नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट Vaikuntha Chaturdashi

 आज वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट Vaikuntha Chaturdashi

त्रिपुरारी पौर्णिमेचा आधी येणारी कार्तिक चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. 

वैकुंठ चतुर्दशी या तिथीचा उल्लेख स्कंध पुराणात व शिवपुराणात मिळतो 

दोन्ही पाहुयात .

स्कंद पुराणात विष्णूंच्या शिवपूजेच्या कथेसोबतच देवर्षी नारद आणि धनेश्वर ब्राह्मणाची कथाही महत्त्वाची मानली जाते: 

नारदांचा प्रश्न. एकदा देवर्षी नारद वैकुंठात गेले आणि त्यांनी विष्णूंना विचारले की, "प्रभू, तुम्ही केवळ तुमच्या प्रिय भक्तांनाच वैकुंठ देता, मग सामान्य व पापी जीवांचा उद्धार कसा होणार?" तेव्हा विष्णूंनी सांगितले की, कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठाचे दरवाजे सर्वांसाठी खुले राहतील. 

धनेश्वर ब्राह्मणाचा उद्धार. अवंती नगरीत धनेश्वर नावाचा एक अत्यंत पापी ब्राह्मण राहत होता. आयुष्यभर पापकर्म केल्यानंतर मृत्यूपूर्वी तो गोदावरी नदीच्या तीरावर (काही पाठांत काशी क्षेत्री) गेला, जिथे वैकुंठ चतुर्दशीच्या व्रताचा उत्सव सुरू होता. केवळ त्या पवित्र वातावरणाच्या आणि भक्तांच्या स्पर्शाने त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि यमदूतांच्या पाशातून मुक्त होऊन त्याला वैकुंठ धाम प्राप्त झाले.

संबंधित संस्कृत श्लोक (स्कंद पुराण, वैकुंठ चतुर्दशी माहात्म्य):

"कार्तिके शुक्लपक्षे तु चतुर्दश्यां विशेषतः ।

वैकुण्ठस्य च द्वाराणि विवृतानि भवन्ति हि ॥

तस्यां यः पूजयेद्विष्णुं शिवं वा भक्तिसंयुतः ।

स याति परमं स्थानं वैकुण्ठं नात्र संशयः ॥"

अर्थ: विशेषतः कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठाचे दरवाजे उघडे असतात. या दिवशी जो भक्तीभावाने भगवान विष्णू किंवा शिवाची पूजा करतो, तो निःसंशयपणे परम स्थानी पोहचतो.

 श्लोक 

संदर्भ: शिवपुराण, कोटीरुद्रसंहिता, अध्याय ३४, श्लोक २० ते २८ (प्रामुख्याने श्लोक २४-२६).

मूळ श्लोक (साररूपाने):

"पद्ममेकं तदा दृष्ट्वा न्यूनीभूतं जनार्दनः ।

स्वनेत्रमुत्पाट्य तदा पूजयामास शङ्करम् ॥"

(अर्थ: एक कमळ कमी असल्याचे पाहून भगवान जनार्दनांनी (विष्णूंनी) स्वतःचा डोळा काढून भगवान शंकरांची पूजा केली.)

 हाच प्रसंग लिंगपुराण, पूर्वार्ध, अध्याय ९ 

कार्तिक शुक्ल चतुर्दशीला (वैकुंठ चतुर्दशी) काशी क्षेत्री विष्णूंनी शंकरांची पूजा केल्यावर शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले आणि दोघांनी एकमेकांची पूजा केली. या 'हरिहर ऐक्याचा' (विष्णू आणि शिव एकच असल्याचा) प्रसिद्ध श्लोक स्कंद पुराणात (तसेच काही पाठभेदांसह पद्म पुराण आणि बृहन्नारदीय पुराणात) आढळतो. 

संदर्भ: स्कंद पुराण (वैष्णव खण्ड - कार्तिकमास माहात्म्य / काशी खण्ड संदर्भ).

प्रसिद्ध श्लोक:

"शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे ।

शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः ॥

यथा शिवमयो विष्णुरेवं विष्णुमयः शिवः ।

यथान्तरं न पश्यामि तथा मे स्वस्तिरायुषि ॥"

अर्थ: विष्णूरूप असलेल्या शिवाला आणि शिवरूप असलेल्या विष्णूला नमस्कार असो. शिवाच्या हृदयात विष्णू आहेत आणि विष्णूंच्या हृदयात शिव आहेत. जसे विष्णू शिवमय आहेत, तसेच शिव विष्णूमय आहेत. या दोघांमध्ये मी कोणताही भेद पाहत नाही, या भावनेने माझे आयुष्य कल्याणकारी होवो. 

वैकुंठ चतुर्दशी निमित्त विशेष संदर्भ

स्कंद पुराणातील कार्तिकमास माहात्म्यानुसार, या दिवशी मध्यरात्री (निशीथ काळी) हरिहर भेट होते.

या पूजेत भगवान विष्णूंना बेलपत्र आणि भगवान शंकरांना तुळस वाहिली जाते 

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. 

या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्‍याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात. 

महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते. 

वैकुंठ चतुर्दशी महत्त्व -

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासात येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. 

या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!

वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. 

आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. 

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारिद्रय नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. 

स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक! वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक! 

मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर चार महिन्यांचा ओव्हर टाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही



🙏🏻🔱📿🌿हर हर महादेव🌿📿🔱🙏🏻

🙏🏻🔱📿🌿देवा दि देव श्री कपालेश्वर महादेव🌿📿🔱

आगामी झालेले