भुलाबाईची गाणी Bhulabai Songs
(संकलित माहिती)
महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.
भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपऱ्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.
गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. १६ वर्षांखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते. भुलाबाई हा सृजनाचा विधी असतो. भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.
विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात. या उत्सवामध्ये ज्यांच्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाईच माहेर आणि ज्या मुली गाणी म्हणतात त्या मुलींना जणू काही भुलाबाईने आपल्या सासुरवासाच्या सर्व कथा तेथील त्रास, आनंद सगळा स्वत: प्रत्यक्ष सांगितला आहे. आणि या मुली भुलाबाईच्या प्रतिनिधी म्हणून जणू काही सगळयांना त्या कथा गीतांद्वारे सांगत आहे असे वाटते. या लोककथा-गीत कला प्रकारात कुठल्या ही प्रकारचे वाद्य वाजविले जात नाही, परंतु मुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन ही गाणी म्हणतात. व ती खूपच दूतगतीने म्हटली जातात.
१….
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
१….
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली
सरपा आड लपली
सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय
चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या
जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे
२….
आपे दूssध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुssलाबाई
साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा कssरपली
नंदा गं लपली
नंदाचा बैल
डोलत येईल
सोन्याच कारलं
झेलत येईल
३….
घरावर घर बत्तीस घर
इतका कारागीर कोणाचा
भुलोजी च्या राणीचा
भूलोजीची राणी
भरत होती पाणी
धावा धावा कोणी
धावतील तिचे दोनी
दोनी गेले ताकाला
विंचू चावला नाकाला
४….
नंदा भावजया दोघी जणी
दोघी जणी
घरात नाही तिसर कोणी
तिसर कोणी
शिक्यातल लोणी खाल्ल कोणी
तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी
आता माझे दादा येतील गं येतील गं
दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं
दादाची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव काठी
घरा घराची लक्ष्मी मोठी
५….
काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
६….
नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
७….
आला गं सासरचा वैद्दय
हातात काठी जळक लाकूड
पायात जोडा फाटका तुटका
नेसायचं धोतर फाटक तुटक
अंगात सदरा मळलेला
डोक्यात टोपी फाटकी तुटकी
तोंडात विडा शेणाचा
कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी
गं बाई म्हायरावाणी
आला गं माहेरचा वैद्दय
हातात काठी पंचरंगी
पायात जोडा पुण्यशाई
नेसायचं धोतर जरीकाठी
अंगात सदरा मलमलचा
डोक्यात टोपी भरजरी
तोंडात विडा लालेला
कसा गं दिसतो बाई राजावाणी
गं बाई राजावाणी
८….
सा बाई सू sss सा बाई सू sss
बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू
कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी
खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी
काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय
कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर
डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल माझ्या पार्वतीलाss पार्वतीला
९….
काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी
जाईच तेल आणू कशी आणू कss शी
जाईच तेल आणल आणल
सासूबाईच न्हाण झाल
वन्साबाईची वेणी झाली
मामाजीची शेंडी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
रानोबाचा पाय पडला
सासूबाई सासूबाई अन्न द्या
दुधभात जेवायला द्या
आमच उष्ट तुम्ही खा
विडा घेऊन खेळायला जा
१०….
आमचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिक्कण सुपारी सुपारी
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेले गडगडत गडगडत
मामा आले बडबडत बडबडत
सुपारी गेली फुटून फुटून
मामा आले उठून उठून
११….
अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई
जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई
गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई
रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई
करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई
तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई
शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई
खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई
कोंडू कोंडू मारीते …
१२….
कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला
मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला
दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला
जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला
वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला
भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला
पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही
आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा
१३….
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
सासू गेली समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझी घोडागाडी देतो तुम्हाला
तुमची घोडागाडी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
………………………….
………………………
………………. …………………
पतीराज गेले समजावयाला
चला चला राणीसाहेब अपुल्या घराला
माझा लाल चाबूक देतो तुम्हाला
तुमचा लाल चाबूक हवा मजला
मी तर यायची अपुल्या घराला
यादवरा या राणी घरात आली कैसी
१४….
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला
हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
..................................................
.................................................
१५….
झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई
चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
………………………………
.........................................
झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई
चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
१६….
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
चिंचा बहुत लागल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।१।।
...........................................
दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
पेरू बहुत लागले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।२।।
.................................................
तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
संत्री बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।३।।
..................................................
चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
मोसंबी बहुत पिकल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।४।।
..................................................
पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
डाळिंब बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।५।।
..................................................
सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
द्राक्ष बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।६।।
..................................................
सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
आंबे बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।७।।
..................................................
आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
खरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।८।।
..................................................
नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
टरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।९।।
१७-….
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता
हन्मंताचे --------------------------
---------------येता जाता कंबर मोडी
नीज रे नीज रे तान्ह्या बाळा
मी तर जातो सोनार वाडा
सोनार वाड्यातून काय काय आणले
----------------------------------------
एक गेला खारीला एक गेला खोबरीला
खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल
आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची
बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची
पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई
तामण बाई तामण अस कस तामण
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता
.................................................. …………………।
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला
भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला
आणा आणा पारीस उगळा उगळा काथ
आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस
शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे
बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा
आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन
१८- ……
हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर
मगरच्या राजाने शाळा मस्त केली
शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे
एवढ्या रातरी धून कोण धुते
धून धुय ग बाई चंदन गोटयावरी
वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी
आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी
आपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे
रव्याचे भाऊ वाणीला गेले
एक गेला खारीला एक गेला खोबरीला
खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल
आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची
बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची
पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई
तामण बाई तामण अस कस तामण
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता
……………………………………………………
…………………………… ………………………
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला
भूलोजीला लेक झाली नाव ठेवा सरला
आणा आणा पारीस उगळा उगळा काथ
आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस
शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे
बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा
आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन