नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, १० मे, २०२०

जलसंधारण दिन


🌌10 मे 💥💦जलसंधारण दिन💥
भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचे वर्णन “तळ्यांचा देश” असे केले आहे. यावरुन आपल्या पुर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्या काळातच जाणले होते, याचा प्रत्यय येतो. पण, एकेकाळी “सुजलाम् सुफलाम्” असणाऱ्या आपल्या देशाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी जालीम उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे *“जलसंधारण”*
जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत.
पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणे, यासाठी लहान मोठी धरणे बांधली जातात. दुसरा भाग अर्थात पाण्याची भूगर्भात साठवण करणे, यासाठी पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाची कामे केली जातात. तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्याने शेत जमिनीवरील कसदार सुपीक मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून मृद संधारणाची कामे केली जातात. पावसाद्वारे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणे हे जल संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे चांगले भूजल साठे राज्याच्या सर्वदूर क्षेत्रात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचन व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. ही कामे सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्राबाहेरील जमिनीसाठी अत्यावश्यक आहेत. जे राज्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्राच्या अंदाजे सत्तर टक्के आहे. यावरून पाणलोट क्षेत्र विकास आणि जल संधारणाच्या कामाचे महत्व लक्षात येईल. आज महाराष्ट्र शासनाचा भर या जलसंधाणाच्या कामांना गती देण्याचा आहे. म्हणजे अजून यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आणि मूल्यमापन यंत्रणा नसल्यामुळे त्यातून काय लाभ होणार हे कळण्याची सोय नाही. पुढील काळात पाणलोट क्षेत्र विकासाच्या व भूजलच्या कामांसाठी केळकर समितीने ३०६५९ कोटीची तरतुद सुचविली आहे. असे म्हटले जाते की, राज्यात १२६ लाख हेक्टर्स क्षेत्रावर कामे झाली आहेत. त्यापासून ३१ लाख हेक्टर सिंचन समता निर्माण होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. ही कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत, असे समितीने नमुद केले आहे. जलसंधारणाची कामे पाणलोट क्षेत्र निहाय नियोजन पूर्वक तंत्रशुद्ध पद्धतीने होऊन त्या कामांची योग्य ती देखभाल आणि सातत्याने मूल्यमापन होत राहणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात मा.नाना पाटेकर व मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. या दोन्हीला भरघोस प्रतीसाद मिळतो.
आपण घरच्या घरी सुध्दा जलसंधारण करु शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग
शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकते.
जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सर किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो. हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका
पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
आज “जलसंधारण दिना निमीत्त आपणही संकल्प करुया पावसाचा थेंब न थेंब वाचवायचा….
======================
स्रोतपर संकलित माहिती





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले