नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

पद्मभूषण उषा मेहता Usha Mehta


पद्मभूषण उषा मेहता 
(चलेजाव आंदोलनात ब्रिटिशांना चकवून रेडिओ चालवणारी अवघी २२ वर्षांची स्वातंत्र्यसैनिक!!)
 जन्म : २५ मार्च १९२० 
मृत्यू : ११ आॕगष्ट २०००

आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास फार दैदिप्यमान आहे. भारत देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी अपरंपार कष्ट भोगले, शिक्षा सहन केल्या, प्रसंगी प्राणाची आहुतीसुद्धा दिली, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला.

ब्रिटिशांविरुद्ध लढणे हे सोपे काम नव्हते. आपण पाठ्यपुस्तकातून आणि इतर अवांतर वाचनातून विविध मार्गांनी सत्तेविरुद्ध कसा लढा दिला गेला याची वर्णने वाचली असतील. कुणी हिंसेच्या मार्गाने गेले तर कुणी अहिंसेच्या… मार्ग वेगळे असले तरी उद्दिष्ट एकच होते- ते म्हणजे स्वातंत्र्य! पण मंडळी, काही जणांनी अत्यंत वेगळ्या मार्गाने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज आपण अशाच एका निडर आणि धाडसी महिलेची आगळी वेगळी कहाणी जाणून घेणार आहोत.

तो दिवस होता २७ ऑगस्ट १९४२. त्या दिवशी रेडिओ मधून अचानक एक आवाज आला आणि सर्वांचे कान टवकारले गेले. . धिस इज काँग्रेस रेडिओ कॉलिंग ऑन वेव्हलेंग्थ 42.34 मीटर्स फ्रॉम समव्हेअर इन इंडिया.”

हा आवाज कानी पडताच भारतीय मंडळी खुश झाली, तर ब्रिटिश लोक हादरून गेले! असं काय त्यात विशेष होतं ज्याने इतकी खळबळ माजावी? तर ते दिवस होते ‘चले जाव’ चळवळीचे! भारतीयांची स्वातंत्र्याची मागणी जोर पकडत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी टोकाची दडपशाही सुरू केली होती. दिसेल त्या नेत्याची धरपकड होऊन त्यांना अटक केली जात होती. सर्व महत्वाचे नेते तुरुंगात बंद होते आणि बरेचसे नेते भूमिगत होऊन कार्य करत होते. या अशा निर्णायकी परिस्थितीत आकाशवाणीवर कुणी भारतीय स्वतःचे केंद्र सुरू करून लोकांना आवाहन करत असेल तर चर्चा तर होणारच!

आजच्या काळात असंख्य रेडिओ चॅनेल्स आणि त्यावर रात्रंदिवस बडबड करणारे आर.जे. आपल्या अंगवळणी पडले आहेत. मात्र त्या काळाची कल्पना करून बघा… दडपशाहीच्या वातावरणात एवढे मोठे धाडस करण्याची हिंमत कुणाची झाली? जो तो चर्चा करू लागला. मंडळी तो आवाज होता उषा मेहता या मुलीचा! आणि हे धाडस करण्यात पुढाकार सुद्धा तिनेच घेतला होता. कोण होती ही उषा मेहता? उषा मेहतांचा जन्म गुजरात मध्ये १९२० साली झाला. अगदी लहान वयात तिची आणि महात्मा गांधींची भेट झाली. गांधीजींच्या विचाराने लहानगी उषा प्रभावित झाली. अवघ्या आठव्या वर्षी रस्त्यावर उतरून तिने ‘सायमन गो बॅक’ च्या घोषणा दिल्या होत्या. नंतर तिचे वडील कुटुंबाला घेऊन मुंबईला स्थायिक झाले. १९३९ मध्ये उषाने फिलॉसॉफी पदवी प्राप्त केली खरी, पण तिचे मन शिक्षणापेक्षा स्वातंत्र्य चळवळीकडे जास्त ओढले जात होते.

९ ऑगस्ट १९४२ रोजी पूर्ण स्वातंत्र्य ही मागणी करून काँग्रेसने ब्रिटिशांविरोधात चले जाव चळवळ सुरू करण्याची घोषणा केली आणि त्याच वेळी उषाने ठरवलं की आता बस्स! आता शिक्षण सोडून चळवळीत सहभाग घेण्याची वेळ आली आहे! आणि इथेच ‘काँग्रेस रेडिओ’ ची कल्पना जन्माला आली. एके दिवशी तिने पालकांना सांगून घर सोडले आणि दुसऱ्याच दिवशी तिचा आवाज रेडिओवर ब्रॉडकास्ट झाला. एका अर्थाने उषाला भारताची पहिली आर.जे. म्हणायला हरकत नाही. मुळात रेडिओ स्टेशन चालवणे म्हणजे अत्यंत कठीण काम. या स्टेशनचा सेटअप करण्यात मदत झाली ती नानक मोटवानी यांची. नानक हे शिकागो रेडिओचे मालक होते. स्टेशनची सामुग्री आणि तंत्रज्ञ त्यांनीच उपलब्ध करून दिले. या कामात उषाचे सहकारी होते विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी आणि बाबूभाई ठक्कर. रेडिओ स्टेशनची सुरुवात तर झालीच होती. पण याचे मुख्य कार्य होते ते नेत्यांची भाषणे आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे.

त्या वेळी ब्रिटिशांनी बातम्यांवर सेन्सॉरशिप लादली होती. लोकांपर्यंत बातम्या पोहोचत नसत. ही पोकळी भरून काढण्याचे काम काँग्रेस रेडिओने केलेच, पण त्यापेक्षा महत्वाचे काम म्हणजे लोकांच्या मरगळलेल्या मनात नवचैतन्य फुंकण्याचे केले होते. या स्टेशनमुळे लोकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आणि परत एकदा लोक चळवळीत नव्या उत्साहाने सक्रिय झाले. काँग्रेस रेडिओवर डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास यासारख्या दिग्गज नेत्यांची भाषणे सुरू असायची. त्यासोबतच गांधीजींनी देशाला दिलेले संदेश आणि देशभक्तीपर गीते लावली जायची. आता हे सगळं सुरू असताना ब्रिटिश अधिकारी गप्प बसतील काय? त्यांनी हे भूमिगत स्टेशन शोधायचा चंग बांधला. स्टेशन कुठे आहे हे शोधायचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. अर्थात उषा मेहता आणि सहकाऱ्यांना याची कल्पना होतीच. त्यांनी यावर एक अफाट नामी शक्कल लढवली होती. त्यांनी स्टेशन एका जागी ठेवलेच नाही! कुठलेही प्रसारण झाले की स्टेशन नवीन जागी हलवले जायचे. या स्टेशनने अनेक जागा बदलून प्रसारण सुरूच ठेवले होते. या कामी मुंबईच्या देशभक्त व्यापाऱ्यांची त्यांना मदत झाली. पहिले प्रसारण चौपाटीच्या जवळ असणाऱ्या एका इमारतीमधून केले गेले. नंतर रतन महाल वाळकेश्वर रोड येथे नेले गेले. त्यानंतर अजित व्हिला लॅबरनम रोड, लक्ष्मी भुवन सँडहर्स्ट रोड, पारेख वाडी बिल्डिंग गिरगाव अशा अनेक जागांवरून त्यांनी प्रसारण सुरूच ठेवले. जवळपास तीन महिने, म्हणजे एकूण ८८ दिवस हे स्टेशन आपले काम चोख बजावत होते. शेवटी एका तंत्रज्ञाने दगाफटका केला आणि स्टेशन पोलिसांच्या ताब्यात सापडले. उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. पण तोपर्यंत या काँग्रेस रेडिओने त्याचे काम व्यवस्थित पार पाडले होते. उषा मेहता ४ वर्ष तुरुंगात होत्या. नंतर त्या सुटल्या. त्यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले. कुठल्याही स्वार्थाशिवाय फक्त देशाच्या प्रेमापोटी इतकी मोठी जोखीम उचलणे हे अत्यंत वंदनीय काम आहे. समोर धोका दिसत असतानाही नेटाने आणि जिद्दीने यासारख्या माणसांनी कार्य केले म्हणून आज आपण स्वातंत्र्यात सुखाने जगू शकतो. आज उषा मेहता आपल्यात नसल्या तरी त्यांच्या काँग्रेस रेडिओ 42.34 मीटर्सचे तरंग वातावरणात कायम असतील. ते आपल्याला ऐकू येत नसतील तरी आपण त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे इतकंच!
लेखक : अनुप कुलकर्णी
🇮🇳 जयहिंद🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹

आगामी झालेले