
तुळशी विवाह
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
महत्त्व
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीचे लग्न आहे, जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीनंतर साजरा केला जातो. यामागे दोन मुख्य कारणे आहेत: एक पौराणिक कथा आणि दुसरे आध्यात्मिक महत्त्व. पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका स्त्रीने विष्णूंना शाप दिला होता आणि नंतर विष्णूंनी तिला वचन दिले की ते शालिग्राम रूपात तुळशीशी लग्न करतील. आध्यात्मिकदृष्ट्या, हा विवाह चातुर्मासाच्या समाप्तीनंतर होतो, जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यामुळे शुभ कार्यांची सुरुवात होते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते असे मानले जाते.
पौराणिक कथा
वृंदा नावाच्या स्त्रीने विष्णूंना शाप दिला होता, ज्याच्या परिणामामुळे ती एका तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित झाली. वृंदाने विष्णूंना वचन दिले होते की ती दरवर्षी कार्तिक महिन्यातील द्वादशीला लग्न करेल. या वचनाचे पालन करण्यासाठी, विष्णू शालिग्राम रूपात तुळशीसोबत लग्न करतात.
आध्यात्मिक महत्त्व
शुभ कार्यांची सुरुवात: चातुर्मासाच्या समाप्तीनंतर, भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि शुभ कार्यांची सुरुवात होते.
वैवाहिक जीवनात प्रेम: या विवामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि कुटुंबात सुसंवाद येतो असे मानले जाते.
वैवाहिक दोष निवारण: तुळशी विवाह केल्याने कुंडलीतील विवाह संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते.
धार्मिक महत्त्व: तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तुळशीचे लग्न विष्णूशी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते.
📙आख्यायिका - कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.
एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.
तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा