नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, २० मार्च, २०२०

जागतिक चिमणी दिन world sparrow day


🎯 जागतिक चिमणी दिन

मुंबईसारख्या महानगरांत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी – आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.
भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.
‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, परिणाम  हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.
 २०१५ सालाच्या दिवसाची मुख्य संकल्पना होती ‘आय लव्ह स्पॅरो’ दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य- पक्षी जाहीर केला आहे.
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतंच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वाटू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी, बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सामान्यतः आढळणारी चिमणी म्हणजेच 'इंडियन कॉमन स्पॅरो'चेही दर्शन दुर्मीळ होत असताना पर्यावरण संवर्धनामुळे निमशहरी भागातील काही परिसरात विविध प्रकारच्या चिमण्या सकाळ-सायंकाळ गुंजारव करताना आढळत.

चिमणी चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरी भागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.

रान चिमणी - शहरी भागांत फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो • नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काही अंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.

नर चिमणी- या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते. 
मादी चिमणी - ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणतः ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.

आज जागतिक चिमणी दिवस 
उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले 
डोळे तरी मिटलेले
अजूनही!

सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडती 
चोहीकाडी!

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई 
भूरभूर!

आज जागतिक चिमणी दिवस

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?
कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?
नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी
कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?
नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही
कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?
नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?
आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?
गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला
चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?
काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?
पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा
जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

स्रोतपर माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले