नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, ५ जून, २०२०

नारायण मल्हार जोशी (ना. म. जोशी)


नारायण मल्हार जोशी (ना. म. जोशी) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते. ना.म. जोशी यांचे वडील वेदविद्यासंपन्न असून प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले.
जन्मतारीख: ५ जून, १८७९
जन्मस्थळ: कुलाबा
मृत्यूची तारीख: ३० मे, १९५५
मृत्यूस्थळ: मुंबई
संस्थेची स्थापना: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई १९२७ साली निधन पावली त्यांच्या दोन मुलींपैकी ज्येष्ठ मुलगीही १९३४ मध्ये मरण पावली. त्यांचे दोन पुत्र सुविद्य व सुस्थितीत आहेत. नारायणरावांचे दोन बंधू महादेवराव व वामनराव हे अनुक्रमे संस्कृत पंडित आणि मराठी लेखक म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. न्यू इंग्‍लिश स्कूलमधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१–१० या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.
नारायण मल्हार जोशी
समाजसेवेच्या इच्छेने १९०९ मध्ये जोशी ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले.  संस्थेच्या ज्ञानप्रकाश  या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९११ मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. १९११ मध्येच त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते १९५५ पर्यंत निगडीत होते. १९११–१३ या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळपीडीतांसाठी साहाय्यनिधी गोळा केला. हळूहळू जोशींनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले आणि तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग इ. चालविले लंडनमधील टॉयन्बी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी दोन मोठी सभागृहे बांधली. १९१७ साली भारत सरकारतर्फे मेसोपोटेमियाला भेट देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधीमंडळाचे ते एक सदस्य होते. १९२१ साली त्यांनी कामगार समाचारनामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले.
 जोशींनी ३१ ऑक्टोबर १९२० साली ‘आखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली १९२९ पर्यंत ते तिचे कार्यवाहही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा १९२९ साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे १९३३ मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्‌स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. १९२६ मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते. ‘नॅशनल सीमेन्स युनियन’ या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारतीय खलाशांच्या कामाच्या स्थितीबाबत जोशींनी मोठी कळकळ व आस्था दाखवून तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. भारत सेवक सामाजामध्ये युद्धविषयक व इतर धोरणांबद्दल मतभेद झाल्यामुळे १९४० मध्ये जोशींनी समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरिता त्यांनी १९३७–३८ मध्ये ‘मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना’ (बाँबे सिव्हिल लिबर्टीज युनियन) स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला.
वॉशिंग्टन येथे १९१९ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने १९२२–४८ या काळात जोशींनी सोळा वेळा यूरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. लंडन येथे १९३०–३२ या कालावधीत भरलेल्या तीन गोलमेज परिषदांवर, तसेच संयुक्त संसदीय समितीवर जोशींना सरकारने नेमले होते. १९२९–३० मध्ये भारतीय कामगारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या शाही आयोगाचे जोशी एक सभासद होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या (१९३७) ‘कामगार उपसमिती’चे ते अध्यक्ष होते. ‘मुंबई सामाजिक सुधारणासंस्थे’चे सचिव (१९१५–३०), मुंबई महानगरपालिकेचे सदस्य (१९१९–२२) व रेल्वे कामगार महासंघाचे अध्यक्ष (१९२९) अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.

 जोशी १९२१–४७ एवढा प्रदीर्घ काळ दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा या काळात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. जेष्ठत्वाच्या नात्याने त्यांना ‘विधानसभेचे पिता’ अशी सन्मान्य पदवी मिळाली. अनेक कामगारकल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशींनाच आहे. कारखाना अधिनियम (१८८१), कामगार हानिपूर्ती अधिनियम (१९२४), भारतीय कामगार संघटना अधिनियम (१९२६), वेतन प्रदान अधिनियम (१९३६), बालकामगार रोजगारी अधिनियम (१९३८) इ. अधिनियमांमध्ये जोशींच्या सतत प्रयत्नांमुळे कामगारानुकूल अशा अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. कामगारांच्या हितसंबंधांना बाध येत असेल, तर जोशी हे सरकारलाही विरोध करीत. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील अथवा कामगार संघटनांमधील हिंसक प्रवृत्ती त्यांना मान्य नव्हत्या. काँग्रेसने ‘शाही कामगार आयोगा’वर बहिष्कार घातला, तेव्हा जोशींनीही काँग्रेसच्या ‘मजूर समिती’ च्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

जोशी १९४८ मध्ये कामगार संघटना क्षेत्रातून निवृत्त झाले. १९५१ मध्ये कराची येथे भरलेल्या पहिल्या ‘आशियाई कामगार संघटना परिषदे’ने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊन गौरविले. जोशींनी आपल्या उर्वरीत आयुष्यात अनेक कामगार संघटनांना उपयुक्त सल्ला दिला व मार्गदर्शन केले. त्यांमध्ये मुंबईची ‘ट्रॅन्स्‌पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’ (वाहतूक बंदर कामगार संघटना) हि विशेषेकरून होती. या संघटनेला त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकारी कार्यक्रमांचे संवर्धन करण्यात विशेष साहाय्य केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संघटनेतर्फे दरवर्षी एक व्याखानसत्र आयोजित केले जाते.
 जोशींना कामगार संघटनांमधील दुफळीबाबत अतिशय खेद वाटत असे. सर्व क्षेत्रांतील कामगारांनी एकत्र येऊन, राजकीय मतमतांतरे बाजूला ठेवून एकच बळकट अशी कामगार संघटना उभारावी असे त्यांचे ठाम मत होते. सहकारतत्त्वांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. कामगारांमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार व्हावा अशी जोशींची उत्कट इच्छा होती. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचेही ते कट्टर पुरस्कर्ते होते. कामगार संघटनेची वाढ बाह्य घटकांपेक्षा अंतर्गत घटकांमार्फतच व्हावी, असे त्यांचे आग्रही मत होते.
भारतातील कामगार संघटनांच्या विकासाचे रोपटे प्रथम जोशींनी लावले आणि कामगारांची प्रगती व कल्याण साधणारे अनेक कामगार कायदे संमत करण्यात मोठाच हातभार लावला परंतु समाजकल्याण व सुधारणा या क्षेत्रांतील जोशींची कामगिरी तितकीच मोलाची आहे. त्याकाळातही प्रौढ मताधिकाराचे ते खंदे पुरस्कर्ते होते. फेबियन सोसायटीचे ते सभासद होते. समाजवादी वृत्तीचे असल्यामुळे उद्योगांचे राष्ट्रीयीकरण व्हावे ह्या मताचे ते होते. खाजगी व्यक्तींच्या मक्तेदारीपेक्षा त्यांना शासनाची मक्तेदारी अधिक मान्य होती. जोशींनी अनेक संपांत प्रत्यक्ष भाग घेतला असला, तरी कामगारांनी संपावर जावे असे प्रोत्साहन वा सल्ला त्यांनी कामगारांना केव्हाही दिला नाही. कामगारांचा संपाचा हक्क कायदेशीर रीत्या रोखणे यास त्यांचा विरोध होता. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेकरिता संप हेच कामगारांच्या हातातील एकमेव हत्यार आहे, असे जोशी मानत.
जोशी हे मूलतः उदारमतवादी परंपरेतील होते. गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर अधिक प्रभाव होता. नामदार गोखल्यांच्या सहवासामुळे त्यांचे बहुमोल मार्गदर्शन जोशींना लाभले. जात, धर्म, जन्म किंवा मालमत्ता यांवर अधिष्ठित अशा हक्कांना व भेदभावांना जोशींचा विरोध होता. आर्थिक व सामजिक समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरील प्रतिस्थापित समाजरचना हे त्यांचे स्वप्‍न व ध्येय होते. हे ध्येय लोकशाहीवादी मार्गांनी प्राप्त करण्यावर त्यांचा अटळ विश्वास होता.
जोशी हे सडेतोड वक्ते व लेखक होते. त्यांनी मध्यवर्ती विधानसभेत केलेली अनेक भाषणे गाजलेली आहेत. त्यांना निकोप शरीरयष्टी लाभली होती. १९५२ साली मुंबई येथे जोशींनी कामगारक्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या अखंड कार्याप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मदिनी (५ जून) त्या वेळचे भारत सरकारचे मजूरमंत्री व्ही. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगारवस्तीमधील ‘डिलाइल रोड’ चे ‘ना. म. जोशी मार्ग’ असे नामंतरण करण्यात आले.
संकलित माहिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले