दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी ( आणि इतरही अनेक बाबी) आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.या दिनानिमित्त वनिकी (Forestry) संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता (recreation) या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात येते.
शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. १९७१ मध्ये 'युरोपियन कॉनफीडरेशन ऑफ अॅग्रीकल्चर' च्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच 'वनांचे महत्व व त्यांचे संवर्धन' याविषयी जनजागृती करण्यासाठी २१ मार्चला दरवर्षी जागतिक वन दिन साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त या दिवशी जंगलांसंदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्वाच्या घटकांबाबत जनजागृती केली जाते.
"निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व
अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे
संरक्षण व संगोपन करण्यासाठी
कटिबध्द होऊया...!!!"
👉 वनिकी (Forestry) हे वनव्यवस्थापन, वृक्षलागवड आणि संबंधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनांद्वारे पुरविल्या जाणार्या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनांचे व्यवस्थापन करणे हा वनिकीचा मुख्य उद्देश आहे.
जंगल / वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर ती अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली गुतांगुतीची परिसंस्था आहे. जंगल निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी यांनी समृद्ध असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर अन्नघटकांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे मह्त्त्वाचे कार्य करणारे स्मूक्षजीव व बुरशीवर्गीय जीव देखील वन-परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.
👉 मूळ संकल्पना व सुरुवात
संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.
अनावश्यक जंगलतोड टाळणे.
अधिक झाडे लावणे.
जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे
जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती,
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱ्या संसाधनांचा मानवाच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे. २००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूर झाला. सामुहिक वनहक्क कायदा आला. आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वननिवासी यांचे जंगलावरील हक्क याला मंजूरी देण्यात आली. आणि याच कायद्यांचा व इतर शासकीय योजनांचा आधार घेत गावांमध्ये बदल घडू लागले. यातले काही उदाहरणे सांगता येतील. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे गाव. काही वर्षांपूर्वी गावात वनव्यवस्थापन समिती स्थापन झाली. आणि उजाड झालेल्या जंगलाचे संवर्धन झाले. जंगलात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करण्याचे लोकांनीच ठरविले. जंगलांतील सर्व झाडांची मोजणी झाली. मोह या उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचा लिलाव होऊ लागला, जो गावातील लोकच घेऊ लागले. त्यातून जमा झालेल्या रकमेतून गावात विकासकामे झाली. जंगल वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. उत्तम शेती होऊ लागली. गाव समृद्ध बनले.
दुसरे उदाहरण धुळे जिल्ह्यातीलच लामकानी गावाचे. शहरात राहणाऱ्या डॉक्टर धनंजय नेवाडकर ह्यांना झालेल्या अपघातामुळे ते काही महिने सक्तीची विश्रांती घेण्यासाठी गावी आले. त्यावेळी लोकांपुढे चार आणि विहिरीचे पाणी आटण्याची मोठी समस्या आहे असे त्यांच्या लक्षात आले. गावाच्या बाजूलाच सातपुड्याची पर्वतरांग आहे. साधारण एक हजार एकरांचा हा डोंगर सुजलाम, सुफलाम करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला. पाणी अडवा, पाणी जिरवा ही कामे तेथे सुरु केली. गावातील लोकांना रोजगार हमी योजनेचा फायदा मिळाला, रोजगार मिळाला. त्यातून गावातील पाण्याची समस्या मिटली आणि डोंगर पुन्हा समृद्ध बनला.
आदिवासी भागात सामुहिक वनहक्क मिळालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १०२५ गावांनी जैवविविधता समित्या स्थापन करून मोठ्या प्रमाणात जंगलसंवर्धनाला सुरवात केली आहे. यातूनच लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटला आहे. २००५ ला आलेल्या या कायद्यानुसार जंगलांतील बांबू, तेंदूपत्ता या सर्वांचे मालकी हक्क ग्रामसभेला मिळाले. बांबूसारख्या वनोपजाची व्यवस्था लोकांनी केली. यातून बांबूकटाई साठीची मजुरी आधीपेक्षा तिप्पट प्रमाणात लोकांना मिळाली शिवाय या बांबूविक्रीतून गावासाठी आवश्यक विकासकामांसाठी लोकांना पैसे मिळाले. कोरची तालुक्यात तर सालेम, झेंडेपार, अरवीटोला, अंधेरी, टेंभली, काळेगाव या गावातील लोकांनी सात एकर नवीन बांबूची लागवड केली आहे. जे जंगल त्यांना जगवते त्या जंगलाला ते जगवत आहे, वाढवत आहे.
जसे वनांवरील हक्क लोकांना मिळत आहे तसेच जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही लोकांकडे आहे. ज्या भागांत वनव्यवस्थापन समिती नाही किंवा नुसतीच कागदोपत्री आहे अशा काही गावांतून लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, पण, बेजबाबदारपणामुळे त्यावर नियंत्रण नाही. यातून जंगलांचा नाशच जास्त होत आहे व नको त्या वाईट प्रवृत्ती बोकाळत आहे. यासाठी संतुलित, शाश्वत, जबाबदार लोकसहभागातून होणाऱ्या वनव्यवस्थापनातूनच शाश्वत उपजीविका निर्माण होईल व सर्वांनाच ‘शुद्ध हवा आणि शुद्ध आरोग्य’ अनुभवता येईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा