंद🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
संकलित माहिती
आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे Maharshi Vitthal Ramaji Shinde जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, कर्नाटक) मृत्यू : २ जानेवारी १९४४ (पुणे, महारा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा