
#(National Technology Day)
११ मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' ११ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात १९९८ ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.
११ मे १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली.
या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते.
११ मे १९९८ रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. ५८ किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला.
भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
तसेच ११ मे १९९८ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.
देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून घोषित केला. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.
भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले. आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे. सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
२००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.

आधुनिक_सणवार : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
११ मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि ३० ऑक्टोबरला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस, असे तीन, विज्ञानाशी संबंध असलेले दिवस भारतात पाळले जातात.
११ मे १९९८ रोजी पोखरण-०२ या यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या, २८ फेब्रवारी १९२८ रोजी चंद्रशेखर रामन यांनी नोबेल पारितोषिक विजेता शोध लावला, तर ३० ऑक्टोबर १९०९ हा, भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. ११ मे १९९८ हा पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला.
११ मे १९९८ रोजी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. दोनच दिवसांनंतर म्हणजे १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची, शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची, शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. शक्ती-१ आणि शक्ती-२ या चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा बरीच कमी होती. त्यामुळे, भारताच्या या चाचण्या अयशस्वी झाल्या अशी ओरड काही विदेशी संस्थांनी केली, परंतु आमचे तंत्रज्ञान कमी पडले असा खुलासा भारत सरकारने केला.
११ मेला आणखीही एक, भारताच्या इतिहासात महत्त्वाची घटना घडली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय जनगणना आयोगाच्या, लोकसंख्या घडय़ाळानुसार, ११ मे २००० रोजी, १ अब्ज हा आकडा आला तेव्हा, बरोबर १२ वाजून ३२ मिनिटांनी दिल्लीत कुमारी आस्था अशोककुमार अरोरा या ‘अब्जाव्या’ भारतीय नागरिकाचा जन्म झाला आणि ती कन्या होती हे विशेष, भारताची लोकसंख्या अधिकृतपणे एक अब्ज झाली.
वाढती कारखानदारी, त्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंध वापर, उपयोगात आणलेल्या, वापरून झालेल्या वस्तूंची आणि पदार्थाची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणातील वाढते प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दैनंदिन गरजा आणि चैनी भागविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी दिवसेंदिवस वाढतच जाणारी जीवघेणी स्पर्धा इत्यादी विज्ञानीय प्रगतीच्या दुष्ट परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी, समाजातील विचारवंतांनी निरनिराळे दिवस किंवा ‘दिन’ पाळण्याची प्रथा किंवा प्रघात रूढ केला.
त्या निमित्ताने एखादी विशिष्ट समस्या प्रकर्षाने चर्चिली जावी, त्या समस्येचे वास्तवरूप जनमानसाला समजावे, त्यावर योग्य ती उपाययोजना व्हावी, सर्वाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न व्हावेत, असा या निरनिराळे ‘दिन’ पाळण्याचा किंवा साजरे करण्याचा मुख्यत्वेकरून उद्देश असतो.
थोडक्यात म्हणजे हे निरनिराळे ‘दिन’ पाळणे म्हणजे आधुनिक सणवार पाळण्यासारखेच आहे. ज्या दृष्टिकोनातून पूर्वी सणवार आणि व्रतकैवल्ये रूढ झालीत, त्याच जनहिताचा आणि समाजहिताचा विचार आजही कायम आहे, सक्रिय आहे असाच अर्थ हे ‘दिन’ साजरे करण्यामागे आहे, असे वाटते.
स्त्रोतपर माहिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा