नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

डॉ. जे. पी. नाईक जन्मदिवस


जयंत पांडुरंग नाईक (मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे) (सप्टेंबर ५, १९०७ - ऑगस्ट ३०, १९८१) हे भारतातील ग्रामीण शिक्षणप्रसारामधील मोलाच्या कामगिरीकरता नावाजले गेलेले शिक्षणतज्ज्ञ होते.कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी हे नाईकांचे मूळ गाव. विठ्ठल हरी घोटगे या मूळ नावानेच त्यांनी बी. ए. पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. पोलिसांकडून पकडले गेल्यानंतर आपल्या देशभक्तीचा कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाव बदलले व `विठ्ठल हरी घोटगे' चे ते `जयंत पांडुरंग नाईक' झाले. पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून बेल्लारीच्या तुरुंगात सजा भोगत असताना जे.पी. नाईकांनी गंधकाची भुकटी व गोडेतेल यांच्या मिश्रणातून त्वचारोगावर परिणामकारक असा मलम तयार केला. तुरुंगातील कैद्यांच्या त्वचारोगावर हा मलम वापरला जाऊ लागला. परिणामी कैद्यांच्या त्वचारोगावरील उपायासाठी वापरल्या जाणार्या व्हॅसलिनपेक्षा हा मलम स्वस्त आणि उपायकारक ठरला. यामुळे व्हॅसलिनवरचा खर्च कमी करण्यात नाईक यशस्वी झाले. याचे बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेत सूट देऊ केली. पण शिक्षेत सूट देण्यापेक्षा बक्षीस म्हणून वाचायला वैद्यकशास्त्राची पुस्तके द्यावीत अशी मागणी नाईकांनी केली आणि त्यांची ही मागणी इंग्रज सरकारने पुरी केली.
जे.पी. नाईक यांनी तुरुंगातून सुटल्यावर धारवाड जिल्ह्यातील उप्पीनबेट्टीगेरी या छोट्याशा खेडेगावात आपले समाजकार्य सुरु केले. सुरुवातीला संपूर्ण गाव रोगमुक्त केल्यावर त्याच गावातील शिक्षित तरूणांच्या मदतीने त्यांनी गावात साक्षरता मोहीम राबविली. गावातील समूहशक्तीच्या श्रमदानातून गावाजवळची टेकडी फोडून गावासाठी सडक तयार केली. नाईकांमुळे मुंबईच्या गव्हर्नरांनी उत्कृष्ट गावासाठी पारितोषिक म्हणून ठेवलेली `ग्रामीण सुधारणा ढाल' उप्पीनबेट्टीगेरीसारख्या छोट्या गावाला मिळाली.नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा पुढे चालवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी आयुष्य खर्च केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, मौनी विद्यापीठाचा ग्रामीण शिक्षणाचा प्रयोग, शिक्षण प्रशासन, अनौपचारिक शिक्षण, शैक्षणिक अर्थशास्त्र, शिक्षण संशोधन, आयसीएसएसआर, सामाजिक शास्त्रांचे संशोधन, अप्रगत व प्रगतीशील नवस्वतंत्र देशांच्या शैक्षणिक समस्या, आरोग्य, नगररचना इ. विविध समस्यांचे नाईक साहेबांनी चिंतन व लेखन केले. अनेक सरकारी अहवालांचे त्यांनी लिखाण केले. महात्मा फुले- महात्मा गांधी व मार्क्स यांच्या विचारांचा एकत्रित प्रभाव त्यांच्या शैक्षणिक चिंतनावर झालेला दिसून येतो. त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार 'भारतीय जनतेचे शिक्षण' (१९७८) व 'शिक्षण आयोग आणि तद्नंतर' (१९७९) या दोन पुस्तकांत प्रतिबिंबित झाले आहे.
१९७५-७७ या आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ४० शिक्षणतज्ज्ञांचा अभ्यासगट नेमला होता. जे. पी. नाईक यांनी 'भारतीय जनतेचे शिक्षण' हा ७५ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याला 'जेपीं'नी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. 'शिक्षण आयोग व तद्नंतर' हे नाईकसाहेबांचे मृत्युपूर्वीचे शेवटचे पुस्तक! या पुस्तकातील 'भविष्यासाठी धडे' हे प्रकरण नाईकसाहेबांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.जे. पी. नाईक यांना भारत सरकारने 1974 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
कार्याचा गौरव
डॉ. जे. पी. नाईक यांचे हे स्मारक विद्यार्थी, शिक्षक यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. डॉ. नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र शासनाने यापूर्वी टपाल तिकीट काढले होते. आता त्यांचे स्मारक बहिरेवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथे उभारून शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले