नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, ९ मे, २०२०

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन World Migratory Bird Day

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती.......
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 
World Migratory Bird Day
दरवर्षी हा दिवस १४ मे किंवा दुस-या आठवड्यातील शेवटच्या दिवशी साजरा करतात.
पृथ्वीच्या कलण्यामुळे ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणा-या थंडीपासून सुटण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून, आपल्याकडे म्हणजे कटिबंधीय उष्ण प्रदेशात साधारण २ महिन्यांसाठी येतात. जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  स्थलांतरित पक्ष्यांविषयी जागरूकता आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व या दिवसाचे उद्दीष्ट आहे. जगातील सर्व पक्षी एकाच दिवशी अर्थातच स्थलांतर करीत नाहीत. हा दिवस, २००६ सालापासून, मे महिन्याच्या दुस-या आठवड्याच्या शेवटचा दिवशी साजरा केला जात असतो. स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होणे ही बाब येथे महत्त्वाची ठरते. पक्ष्यांच्या स्थलांतराचे कुतूहल साऱ्यांनाच असते. पक्ष्यांचा स्थलांतर करण्याचा मार्ग, दिशा कशी ठरत असेल? सकाळी सूर्य, तर रात्री चंद्र-तारे, तसेच नद्या, जंगल असे भौगोलिक घटक या पक्ष्यांना मार्ग आणि दिशा दाखवत असतात. काही पक्ष्यांना आनुवंशिकतेमुळे स्थलांतराचे मार्ग माहिती होतात.
हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान असल्यामुळे पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती आणि कीटक बर्फाखाली जातात. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित प्रदेशाकडे स्थलांतर करतात. वातावरणीय बदल आणि अन्नाची उणीव या मुख्य कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात. आपल्याकडे थंडी असली तरी ध्रुवीय प्रदेशांपेक्षा कमी असते आणि अन्नाची मुबलकता यामुळे हे पक्षी हजारो मैल अंतर कापून इथे येतात, काही काळ थांबून परत आपापल्या प्रदेशात जातात.
भारतातील अन्य प्रदेशांप्रमाणे जंगल, गवताळ प्रदेश, किनारपट्टी, समुद्र, मिठागरे, धरणे, नद्या, खाडी, भात खाचरे, ओहोटीचे प्रदेश, उथळ दलदलीच्या जागा अशा अनेकविध अधिवासांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातदेखील अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. बहुतेक पक्षी स्थलांतरासाठी प्रजनन-स्थानाशी जवळीक साधणारे भौगोलिक स्थान, हवामान आणि पर्जन्यमान यांवर आधारित भूप्रदेशाची निवड करतात. बर्ड रिंगिंग आणि जीपीएस ट्रान्समीटरच्या विंग टॅगिंग अशा नवीन तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
गेल्या काही दशकांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासांवर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. शेतीतील कीटकनाशकांचा असुरक्षित वापर, मानवनिर्मित वस्तूंशी होणारी टक्कर आणि हवामान बदल यांसारख्या इतर धोक्यांचा स्थलांतरित पक्ष्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ साजरा करण्यात येतो. या वर्षी हा दिवस उद्या, ९ मे रोजी साजरा होत आहे. ‘द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीज्’, ‘द आफ्रिकन-युरेशियन वॉटरबर्ड अ‍ॅग्रीमेंट’ आणि ‘इन्व्हायर्न्मेंट फॉर द अमेरिकाज्’ या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून यंदा हा दिवस साजरा करण्याचे संकल्प-सूत्र आहे- ‘बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड’! पक्ष्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया अविरत आणि अखंड चालू राहण्यासाठी त्यांचे स्थलांतरित होण्याचे अधिवास सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठी त्या त्या देशाच्या पर्यावरण धोरणात याचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे, एक प्रकारे देशांना जोडण्याचे काम करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे झाले आहे.
संकलित माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले